अमोल परचुरे, समीक्षक
हायवे सिनेमाचे टायटल्स सुरू होतात, आणि तिथूनच आपण हायवेवरुन भरधाव निघतो, इतर असंख्य प्रवाशांसोबत, कारण दिग्दर्शकाने टायटल्सलाच आपल्याला गाडीत घातलेलं असतं. मराठीत बर्याच काळानंतर इतके सुंदर आणि अर्थपूर्ण टायटल्स बघायला मिळाले. सुरुवातीलाच हे सांगायला पाहिजे की खर्या अर्थाने उमेश आणि गिरीश कुलकर्णी या जोडीनं पारंपरिक चित्रकल्पनांना छेद देत नव्या विचारांचा, नव्या पर्वातला एक अतिशय आधुनिक सिनेमा जन्माला घातलेला आहे.
या 'हायवे'वरचा प्रवास आपल्याला विचारात पाडतो. पडद्यावरचा जो एक समृद्ध अनुभव आपण घेतलेला असतो त्याचे वेगवेगळे अर्थ लावायला सुरुवात करतो. प्रेक्षकांच्या विचारप्रक्रियेला चालना देण्याचं हे जे काम आहे ते उमेश-गिरीशने अफलातून पद्धतीने आणि कसलाही आव न आणता केलेलं आहे. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवांचे उमेशचे तुकडे एकत्र करुन त्यावर गिरीशने अख्खा सिनेमा लिहीणं हीसुद्धा एक कमालच आहे आणि ती कमाल प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवणं हे एक्स्प्रेस हायवेवर टोल देण्याइतकंच अनिवार्य आहे.
काय आहे स्टोरी ?
हायवे ही पूर्णपणे रोड मूव्ही आहे, कारण 98 टक्के सिनेमा हा रोडवर, गाडीमध्येच घडतो. मुंबईहून काही प्रवासी पुण्याकडे निघालेले आहेत. कुणी कूल कॅबमधून, कुणी हायर केलेल्या कारमधून, कुणी स्वत:च्या कारमधून, कुणी ट्रकमधून... वाहनं वेगवेगळी आहे, रस्ता एकच आहे... माणसं पुढेपुढे जातायत, पण मनात आत कुठेतरी ती मागेमागे चाललेली आहेत. महागडे टोल भरुन वेगवान प्रवास होतोय, पण माणसा-माणसांच्या संबंधांचा प्रवास कुठेतरी संथ झालाय.
गाडीच्या आरशातून सतत मागून येणार्या गाडीकडे बघत असताना स्वत:च्या आत डोकावून बघायला वेळच नाहीये...अर्थात, हा एक अर्थ झाला, असे अनेक अर्थ लावून या 'हायवे'चं रसग्रहण करता येईल, एवढा आशय यात ठासून भरलेला आहे. अनेक प्रतीकांमधून, हलक्या-फुलक्या संवादांमधून आणि प्रसंगांमधून हा आशय मांडण्यात आलाय.
नवीन काय ?
गाड्यांमध्ये बसून प्रवास करणारे प्रवासी, त्यांच्यात सुरू असलेले संवाद, हे टिपण्याचं काम कॅमेरामनने कशा कौशल्यानं केलंय हे बघणं हासुध्दा सुंदर अनुभव आहे. सिनेमा हा ज्यांच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे अशांसाठी, सिनेमा हे ज्यांच्यासाठी मनोरंजनाचं माध्यम आहे त्यांच्यासाठीही ही तांत्रिक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करणं हाच आनंदाचा भाग आहे. तसंच साऊंडचं सांगता येईल. बंद कारमधून हायवेवर प्रवास करताना जे रहदारीचे आवाज येतात ते तसेच्या तसे टिपणं आणि ते सवयीचे आवाज थिएटरमध्ये बसून आपल्या कानावर पडणं यातली मजा अनुभवायलाच हवी...
परफॉर्मन्स
लेखन, दिग्दर्शन, एडिटिंग या सगळ्यावर कळस चढवलाय तो कलाकारांनी... यामध्ये भूमिकेची लांबी किती हा निकषच नाही, मुंबई-पुणे प्रवासात जेवढा वेळ वाट्याला आलाय, त्याचं या कलाकारांनी सोनं केलंय. सतीश आळेकर ते नागराज मंजुळे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा ते रेणुका शहाणे, विद्याधर जोशी यांच्यापर्यंत...गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, सुनील बर्वे सगळेजण नव्या दमानं प्रवासाला उतरल्यासारखे... मागचं सगळं मागे ठेवून त्यांनी केलेलं काम हे त्यांच्या करिअरमधलं सर्वोत्कृष्ट काम ठरलंय. हायवेचं म्युझिकही असंच वेगळ्या वळणाचं, दीर्घकाळ कानात रेंगाळणारं, अगदी सिनेमाच्या विषयासारखंच... न संपणार्या हायवेसारखं, या हायवेबद्दल बराच वेळ बोलता येऊ शकतं, पण सध्या एवढंच म्हणतो, ही नवी आणि प्रगल्भ चित्रभाषा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा...
रेटिंग 100 पैकी 90
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |