रिव्ह्यु :'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा'

रिव्ह्यु :'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा'

  • Share this:

अमोल परचुरे,समीक्षक

16 ऑगस्ट : तीन वर्षांपूर्वी 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' रिलीज झाला होता. कसाही असला तरी त्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. याच यशाने हुरुप आलेल्या एकता कपूर आणि मिलन लुथरा यांनी सिक्वेलचा घाट घातला. आता सिक्वेल असला तरी पहिल्या सिनेमाचा किंवा त्या कथेचा इथे काहीच संबंध नाही. बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने केवळ पहिल्या सिनेमाची पुण्याई आहे आणि तीच पुण्याई दुसर्‍या सिनेमाची 'नैय्या पार' करणार हे तर स्पष्टच आहे. त्यात अक्षयकुमार सारखा पॉवरफुल 'खिलाडी' आणि त्याचे पॉवरफुल डायलॉग्ज आहेत. दाऊद आणि मंदाकिनीच्या प्रेमप्रकरणाची आठवण आहे, बाकी इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हासुद्धा आहेत.

प्रेक्षकांना कदाचित अशी अपेक्षा असेल की, पहिल्या सिनेमाप्रमाणेच याहीवेळेस ऍक्शन आणि गँगस्टर मूव्हीमसाला बघायला मिळेल..पण या सिक्वेलमध्ये तर गँगस्टर प्रेमात पडले तर काय होईल याचीच गोष्ट आहे. भारतासाठी मोस्ट वाँटेड गँगस्टर म्हणजे दाऊद इब्राहिम... दाऊदबद्दलच्या ज्या कथा प्रसिद्ध आहेत त्यातली एखादी गोष्ट घेऊन ती फुलवायची आणि सिनेमा करायचा असाच बॉलिवूडचा ट्रेंड राहिलेला आहे, आणि हाच ट्रेंड पुढे नेलाय 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा' या सिनेमाने..सिनेमाचं नाव जसं लांबलचक आहे तसाच सिनेमाही लांबलचकच झालाय. तो सुसह्य झालाय केवळ अक्षयकुमारमुळे आणि रजत अरोराच्या चमकदार, चटकदार संवादांमुळे...

once upon a time in mumbaai dobara film review

काय आहे स्टोरी?

शोएब (अक्षयकुमार) नावाचा गँगस्टर ओमानमध्ये राहून भारतातल्या गुन्हेगारी जगाची सूत्रं हलवतोय. क्रिकेटमधल्या बेटिंगपासून ते बॉलीवूडपर्यंत सगळे निर्णय तोच घेतो एवढी त्याची दहशत आहे. अस्लमसारखे (इमरान खान) अनेक गुंड त्याच्या गँगमध्ये आहेत जे शोएबसाठी वेळप्रसंगी प्राणही देतील. पण कहानी में ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा शोएब आणि अस्लम दोघांनाही आवडते जस्मिन(सोनाक्षी सिन्हा)...शोएब, अस्लम आणि जस्मिन, तिघांनाही अर्थातच शेवटपर्यंत ही गोष्ट लक्षात येत नाही. मग गोष्ट खूप ताणून झाल्यानंतर शेवटी सगळा उलगडा होतो, मग क्लायमॅक्सला फाईट सीन आणि मग त्याग, तत्त्वं वगैरेवर भाषणबाजी...सगळा मसाला नेहमीचाच आहे. इंटरव्हलपर्यंत हा मसाला बरा वाटतो पण नंतर एकदाचा हा गुंता सोडवा आणि संपवा आता सिनेमा असंच होऊन जातं. या सगळ्या प्रेमाच्या त्रिकोणात रजत अरोराचे डायलॉग्ज चांगलीच मजा आणतात आणि इंटरव्हलनंतर सारखे आदळणारे डायलॉग्ज थोडे खुपायलाही लागतात..बरं, शोएबचं चित्रण अगदीच 'लार्जर दॅन लाईफ' केलेलं आहे, हे कॅरेक्टर दाऊदवर बेतलेलं आहे हे सामान्य प्रेक्षकांनाही ठाऊक असताना त्याला असं वलय देणं चुकीचं आहे असं वाटत राहतं.

नवीन काय?

मिलन लुथरा हा आता बॉलीवूडमध्ये सेट झालेला दिग्दर्शक म्हणायला पाहिजे, पण अजूनही एकाच छापाचं दिग्दर्शन बघायला मिळतंय. याआधीचा 'वन्स अपॉन अ टाईम' असेल किंवा 'डर्टी पिक्चर' असेल, दोन्हीमध्ये दिसलेलं ऐशीचं दशक इथेही दिसतं. गाड्या, सेट सगळ्याच गोष्टी अगदी यापूर्वीच्या सिनेमात आल्या तशाच आहेत. इथं अर्थातच सगळा भर हा अक्षय कुमारवर म्हणजेच शोएबवर दिलेला आहे, त्यामुळे बाकीच्या कॅरेक्टर्सकडे थोडं दुर्लक्षच झालंय. शोएबचं विस्तरलेलं साम्राज्य दाखवताना बराच विचार केलाय. पण मुंबईत त्याची गँग नेमकं काय करते असल्या गोष्टींचं काही चित्रण दाखवलेलं नाही. सगळा प्रेमाचाच मामला आहे, आणि हा मामला खूप ताणल्यामुळे सिनेमा कंटाळवाणा होऊन जातो.

once upon a time in mumbaai dobara film review 2

परफॉर्मन्स

या सिनेमाचा स्ट्राँग पॉईंट आहे अक्षय कुमार... मोठ्या पडद्यावरचे आपण कसे खिलाडी आहोत हे त्याने दाखवून दिलंय. त्याचा ऍपिअरन्स, मिळालेले अफलातून डायलॉग्ज सादर करण्याची स्टाईल असं सगळंच त्याने सॉलीड जमवलंय. पहिल्या भागातल्या अजय देवगणपेक्षा अक्षय इथं सरस वाटतो. अक्षय जेवढा स्ट्राँग आहे तेवढाच वीक आहे इमरान खान. 'रफ अँड टफ' रोलमध्ये तो अजूनही फीट बसत नाही आणि अभिनयातही तो खूपच मागे आहे. काही सीन्समध्ये तर सोनाक्षनेच त्याला सांभाळून घेतलंय असं वाटतं. सोनाक्षीने जस्मिनचा रोल बर्‍यापैकी निभावलाय. महेश मांजरेकर यांचा रावलही चांगला जमून आलाय. एकटा इमरान सोडला तर बाकी सगळ्याच कलाकारांनी मस्तच काम केलंय. बाकी गाणीसुद्धा नेहमीच्या छापाची आणि अजिबात लक्षात न राहणारी आहेत. कथेच्या पातळीवर सिनेमा फसल्यामुळे केवळ अभिनयासाठी 'वनटाईम वॉच' असंच म्हणता येईल...

रेटिंग - 30

 

First published: August 16, 2013, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading