फिल्म रिव्ह्यु : चेन्नई एक्स्प्रेस

फिल्म रिव्ह्यु : चेन्नई एक्स्प्रेस

  • Share this:

अमोल परचुरे,समीक्षक

09 ऑगस्ट : बॉलिवूडच्या सुपरस्टारचा हा ताजा सिनेमा...बॉलिवूडची नवी सुपरस्टार दीपिका पदुकोणचा हा सिनेमा...ज्याच्या सलग दोन सिनेमांचा शंभर कोटी रुपयांचा बिझनेस झालाय अशा रोहित शेट्टीचा हा सिनेमा, त्यात शाहरुख खान स्वत: निर्माता, रिलीजसाठी रमझान ईदचा मुहूर्त...एवढं सगळं जमून आलं असलं तरी ही 'चेन्नई एक्स्प्रेस' म्हणजे रेल्वेखात्याच्या अजब कारभारासारखं आहे. या 'चेन्नई एक्स्प्रेस'चा स्पीड स्लो आहे. एक्स्प्रेस नाही तर ती पॅसेंजर ट्रेनच वाटते.

सारखा ट्रॅक बदलणार्‍या या चेन्नई एक्स्प्रेसने प्रवास केल्यावर रिझर्वेशन केल्याचा तुम्हालाच पश्चाताप होईल. अर्थात, शाहरुखच्या फॅन्सना काही हा अनुभव येणार नाही आणि त्यांच्यामुळेच सिनेमा प्रचंड धंदा वगैरेही करु शकेल. पण अगदी खरं सांगायचं म्हणजे, ज्या शाहरुखने वयाच्या पंचवीसाव्या वर्षी 'डर' सारखा अँटी-हिरोचा रोल केला, ज्या शाहरुख खानने 'स्वदेस', 'चक दे इंडिया' सारख्या सिनेमात प्रभावी काम केलं, त्या किंग खानने 'चेन्नई एक्स्प्रेस' सारखा सिनेमा करणं हा त्याच्या सुपरस्टारपदाचा पराभव आहे. आता या वयात आणि या पदावर असताना शाहरुखकडून आणखी चांगले आणि मिनिंगफुल सिनेमांची अपेक्षा आहे, पण पब्लिक डिमांडचं कारण पुढे करत एक वायफळ सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारलेला आहे.cheenai express film review

काय आहे स्टोरी?

 

ओढून ताणून जुळवून आणलेली गोष्ट हे चेन्नई एक्स्प्रेसचं आणखी एक वैशिष्ट्य...नायकानं मनाविरुद्ध चेन्नई एक्स्प्रेसनं प्रवास करावा यासाठी लेखक आणि दिग्दर्शकानं जो आटापिटा केलाय तोच वात आणणारा आहे. मग आपलयाला कळतं की, नायिकेचा बाप हा कोणम नावाच्या गावातला डॉन आहे, मग त्याची थोडी दहशत वगैरे...नायिकेचं लग्न थंगबल्ली नावाच्या खतरनाक आणि धिप्पाड तरुणाशी ठरलंय. मग त्या थंगबल्लीची दहशत आलीच.या सगळ्या वातावरणाला घाबरलेला नायक राहुल...खरंतर त्याला रामेष्वरला जाऊन आपल्या आजोबांच्या अस्थी विसर्जित करायच्या आहेत.

 

पण तो या कोणम गावात अडकलाय. तिथून बाहेर पडण्यासाठी त्याचे आणि नायिकेचे प्रयत्न, मग पाठलाग, मग ते परत व्हिलनच्या ताब्यात, मग परत तिथूनच सुटण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात ते खरंच प्रेमात पडतात आणि मग क्लायमॅक्सला तीच ती गुंडांबरोबर लढणारा नायक... बरं, नायकाला गुंडांनी प्रचंड धुतलाय, हाडं वगैरे पार मोडून गेल्यामुळे तो बेशुद्धच पडलाय. पण, नायिकेच्या एका हाकेने त्याच्या अंगात शक्ती संचारते वगैरे..गोष्टी आणखी किती दिवस आपण बघणार आहोत, हाच प्रश्न पडतो. थोडक्यात, कथेमध्ये काहीही नावीन्य नाही. अगदी लहान मुलंही आता पुढे काय घडेल ते सांगू शकतात, शाहरुखची घाबरट कॉमेडीसुद्धा या लहान मुलांनाच आवडेल अशीच आहे.

नवीन काय?

सिंघम सोडला तर रोहित शेट्टीच्या सिनेमांमध्ये मॅड मॅड कॉमेडी असतेच... अगदी गोलमाल असो किंवा बोलबच्चन, पण चेन्नई एक्स्प्रेसमध्ये ही मॅड कॉमेडीसुद्धा मिसिंग आहे. लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या चालींवर काही गाणी बनवण्याचा प्रयत्न केलाय. या गाण्यांमुळे थोडा रिलीफ जरुर मिळतो, पण तेवढ्यापुरताच... मुख्य पात्रांशिवाय बाकी जी कॅरेक्टर्स मध्ये मध्ये दिसतात ती का आहेत असाच प्रश्न पडतो. गाड्या वगैरे उडवण्याचा खटाटोप याही सिनेमात आहेच, पण त्यात फार जोर नाही.

 

एकमेव चांगली गोष्ट म्हणजे लोकेशन्स...वाईचा भाग असेल किंवा चहाचे मळे असतील, दिसायला हा परिसर खूपच सुंदर दिसतो आणि त्याचं छायाचित्रणही अप्रतिम झालंय. दीपिकाच्या वडिलांचे गुंड चेन ओढून ट्रेन थांबवतात तो सीन अप्रतिम शूट झालाय, जो सिनेमा संपल्यानंतरही लक्षात राहतो असा आहे. बाकी एखादंच गाणं लक्षात राहतं आणि त्यावर केलेली कोरिओग्राफीसुद्धा अगदी नेहमीची वाटावी अशीच आहे. दक्षिण भारताचा फील देण्याचा बर्‍यापैकी प्रयत्न करण्यात आलाय.

 

परफॉर्मन्स

चेन्नई एक्स्प्रेसचा प्लस पॉईंट आहे दीपिका पदुकोण...शाहरुखपेक्षा नक्कीच सरस काम तिने केलेलं आहे. किंग खानची नायिका असूनही तीच यामध्ये रावडी दाखवलीये हे महत्त्वाचं...शाहरुखबरोबर विचित्र बेडसीनमध्ये तर तिने धमालच केलीये. शाहरुख तर ऍक्टींगमध्ये पंधरा वर्ष वगैरे मागे गेलाय. 'राजू बन गया जंटलमन'सारख्या सिनेमात त्याने जो बालिशपणा केला होता अगदी तसाच रोल त्याने या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये केलेला आहे.

 

शाहरुखसारख्या सुपरस्टारनं तद्दन गल्लाभरु सिनेमांच्या पंक्तीत बसावं हेच दुदैर्वी आहे. दुसर्‍याला जे चांगलं दिसतं ते आपल्याला चांगलं दिसेलच असं नाही, पण शाहरुख हे विसरला आणि हिट होण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार झाला याचंच वाईट वाटतं. बाकी सिनेमात ओळखीचे चेहरे कमीच आहेत. सिंघममध्ये जसे अनेक मराठी चेहरे होते तसे या एक्स्प्रेसमध्ये साऊथचे अनेक कलाकार आहेत.

'चेन्नई एक्स्प्रेस'ला रेटिंग-35

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2013 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading