मुंबई, 17 नोव्हेंबर : मध्यंतरी दोन आठवडे 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा टीआरपी कमी झाला होता. मालिका नंबर दोनवर पोचली होती. आता गेल्या आठवड्यात ही मालिका पुन्हा नंबर वनवर आलीय. प्रेक्षकांचा कौल काय आहे, यानुसार बऱ्याचदा मालिकेत बदल केले जातात. तसा आताही एक बदल होतोय.
गुरुनाथ सुभेदारच्या विरोधात राधिका आणि शनाया जातात. दोघी एक होतात, तेव्हा काही प्रेक्षकांना ते अजब वाटलं होतं. पण आता गुरूला खरी परिस्थिती कळते. मुख्य म्हणजे शनायाचं बिंग फुटतं. गुरूनं तिला मुद्दाम खोटी बातमी दिली असते आणि ती खरी समजून शहानिशा करायला राधिका पोचते. गुरूला खरं काय ते कळतं.
राधिका ही खेळी खेळण्यामागेही एक कारण आहे. शनाया आपल्याला फसवतेय, याचा धक्का तिला गुरूला द्यायचा होता. आणि तो तिनं दिला. आता गुरूची नवी चाल मालिकेत पाहायला मिळणार आहे. अर्थात, त्याची चाल थोडे दिवस यशस्वीही होईल. पण नंतर राधिका सगळ्यांनाच धडा शिकवणार.
म्हणजे पुन्हा एकदा मालिका काही दिवस नंबर वन राहील. मालिकेच्या यशाबद्दल बोलताना अभिजीत खांडकेकर म्हणाला, ' खूप समाधान वाटतं. प्रत्येक सीन चांगला व्हावा म्हणून केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. अर्थातच हे काही कुण्या एकट्याचं श्रेय नाही. या मागे मोठी टीम असते. तुमच्या कामाचं कौतुक होणं यापेक्षा कलाकाराला अजून काय हवं?'
या मालिकेआधी अभिजीतची प्रतिमा नायकाची होती. त्याचा खलनायक आता लोकप्रिय होतोय, याची भीती नाही का वाटत त्याला? 'भीती सुरुवातीला वाटायची. लोक कसे स्वीकारतील याची,' अभिजीत सांगतो. 'पण आता बघताना छान वाटतंय. एखाद्या हिरोपेक्षा जास्तच पसंती या भूमिकेला मिळतेय. त्याचा वेगळा आनंद वाटतोय. आणि काही तरी विचार करूनच मला ही भूमिका दिली असावी. कारण मी टिपिकल खलनायक वाटतच नाही. उलट हिरो दिसताना खलनायक वठवणं वेगळं आहे. '
Photos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Game, Gurunath, Mazya navryachi bayako, Radhika, Shanaya