मुंबई, 11 नोव्हेंबर: टेलिव्हिजनवरचा सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) दिवसेंदिवस आणखीनच मजेदार होत चालला आहे. शोमध्ये नव-नवे ट्विस्ट येत आहेत. प्रेक्षकांना आता यात एका प्रेमवीराची प्रेमाची कबुलीही पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा स्पर्धक राहुल वैद्यने (Rahul Vaidya) अभिनेत्री, मॉडेल दिशा परमार (Disha Parmar)ला नॅशनल टेलिव्हिजनवरुन लग्नाची मागणी घातली आहे. 11 नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस असतो. राहुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहे.
राहुलचा हटके प्रपोज
दिशाला मागणी घालण्यासाठी राहुलने बरेच कष्ट केले होते. त्याने चक्क एका पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टवर लाल रंगाच्या लिपस्टीकने हॅपी बर्थडे दिशा असं लिहीलं होतं. आणि मागच्या बाजूला माझ्याशी लग्न करशील का (Will You Marry Me) असं लिहिलं होतं. घरातल्या सगळ्या लोकांना एकत्र बसवून त्याने ही घोषणा केली. राहुलचा हा हटके अंदाज पाहून घरातले सर्वच जण भावूक झाले होते. लग्नाची मागणी घालताना राहुल म्हणाला, ‘आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे. माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे जिचं नाव आहे दिशा परमार. दिशाला माझ्या मनातल्या भावना सांगायला मला एवढा वेळ का लागला हेच समजत नाही. माझ्या दृष्टीने दिशा ही सर्वात जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे. दिशा माझ्याशी लग्न करशील का?’
राहुलने दिशाला प्रपोज केलं तेव्हा त्याने एक अंगठीही आणली होती. मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन असं राहुलने दिशाला सांगितलं आहे. राहुलचा हा रोमँटिक प्रपोज पाहून अनेक स्पर्धकांनी टाळ्या, शिट्या वाजवल्या. आता दिशा राहुल वैद्यला काय उत्तर देणार? हे जाणण्यासाठी आपल्याला बिग बॉसचा एपिसोड पाहावा लागेल.