मुंबई, 19 ऑक्टोबर: बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून सतत चर्चेत असलेले रितेश आणि जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दोघांनी मागील वर्षी त्यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची घोषणा केली होती. मात्र आता कंपनी आणि रितेश - जेनेलिया अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कंपनीच्या जागेवरून आणि घेतलेल्या कर्जावरू वाद निर्माण झाला आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्यावर भाजपनं गंभीर आरोप केले आहेत. या वादात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक देखील संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घ्या.
23 मार्च 221ला कंपनीची नोंद करण्यात आली. तेव्हा रितेश आणि जेनेलिया दोघेही त्याचे मालक होते. रितेश जेनेलिया यांची 50-50 टक्के भागीदारी होती. सुरूवातीला कंपनीचं भांडवल 7.50 कोटी रुपये होतं. पण त्यानंतर कंपनीवर अनेक आरोप करण्यात आले. कंपनीने 5 एप्रिल 2021मध्ये लातुरातील अतिरिक्त एम आय डी सीमध्ये अर्ज केला आणि हा अर्ज 15 एप्रिल 2021ला मंजूर झाला आणि कंपनीला जागा मिळाली. अवघ्या 10 दिवसात रितेश जेनेलियाला जागा कशी काय मंजूर झाली यावर भाजपनं प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा - Riteish Deshmukhआणि Genelia DSouza ची जोडी पुन्हा पडद्यावर करणार धम्माल; जाणून घ्या डिटेल्स
भाजपचे लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप मोरे यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी म्हटलंय, "2 वर्ष 16 लोकांचं वेटींग असताना केवळ प्राधान्य या सदराखाली मंत्र्यांचा भाऊ असल्यानं त्यांना ही जमीन देण्यात आली", असा आरोप त्यांनी केला आहे. 10 दिवसात भूखंडाचं वाटप कसं काय करण्यात आलं याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
View this post on Instagram
"लातूर एमआयडीसीमध्ये असलेल्या जागा या लातूरमधील व्यापारांना मिळाल्या पाहिजेत. 16 लोकांची नाव यादीत असताना ती डावलून आमदारांनी ही जागा 10 दिवसात देऊन टाकली याची चौकशी व्हावी", असं भाजप आमदार संभाजी निलंगेकर पाटील यांनी म्हटलं आहे.
120 कोटींच्या कर्जाचा आरोप
रितेश जेनेलियाच्या या कंपनीनं 4 ऑक्टोबर 2021ला पंढरपूर अर्बन को.ऑ. बँकेत 4 कोटींचं कर्ज आणि 5 ऑक्टोबर 2021मध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 61 कोटींच्या कर्जासाठी अर्ज केला आणि हे अर्ज 25 दिवसात दोन्ही बँकांनी मंजूर केलं. 25 जुलैनं 2022मध्ये लातूर जिल्हा बँकेनं आणखी 55कोटींचं कर्ज कंपनीला दिलं. याच कर्जावर भाजपनं प्रश्न उपस्थित केलेत. ज्या कंपनीचं संपूर्ण भांडवल 7.50 कोटी आहे त्या कंपनीला 120 कोटींचं कर्ज दिलं जातं असा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा बँकेत गेली अनेक वर्ष देशमुखांचं वर्चस्व असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Latur