मुंबई, 24 ऑगस्ट: यश चोप्रांनी (Yash Chopra) दिग्दर्शित केलेल्या आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan instagram) यांच्या अभिनयाने गाजलेल्या 'काला पत्थर' (Kala Patthar) या सिनेमाला नुकतीच 42 वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने, अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर त्या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं असून, कोलकात्यातल्या एका कंपनीच्या कोळसा विभागात आपण काम केल्याची आठवणही त्यांनी शेअर केली आहे. चित्रपटांत ब्रेक मिळण्याआधीची ती आपली पहिली नोकरी होती, असंही बच्चन यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. '42 years of KALA PATTHAR .. !!! phew !!!' अशी कॅप्शन बिग बींनी 'काला पत्थर' सिनेमाच्या पोस्टरसोबत शेअर केली आहे. 9 ऑगस्ट 1979 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.
हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेक सिनेमे प्रसिद्ध झाले, तसंच काही सिनेमांतले काही डायलॉग्जही खूप गाजले. काला पत्थर या सिनेमातला अमिताभ यांच्या तोंडचा असाच गाजलेला डायलॉग म्हणजे 'My pain is my destiny and I can’t avoid it.' 27 डिसेंबर 1975 रोजी झारखंडमधला कोळसा जिल्हा (Coal District) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनबादजवळच्या चासनाला कोळसा खाणीत घडलेल्या दुर्घटनेत 375 जणांचे प्राण गेले होते. 'काला पत्थर' या सिनेमाची निर्मिती त्या दुर्घटनेच्या आधारे करण्यात आली होती. 'काला पत्थर' या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासह शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी, परवीन बाबी आणि नीतू सिंग अशी त्या वेळची तगडी स्टारकास्ट होती.
या सिनेमाला 42 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बी यांनी इन्स्टाग्रामवर आठवण शेअर केली आहे. 'त्या सिनेमातले अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्या आयुष्यातही अनुभवले आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच्या माझ्या पहिल्या नोकरीत मी हेच काम करत होतो. कलकत्ता कंपनीच्या कोळसा विभागात मी कामाला होतो आणि धनबाद आणि आसनसोल इथल्या कोळसा खाणींमध्ये कामही केलं होतं,' असं अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे.
View this post on Instagram
'काला पत्थर' या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी कॅप्टन विजयपाल सिंह यांची भूमिका निभावली आहे.
महेश मांजरेकरांवर झाली कर्करोग शस्त्रक्रिया; प्रकृती सुधारताच होणार कामावर रुजू
मर्चंट नेव्ही कॅप्टन असलेल्या विजयने स्वतः जहाजावर असताना 300 प्रवाशांचे प्राण धोक्यात असतानाही पळ काढला होता. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होते. समाजाकडून आणि आई-वडिलांकडूनही त्याला नाकारलं जातं. आपला भूतकाळ विसरण्यासाठी तो कोळसा खाणीत काम करू लागतो. कोळसा खाणीत दुर्घटना घडते आणि पाणी भरतं. तेव्हा अन्य कामगारांसोबत विजयही त्यात असतो. तेव्हा तो आपल्या मित्रांच्या मदतीने सर्वांना वाचवण्यात यशस्वी ठरतो, अशी सिनेमाची थोडक्यात कथा आहे.
अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला 'चेहरे' (Chehre) हा थ्रिलर सिनेमा 27 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात क्रिस्टल डिसूझा, रिया चक्रवर्ती, सिद्धनाथ कपूर, अन्न कपूर, धृतमन चॅटर्जी आणि रघुवीर यादव यांच्याही भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Bollywood