मुंबई, 05 एप्रिल : अभिनेता सुनील शेट्टी सध्या 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. या सिनेमामध्ये सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख असून सिनेमाचे निर्माते सुनील शेट्टीवर नाराज आहेत. निर्मात्यांचं म्हणणं आहे की, सुनील शेट्टी या सिनेमामध्ये जास्त प्रमाणात हस्तक्षेप करत आहे आणि त्यामुळेच 'मोतीचूर चकनाचूर'च्या निर्मात्यांनी सुनिल शेट्टीला नोटीस बजावली असल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार 'मोतीचूर चकनाचूर'चे निर्माते राजेश आणि किरण भाटिया यांनी आपल्या वकिलांमार्फत 13 मार्चला जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती. त्यात असं नमूद करण्यात आलं आहे की, मोतीचूर चकणाचूर सिनेमाच्या प्रत्येक गोष्टी बाबत शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त आमचाच असून सुनील शेट्टीकडे या सिनेमाविषयीचे कोणतेही अधिकार नाहीत. या सिनेमाविषयी कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चा करणं, रणनीती आखणं, सिनेमाच्या एडिटिंगमध्ये लक्ष घालणं किंवा या सिनेमाबाबतच्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सुनील शेट्टीला नाही. यासोबतच जर सुनील शेट्टी या सिनेमापासून दूर न राहिल्यास हे सिनेमाच्या गोपनियतेचं उल्लंघन मानलं जाईल, असा इशाराही या नोटीसमधून देण्यात आला आहे.
सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीनं हिरो या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात आथियाबरोबर सूरज पांचोलीची प्रमुख भूमिका होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर आता आथिया शेट्टी अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी सोबत 'मोतीचूर चकनाचूर'या सिनेमातून प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. आपल्या मुलगी या सिनेमात काम करत असल्यानं या सिनेमात कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये. तसंच सिनेमा चांगल्या प्रकारे बनवला जावा आणि एडिटिंग दरम्यान आथियाच्या सिनेमातील कोणत्याही दृष्याला कात्री लागू नये यासाठी सुनिल शेट्टी वारंवार सिनेमात हस्तक्षेप करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र सुनील शेट्टीनं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.