असा जन्मला बिग बींचा अँग्री यंग मॅन

सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या या सिनेमाचं नाव होतं जंजीर. या सिनेमानेच समाजात खदखदत असलेल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. एका नव्या स्टारचा जन्म झाला. ज्याला बिरूद लागलं 'अँग्री यंग मॅन'चं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2017 01:06 PM IST

असा जन्मला बिग बींचा अँग्री यंग मॅन

विराज मुळे, 11 आॅक्टोबर : अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये येऊन काही सिनेमे करून एव्हाना 4 वर्ष उलटली होती. मात्र म्हणावं तसा जम काही बसला नव्हता. हाच काळ असा होता जेव्हा देशात अनेक बदल होत होते. एकप्रकारची अस्वस्थता समाजात दडून राहिलेली होती.

अशात वर्ष उजाडलं ते 1973. निर्माते-दिग्दर्शक राकेश मेहरा त्यांच्या नव्या सिनेमासाठी एका अभिनेत्याच्या शोधात होते. या भूमिकेसाठी नाव पुढे आलं ते अमिताभ बच्चन यांचं. सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या या सिनेमाचं नाव होतं जंजीर. या सिनेमानेच समाजात खदखदत असलेल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. एका नव्या स्टारचा जन्म झाला. ज्याला बिरूद लागलं 'अँग्री यंग मॅन'चं.

सिनेमा सुपरहिट ठरला आणि अमिताभ यांच्याकडे सिनेमांची संख्या वाढायला लागली. 1975 साली पुन्हा एकदा एक सशक्त भूमिका बिग बींच्या वाट्याला आली ती यश चोप्रांच्या दिवार या सिनेमाद्वारे. गोदीत काम करणारा विजय भांडवलदारांनी शोषण केलेल्या कामगारवर्गाचा आवाज ठरला. त्यांच्या मनातली अस्वस्थता या सिनेमातल्या व्यक्तिरेखेच्या संवादातून व्यक्त झाली.

त्याच वर्षी रमेश सिप्पी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'शोले' या सिनेमाची तयारी करत होते. सुरुवातीला अमिताभ यांच्या नावाची साधी चर्चाही नव्हती. बिग बी यांची भूमिका आधी शत्रुघ्न सिन्हा करणार होता. पण जावेद अख्तर अमिताभ यांच्या नावावर अडून बसले आणि अमिताभ यांना त्यांच्या करिअरमधली सगळ्यात अमिस्मरणीय अशी भूमिका मिळाली.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं आयुष्यातलं पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळायला 1977 साल उजाडावं लागलं. यावर्षी रिलीज झालेल्या मनमोहन देसाईंच्या अमर अकबर अँथोनीने बॉक्स ऑफिसवर असा काही धुमाकूळ केला की काही विचारूच नका.त्यातही बिग बींची अँथोनी गोन्सालवीसची भूमिका त्याची भाषा आणि सिनेमातील जबरदस्त अॅक्शनमुळे लक्षवेधी ठरली.

Loading...

1978 साली या सगळ्या भूमिकांना कित्येक मैल मागे सोडणारी भूमिका अमिताभ यांच्या वाट्याला आली ती डॉन या सिनेमातून.डॉन हा खरं ते अंडरवर्ल्ड

टोळीचा म्होरक्या.पण त्याचं चित्र उभं करताना स्टाईल आणि डायलॉग्जची अशी काही जबरदस्त भट्टी जमली की काही विचारूच नका.

डॉन सुपरहिट झाल्यानंतर त्याच वर्षी पाठोपाठ यश चोप्रांचा त्रिशूल आणि प्रकाश मेहरांचा मुकद्दर का सिकंदर हे सिनेमेही रिलीज झाले. या सिनेमातल्या अमिताभ यांच्या भूमिका त्याच श्रृंखलेला अजून पुढे नेणाऱ्या ठरल्या.

याचीच पुनरावृत्ती 1979 साली झाली. यावर्षी बिग बी आणि शशी कपूर यांचा सुहाग हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली, तर त्यासोबतच मिस्टर नटवरलाल, काला पत्थर, दी ग्रेट गँब्लर असे एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे यावर्षी रिलीज झाले. काला पत्थरमधली भूमिका ही बिग बींसाठी त्यांच्या करिअरमधली सगळ्यात आवडती भूमिका आहे, तर मिस्टर नटवरलालसाठी त्यांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केलं. ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

1980 साल मात्र दोन वेगळ्या सिनेमांनी गाजलं. पहिला होता मल्टीस्टारर अॅक्शनपॅक्ड सिनेमा शान, तर दुसरा होता दोन महारथींना एकत्र आणणारा शक्ती. शानमध्ये अमिताभ यांची स्टाईल आणि अॅक्शनला वाव होता,तर शक्तीमध्ये मात्र मनातील वेदना गडदपणे मांडण्याची संधी होती. या दोन्हीतही ते नेहमीप्रमाणेच सरस ठरले.

1981 साली लावारिस, नसीब, सत्ते पे सत्ता अशा काही सिनेमांमधून बिग बींची हीच प्रतिमा कायम राहील अशाच पद्धतीने प्रयत्न झाले.अगदी 1982 साली कुली हा सिनेमा  करेपर्यंत अमिताभ म्हणजे अँग्री यंग मॅन हे समीकरण कायम होतं. पण कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातामुळे हा सिलसिला काही काळ खंडित झाला.

त्यानंतर काही वर्ष बिग बी सिनेमांपासून दूरच राहिले. पण 1988 साली शहेनशाह या सिनेमाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केला. त्यातला बिग बींचा डायलॉग आजही लहान मुलाच्याही तोंडावर आहे.

1991 साली आलेला हम, 1992 सालचा आणि बिग बींना त्यांच्या करिअरमधला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळून देणारा अग्नीपथ आणि 1992 साली पहिल्यांदाच अफगाणीस्तानात जाऊन शूट केलेला खुदा गवाह. या सगळ्यांनी बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन इमेजला नवा आयाम दिला.

तोही असा की जो वर्षानुवर्ष बॉलिवूडमध्ये कुणाही खोडून काढू शकणार नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...