मुंबई, 02 फेब्रुवारी : 'बिग बॉस मराठी' चा चौथा सीजन नुकताच पार पडला. या शोमधून अनेक स्पर्धक-कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेते किरण माने होय. किरण मानेना या शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. बिग बॉसमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते सतत किरण मानेंना भेटून त्यांना सोशल मीडियावरुन मेसेज करुन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात. किरण माने असेच काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. आज मात्र किरण मानेंनी एक भावुक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.
काल नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे भीषण अपघातात निधन झाले. युवक काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा हरपल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्ते केली जातेय. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन गाजवणारे अभिनेते किरण माने यांनीही मानस यांच्यासाठी भावुक करणारी पोस्ट केली आहे. किरण आणि मानस यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. आता त्यांच्या निधनानंतर किरण मानेंनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा - बिग बॉस नंतर पुन्हा एकत्र दिसणार किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर; 'हे' आहे कारण
किरण माने यांनी फेसबुकवर मानस यांचा फोटो शेअर करत हळहळ व्यक्त केली आहे. किरण यांनी लिहिले की, 'तुका म्हणे मरण आहे या सकळां... भेणें अवकळा अभयें मोल! हे सगळं मान्य आहे. तरीही समविचारी मित्राचं असं अकाली, अनपेक्षित,अपघाती जाणं लै लै लै जिव्हारी लागतं. माझ्यापेक्षा लहान होतास मानस, अजून खूप काही करायचं होतं. खूप जगायचं होतं. माझ्या अनेक पोस्टस् वाचून तुझे येणारे कौतुकाचे, चिकित्सेचे, विश्लेषणाचे मोठ्ठाले फोन्स, लांबलचक मेसेजेस, भरपूर गप्पा.. आणि शेवटी, 'नाशिकला आल्यावर घरी या सर' हे सगळं सगळं सगळं खूप मिस करेन.'
किरण माने यांनी पुढे लिहिलयं की, 'एक दिवस तुला आदरांजली वाहण्याची पोस्ट करावी लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुझ्यासारख्या विवेकी, संयमी, अभ्यासू मित्राची अशी एक्झिट सहन होत नाही गड्या. लै खचल्यासारखं वाटतंय'. किरण मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत मानस यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये मानस यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला.
अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यात येत असलेले अनुभव किंवा घडत असलेल्या चांगल्या-वाईट घटना सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन दाद देत असतात. बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यांनतर त्यांचे चाहते सतत त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता त्यांना लवकरच पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.