मुंबई, 13 जानेवारी : बिग बॉस मराठी 4 फेम अभिनेते किरण माने मागच्या वर्षभरापासून चर्चेत राहिले. बिग बॉसच्या घरात येऊन मानेंनी प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिल्या दिवसापासून किरण माने सातत्यानं चर्चेत राहिले. बिग बॉसच्या घरातील मानेंचा खेळ सर्वांनाआवडला. आपल्या वयाच्या निम्म्या कलाकारांबरोबर घरात त्यांनी 100 दिवस काढले. कधी भांडणं झाली, आरोप प्रत्यारोप पण किरण मानेंनी घरात नेहमीच वडिधाऱ्या माणसाची जागा घेत सर्वांना समजून घेतलं. किरण माने बिग बॉस जिंकतील अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र किरण माने बिग बॉस जिंकले नसले तरी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र यशस्वी ठरले आहेत. बिग बॉसमधून बाहेर येताच मानेंनी पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले.
किरण माने यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता. 13 जानेवारी हा दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला होता. किरण माने वर्षभरापूर्वी स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत होते. मात्र मालिकेतील काही कलाकरांनी किरण मानेंवर आरोप करत त्यांना मालिकेतून काढून टाकलं. मुलगी झाली हो या मालिकेचा वाद चांगलाच गाजला होता. या घटनेला आज बरोबर एक वर्ष झालं आहे. किरण मानेंनी त्यांचा हा प्रवास सांगत एक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा - 'जीव देण्याची इच्छा झाली होती'; बिग बॉसमधून बाहेर येताच किरण मानेंनी सांगितली हकीकत
किरण माने यांनी या वर्षाभरापूर्वी शेअर केलेली पोस्ट शेअर करत म्हटलंय, 'बोललो ते करून दाखवलं भावांनो! आज बरोब्बर एक वर्ष झालं! कुठलीही चूक नसताना माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. त्यावेळी मी मोठ्या आत्मविश्वासानं ही पोस्ट केली होती. त्यावेळीबी तुम्ही भरभरून सपोर्ट केलावता. आज माझ्या आनंदसोहळ्यात तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतायच. पन त्यावेळी मला विरोध करनारेबी कौतुकाची, मायेची बरसात करतायत !!! सगळ्यांचेच मनापास्नं आभार'.
मानेंनी पुढे लिहिलंय, 'मी तुमच्या घरातलं एक लेकरू हाय. तुकोबारायांच्या "बोले तैसा चाले" या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करतोय. मराठमोळा अभिनेता म्हनून तुम्हाला कायम अभिमान वाटंल असंच काम माझ्या हातनं होत राहील, हे वचन देतो. लब्यू'
किरण माने बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर थेट साताऱ्याला त्यांच्या घरी गेले. साताऱ्यात जाताच किरण मानेंचा सातारकरांकडून सत्कार करण्यात आला. ढोल ताशे फटाक्यांच्या आतिशबाजीत मानेंची मिरवणूक काढण्यात आली. मानेंना मिळालेल्या या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानलेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial