• गप्पा आदेश बांदेकरशी

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 30, 2008 03:50 PM IST | Updated On: May 13, 2013 02:25 PM IST

    दिवाळीनिमित्त ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांना आंमत्रित करण्यात आलं होतं. सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या ' होम मिनिस्टर ' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या रुपातही त्यांनी भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. होम मिनिस्टरच्या यशात इतर कशाहीपेक्षा आदेश बांदेकरांचा साधेपणा, मोकळेपणा आणि नैसर्गिक अभिनयाचा जास्त वाटा आहे. या कार्यक्रमात आदेश बांदेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या कार्यक्रमात उलगडले गेले.' महाराष्ट्रात अगदी 60 वर्षांच्या आजींपासून ते पाच वर्षांच्या चिमुरडीपर्यंत सगळेजण मला ए... आदेश म्हणतात. यात जी आपुलकी आहे, ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी ' होम मिनिस्टर ' चे 1200 एपिसोड केले. म्हणजे 2400 घरं, आणि आजूबाजूची दहा घरं पण त्यात मोजली तर मी खूप ठिकाणी फिरलो. पण कुठेच मला विचित्र वाटलं नाही. सगळीकडे मी सहजपणे वावरला ' , असं बांदेकर यांनी सांगितलं.दिवाळीविषयी बोलताना आदेश लहानपणी साजर्‍या केलेल्या दिवाळीच्या आठवणीत हरवून गेला. ' माझं बालपण हे गिरणगावात गेलं. माझ्या बिल्डिगमध्ये 90 घरं, आणि रोज सर्वात पहिला फटाका कोण वाजवणार, हा उत्साह होता. आमची छोटीशी खोली, त्यातलं अभ्यंगस्नान, फराळ या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत. माझे आई-वडील दिवसभर नोकरीसाठी बाहेर. घरी आजी होती, पण संपूर्ण बिल्डिंगमध्ये कोणत्याही घराचे दरवाजे आमच्यासाठी कायमच उघडे होते. या सगळ्यांमधून लोकांमध्ये सहज वावरण्याची जी सवय लागली, त्याचा मला सूत्रसंचालनासाठी खूप फायदा झाला. ' , असं ते म्हणाले' आपल्याकडचे संस्कार आणि संस्कृती ही मूळातच इतकी विशाल आहे, की तीे सगळीच्या सगळी आत्मसात करणं, आपल्याला शक्य नाही. पण जमेल ते करत जावं, संस्कार आणि संस्कृती वेचत जावी, यश आपोआप मिळेल. माझे वडील मुंबईत एकटे होते, पण त्यांचा स्वभाव इतका मनमिळाऊ होता की, त्यांनी माणसं जोडली. आमच्या घरी पैसे कमी होते, पण माणुसकी इतकी भरलेली होती कोणताही पाहूणा विन्मुख गेला नाही. अर्थात त्याकाळी 9 ते 5 नोकरी होती. बराच वेळ होता. पण आज आमच्या पिढीला एवढं करणं कठीण आहे, पण त्याचे तोटे पुढची पिढी भोगते. आजी आजोबांचं प्रेम त्यांना मिळत नाही. त्यामुळे पुढची पिढी यातून धडा घेईल आणि कुठेतरी सुवर्णमध्य साधला जाईल, याचा मला विश्वास आहे ', असंही ते म्हणाले.आपल्या सामाजिक कार्याविषयी बोलताना तो म्हणाला, ' मी होम मिनिस्टरच्या निमित्ताने मी पंढरपुरात गेलो होतो. तिथे पालवी नावाची संस्था आहे. तिथे वय वर्ष एक ते अगदी 13-14 वर्षापर्यंतची मुलं होती. नंतर मला कळलं की, त्यांना एड्स झालाय आणि मी जेमतेम पुण्यापर्यंत आलो असेन आणि मला कळलं की माझ्याबरोबर खेळणार्‍या एका मुलाचा मृत्यू झाला. मग मी विचार केला की, इतर कशाहीपेक्षा त्यांच्यासाठी मला काही करता आलं, तर ते फार महत्त्वाचं असेल. त्यांची औषधं महाग असतात, उपचाराचा खर्च प्रचंड असतो. मी लोकांमध्ये वावरणारा माणूस आहे. मग माझ्या काही कार्यक्रमांचं मानधन मी त्यांना देतो, मराठी दांडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो आणि माझ्याकडून जमेल तेवढं मी करतो. '' होम मिनिस्टर ' या कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले, ' एक तर महिलांशी संबंधित कार्यक्रमात माझी निवड करणं, हे नितीन वैद्यांचं मोठं धाडस होतं. मग आम्ही विचार केला की, एक गृहिणी जी घर सांभाळते. बर्‍याचदा नोकरी करुन स्वत:चं करियरही जपते. पाहुण्यांचं स्वागत करते, अशा महिलेला जनरल नॉलेज किंवा जगाचा शोध कोणी लावला, वगैरे प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे ? , त्यापेक्षा तिच्या जिव्हाळ्याचे, साधे-सोपे प्रश्न तिला विचारता आले, तर त्याला जास्त प्रतिसाद मिळेल आणि आमच्या कार्यक्रमाच्या यशावरून आमचा निर्णय किती योग्य होता, ते स्पष्ट होतंय. '

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी