मुंबई, 30 ऑक्टोबर : क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Mumbai Cruise drug case) एनसीबीने (NCB) टाकण्यात आलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आता 26 दिवसांनी आर्यन खान (Aryan Khan) याची आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) सुटका झाली आहे. गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर आज (30 ऑक्टोबर 2021) आर्यन खानची कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहातून सुटका होण्यापूर्वी आर्यन खानला तुरुंग प्रशासनाकडून काही पैसे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आर्थर रोड कारागृहाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी आर्यन खान याला तुरुंग प्रशासनाने 9 हजार 750 रुपये परत केले आहेत. आर्यन खानने आर्थर रोड जेलमध्ये एकूण पाच हजार अडीचशे रुपये खर्च केले. त्यामुळे तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाने उरलेल्या रक्कमेची मोजणी करुन आर्यनला 9 हजार 750 रुपये परत केले. तुरुंगात असताना आर्यन खाल याला त्याच्या कुटुंबीयांकडून 15000 रुपये मनीऑर्डर देण्यात आली होती.
कारागृहातील कूपन सिस्टम बंद झाली आहे त्यामुळे सध्या कोणत्याही कैद्याला त्याच्या कुटुंबाच्या वतीने फक्त मनी ऑर्डर केली जाते. या मनी ऑर्डरद्वारे मिळालेल्या पैशातून कोणताही कैदी कारागृहात असलेल्या कॅन्टीनमध्ये त्याच्या आवडीचे जेवण खाऊ शकतो.
26 दिवसांनी आर्यन कारागृहातून बाहेर
2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाला. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. आज पहाटे 5.30 वाजता आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास आर्यन कारागृहातून बाहेर पडला.
जुही चावला जामीनदार
गुरुवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनासाठी जामीनदार म्हणून सेशन्स कोर्टात पोहोचली होती. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात दाखल झाले होते. मानेशिंदे यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. यावेळी जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली होती. कोर्टात जुही चावलानं आपलं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर केलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. मात्र यावेळी जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडला. त्यामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाला.
वाचा : आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; पुरावे मॅनिप्युलेट करण्याची ऑफर दिल्याचा हॅकरचा दावा
आर्यनला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. आर्यनच्या जामीनासाठी गेल्या काही दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे.
अटींचे पालन करावे लागणार
आर्यन खानला जामीन मिळाला असला तरी त्याला अटींचे पालन करावे लागणार आहे. एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये, मीडियाशी, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर एनसीबी ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drug case, Mumbai, NCB