मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Cruise Drug Case: NCB च्या धाडीआधीच किरण गोसावीनं रचला होता ‘हा’ मोठा कट

Cruise Drug Case: NCB च्या धाडीआधीच किरण गोसावीनं रचला होता ‘हा’ मोठा कट

किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात (File Photo)

किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात (File Photo)

NCB चा साक्षीदार के. पी. गोसावीचा (K. P. GOSAVI) ड्रायव्हर प्रभाकर साईल (PRABHAKR SAIL) याचं प्रतिज्ञापत्र आणि व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक नवनवीन आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत, त्यामुळे ड्रग्ज केसमधली अनेक रहस्यं उलगडली आहेत.

 मुंबई, 10 नोव्हेंबर-  NCB चा साक्षीदार के. पी. गोसावीचा (K. P. GOSAVI) ड्रायव्हर प्रभाकर साईल (PRABHAKR SAIL) याचं प्रतिज्ञापत्र आणि व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक नवनवीन आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत, त्यामुळे ड्रग्ज केसमधली अनेक रहस्यं उलगडली आहेत.

मुंबईच्या क्रूज ड्रग्ज (MUMBAI CRUISE DRUGS CASE) प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (ARYAN KHAN) अटक झाली होती. त्यानंतर या प्रकरणात रोज नव्या गोष्टी समोर येत होत्या. अनेक नवीन व्यक्तींची नावंही समोर येत होती. या पूर्ण प्रकरणामागचं सत्य काय आहे? आर्यन ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली भलताच कट रचला जात होता का? आर्यनला अटक झाल्यानंतरही काही कट रचला गेला होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं न्यूज 18ने शोधली आहेत.

के. पी. गोसावी अँड कंपनी हा एक खासगी गुप्तहेर (प्रायव्हेट डिटेक्टिव्ह) NCB च्या नावाखाली वसुलीचा हा खेळ खेळत होता. या वसुली कांडाचा पहिला पुरावा म्हणजे NEWS 18 च्या हाती लागलेलं एक व्हॉट्सॲप चॅट आहे. तीन ऑक्टोबरला चॅटवरून हे संभाषण झालं होतं. क्रूज ड्रग्ज केस प्रकरणातले NCBचे दोन महत्त्वाचे साक्षीदार के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांच्यातल्या आपापसांतल्या या संभाषणामुळे या प्रकरणातली अनेक रहस्यं उघड झाली आहेत.

के. पी. गोसावी कोण आहे?

के. पी. गोसावी सगळ्यात आधी आर्यन खानसोबतच्या एका सेल्फीमध्ये दिसला होता. आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं के. पी. गोसावी सांगत असे. पण आता तो कट रचणं आणि फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये आहे.

प्रभाकर साईल कोण आहे?

ज्या प्रभाकर साईलचा या व्हॉट्सॲप चॅटमध्ये उल्लेख आहे, तो NCBचा दुसरा साक्षीदार आहे आणि तो के. पी. गोसावीचा ड्रायव्हर होता. प्रभाकर साईलने NCB च्या दक्षता तपासणी पथकाला (Vigilance Team) एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे. या प्रतिज्ञापत्रात क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणात आर्यनची अटक आणि कथित वसुली कांडाप्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. प्रभाकर साईलनं के. पी. गोसावीसोबत झालेल्या त्याच्या व्हॉट्स ॲप चॅटची कॉपीही NCB ला दिली आहे. के. पी. गोसावीनं साईलला मेसेज करून आदेश दिल्याचं याच व्हॉट्सॲप चॅटमध्ये आहे.

क्रूझ पार्टीमध्ये NCBने छापा टाकल्यानंतरही मोठा कट शिजत असल्याचं प्रभाकर साईल आणि के. पी. गोसावी यांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून स्पष्ट होत आहे. के. पी. गोसावीनं प्रभाकर साईल याला हाजी अलीला जाऊन इंडियाना हॉटेलपाशी एका व्यक्तीला भेटून 50 लाख रुपये कॅश घ्यायला सांगितलं असं साईलच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. प्रभाकर साईल तिथे सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी पोहोचला. त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची एक गाडी आली आणि त्या व्यक्तीनं दोन बॅग्ज भरून पैसे प्रभाकर साईलला दिले, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

आर्यन ड्रग्ज प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार के. पी. गोसावी पडद्यामागे डील करत होता. गोसावीच्या सांगण्यावरून त्याचा ड्रायव्हर प्रभाकर साईल दोन बॅग्ज भरून पैसेही घेऊन आला होता. हा खुलासा प्रभाकर साईल याने स्वत: प्रतिज्ञापत्रात केला आहे. याच प्रतिज्ञापत्रामुळे आणखीही एक गूढ उकललं आहे. क्रूझ पार्टीत NCB ने धाड टाकण्याआधीच के. पी. गोसावीकडे 10 जणांची हिटलिस्ट तयार होती असा धक्कादायक खुलासा यातून झाला आहे.

गोसावीची सर्व 10 टारगेट्स हायप्रोफाइल

या कथित वसुली कांड प्रकरणातली सगळी रहस्यं जाणणारा प्रभाकर साईल यानं आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. NCB ची धाड पडण्याआधीच काही लोकांची निवड करून त्यांच्या अटकेसाठी अत्यंत नियोजित पद्धतीनं सापळा रचण्यात आला होता. के. पी. गोसावीने व्हॉट्सॲप चॅटद्वारे त्याला काही व्यक्तींचे फोटो पाठवले होते आणि या व्यक्ती क्रूझच्या ग्रीन गेटवर दिसल्या तर त्याला लगेचच कळवण्यासाठी सांगितलं होतं. साईलनं ही गोष्टही प्रतिज्ञापत्रात सांगितली आहे.

के. पी. गोसावीनं ड्रायव्हर प्रभाकर साईल याला 10 व्यक्तींचे फोटो पाठवल्याचं व्हॉट्सॲप चॅटमध्ये स्पष्ट दिसत आहे. हे सगळे चॅट्स NEWS18 च्या हाती लागले आहेत. ही टार्गेट्स म्हणजे या 10 व्यक्ती अत्यंत हायप्रोफाइल आहेत. या 10 पैकी एका व्यक्तीला साईलनं ओळखलंही होतं आणि त्यानं त्याबद्दलची माहिती व्हॉट्सॲप चॅटद्वारेच के. पी. गोसावीला दिली होती.

या प्रकरणी NCB ने 13 जणांना अटक केल्याचं 4 वाजून 23 मिनिटांनी के. पी. गोसावीनं प्रभाकर साईलला सांगितल्याचं साईलच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

वसुली कांडाचा कट

NEWS 18 च्या हाती काही फोटोही लागले आहेत. यापेकी एका फोटोत प्रभाकर सैलनं क्रूझच्या जवळ उभं राहून काढलेली सेल्फीही आहे. काही फोटोंमध्ये के. पी. गोसावी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यामागे उभा असलेला दिसत आहे. कदाचित या फोटोंमधून गोसावी स्वत: ला NCB च्या टीमचा सदस्य भासवण्याचा प्रयत्न करत असेल. ज्या व्यक्ती गोसावीला ओळखत नाहीत त्यांनी त्याला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नाही तर NCB च्या टीमचा सदस्य म्हणूनच ओळखावं अशीच त्याची इच्छा होती. पडद्यामागे रचल्या जाणाऱ्या या गुप्त कटाचा आणखी एक पुरावा म्हणजे प्रभाकर साईल आणि NCB कर्मचारी समीर सालेकर यांच्यादरम्यान झालेलं व्हॉट्स ॲप चॅट.

(हे वाचा:Kiran Gosavi : किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी – News18 Lokmat )

आपल्याला पंच म्हणजेच साक्षीदार करण्यात आल्याचं प्रभाकर साईल यानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला काहीही न सांगता त्याच्याकडून 10 कोऱ्या कागदांवर त्याच्या सह्या करून घेण्यात आल्या होत्या. ज्या वेळी ही कारवाई सुरू होती, त्या वेळी त्याच्याजवळ आधार कार्डही नव्हतं. प्रभाकर साईलनं त्याचं आधारकार्ड NCB कर्मचारी समीर सालेकरला पाठवल्याचं या व्हॉट्सॲप चॅटमधून स्पष्ट होतं.

NCB कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्याचं NCB चा स्वतंत्र साक्षीदार साईलनं स्पष्ट केलं आहे. त्यानं या सगळ्या घटना अगदी सविस्तरपणे NCB ला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रातही लिहिल्या आहेत. एक मात्र नक्की प्रभाकर साईलचं प्रतिज्ञापत्र आणि व्हॉट्सॲप चॅटमुळे क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अनेक गोष्टी उजेडात आल्या आहेत. NEWS 18 च्या हाती लागलेल्या या पुराव्यांमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात.

First published:

Tags: Aryan khan, Drugs, NCB