फिल्म रिव्ह्यु : हे बंध नायलॉनचे !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2016 06:12 PM IST

फिल्म रिव्ह्यु : हे बंध नायलॉनचे !

 

अमोल परचुरे, समीक्षक

अनेक वर्षांपूर्वीची विनोद हडप यांची एकांकिका, जी आता मोठ्या पडद्यावर आली. चाळीस-पंचेचाळीस मिनिटांत एक अद्भुत कथा त्यावेळी मांडली गेली. सिनेमा बनवण्याचा मोह भल्याभल्यांना होईल अशी ती कल्पना...अखेर सिनेमा बनला, पण दुर्दैवीने सिनेमा एकांकिकेच्याच अवकाशात राहिला, अद्भुत, साय-फाय सिनेमांचं जग मराठीत कधी अवतरणार ते माहित नाही. पण तेवढ्यात हा असा भन्नाट कल्पना असलेला सिनेमा आला. पण तोही नेहमीच्याच चौकटीत अडकून राहिला. कथेचा विस्तार, दिग्दर्शकीय मांडणी, टेकिंग, कलाकारांचा अभिनय, प्रत्येक बाबतीत जुनाट विचार सोडून द्यायला हवा होता. प्रेक्षकांना हेच हवं असतं या नादात आपण तोचतोच माल खपवतोय याचं भानच टीमला राहिलं नाही आणि त्यामुळेच प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात हे बंध यशस्वी झालेले नाहीत.

काय आहे स्टोरी ?

bandh आई-वडिलांसोबत तुटलेले बंध, मुलीचा आजी-आजोबांसाठी हट्ट आणि हा हट्ट पूर्ण करण्यासाठी नायकाचा अत्याधुनिक उपाय...यापेक्षा फार काही सांगत नाही. ज्यांना सिनेमा बघायचाय त्यांचा विचारही केला पाहिजे. गोष्ट पूर्णपणे नवीन आहे, पण सुरुवातीपासूनच सिनेमाशी जुळवून घेण्याची आपली धडपड सुरू राहते. नायक हा तेरा वर्षं अमेरिकेत राहून परतलाय, पण तशा खुणा दिसत नाहीत.

Loading...

अजमेरा वगैरे आडनावांचे मोठमोठे बिझनेसमन्स मिटिंगसाठी बसलेत, पण मिटिंगची जागा ऑफिससारखी वाटतंच नाही. आता यापुढे अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, पण सांगण्याचा मुद्दा हा की भव्यता ही केवळ दिसण्यापुरती नाही तर ती विचारांमध्येही असायला हवी, आणि तिथेच आपल्या इंडस्ट्रीचे प्रयत्न तोकडे पडतायत हे वारंवार दिसून येतंय. जी काही भन्नाट कल्पना आहे ती प्रेक्षकांना पटवून देण्यात किंवा त्यांना आपल्यासोबत ठेवण्यात लेखक आणि दिग्दर्शक पूर्णपणे फेल झालेत, त्यामुळे नव्याची नऊ मिनिटं झाल्यावर फार काही विशेष वाटत नाही.

परफॉर्मन्स

bandh1सिनेमाची स्टारकास्ट मोठी आणि खास आहे. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी आई-वडिलांच्या रुपात कोकणी ठसका आणायचा प्रयत्न केला. पण, शहरी रुपात त्यांनी सगळं दिग्दर्शकावर सोडून दिल्यासारखं वाटतं. त्यांची ही दुसरी भूमिकाच सिनेमा तोलून धरण्यासाठी महत्त्वाची होती, पण दिग्दर्शक दबकून राहिला असावा बहुतेक...सुबोध भावेनेसुद्धा त्याच्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये सिनेमा मारुन नेलाय.

लोकमान्य किंवा कट्यारसारखी फार मेहनत वगैरे केल्याचं जाणवलं नाही. छोट्या रोलमध्ये धमाल आणली आहे ती संजय नार्वेकरने...अस्सल ग्रामीण बाज त्याने चांगला रंगवलाय, पण सुबोध काय किंवा संजय नार्वेकर, कुणाचीच व्यक्तिरेखा नीट फुलवलीच नाहीये, कागदावरच मेहनत कमी पडल्यामुळे पुढचा सगळा डोलाराच डळमळीत झालाय.

रेटिंग 100 पैकी 40

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2016 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...