सस्पेन्स, ड्रामा आणि थ्रिलरने भरपूर 'बेबी' !

सस्पेन्स, ड्रामा आणि थ्रिलरने भरपूर 'बेबी' !

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

दहशतवाद या विषयावर आतापर्यंत हिंदीत अनेक सिनेमे आलेले आहेत, पण 'बेबी' हा सिनेमा त्या सिनेमांपेक्षा वेगळा आणि पॉवरफुल आहे. याचं क्रेडिट दिग्दर्शक नीरज पांडेला द्यावंच लागेल. नीरज पांडे हा एक असा दिग्दर्शक आहे जो विषयाला आणि आशयाला महत्त्व देतो. 'वेन्स्डे' आणि 'स्पेशल छब्बीस' हे सिनेमांचा उल्लेख झाला की, त्यातला विषय आपल्याला आधी आठवतो आणि नंतर कलाकारांची अदाकारी आठवते. बेबी या सिनेमाचंही तसंच आहे. नाव थोडं विचित्र वाटत असलं तरी दोन तास चाळीस मिनिटांत नीरज पांडे दिल्ली, मुंबई, पाकिस्तान, नेपाळ, इस्तंबूल, सौदी अरेबिया अशी सफर घडवून आणतो. सिनेमा बघत असताना आपण सस्पेन्स, ड्रामा, थ्रिलर यांनी भरलेली कादंबरीच वाचतोय की, काय ?, असा अनुभव येत राहतो आणि या कमाल अनुभवासाठी बेबी पाहिलाच पाहिजे असा आहे.

काय आहे स्टोरी ?

baby45645मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक स्पेशल स्क्वॉड तयार करण्यात आलाय. या स्क्वॉडमधले मेंबर हे जीवावर उदार होऊन दहशतवादाशी लढतायत, पण जर त्यांना काही झालं, कुठे दगाफटका झाला तर भारत सरकार त्यांची जबाबदारी घेणार नाही हे आधीच ठरलेलं.. हे पथक टेस्ट म्हणून पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलंय, जर परिणाम दिसला तरच या पथकाचं काम पुढे सुरू राहणार आहे आणि म्हणूनच त्याला 'बेबी' असं नाव देण्यात आलंय. मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमधून छुप्या पद्धतीने चाललेल्या दहशतवादी कारवाया, या कारवायांना पाकिस्तानमधून मिळणारं बळ, नेपाळसारख्या शेजारी देशांमध्ये लपून दहशतवाद्यांना होणारी मदत असं सगळं नेटवर्कच नीरज पांडेने सिनेमात उघड केलंय. लख्वीसारखे दहशतवादी पाकिस्तानमध्ये बसून कारभार करतात वगैरे गोष्टी आपण ऐकून असतो पण त्याचं अगदी वास्तववादी चित्रण बेबीमध्ये बघायला मिळतं. दिल्लीच्या सरकारी यंत्रणेचंही मजेदार वर्णन सिनेमात आहे. गरजेपुरते संवाद, आवश्यक तेवढीच हाणामारी, हिरोगिरीला फाटा अशा वैशिष्ट्यांमुळे बेबी इतर सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो.

परफॉर्मन्स

baby34535सिनेमाच्या पटकथेवर खूप मेहनत घेतलेली आहे, पात्रांची ओळख करुन देण्यातही फार वेळ घालवलेला नाही. शार्प एडिटिंग आहे, सुंदर फोटोग्राफी आहे, कुठेही सिनेमा रेंगाळलेला नाहीये. इंटरव्हलआधी एक गाणं तेवढं अनावश्यक वाटतं, पण तेवढी एक गोष्ट सोडल्यास बाकी पूर्णवेळ सिनेमा गुंतवून ठेवणारा आहे. अक्षय कुमार, डॅनी, के.के.मेनन, रेहमान नाझ, तापसी पन्नू, सुशांत सिंग या सर्वच कलाकारांचा अभिनय एकदम तगडा आहे. राणा डुगुबाती आणि अनुपम खेर हे तसे छोट्या रोलमध्ये आहेत. पण राणाचा 'हल्क' अंदाज आणि अनुपम खेर यांचं विनोदी कॅरेक्टर यामुळे सिनेमात चांगला रिलीफही आहे. तापसी पन्नूच्या ऍक्शन सिक्वेन्सला प्रेक्षकांच्या नक्की टाळ्या मिळणार आहेत. एकंदरित, एका थरारक पटकथेत ड्रामा, ह्युमर आणि ऍक्शनचा व्यवस्थित वापर करुन एक जबरदस्त सिनेमा नीरज पांडेने सादर केलेला आहे.

रेटिंग 100 पैकी 80

Follow @ibnlokmattv

First published: January 23, 2015, 10:23 PM IST

ताज्या बातम्या