मसालेदार 'हॅपी न्यू इयर'

मसालेदार 'हॅपी न्यू इयर'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

'हॅपी न्यू इयर'या नावाचा कसलाही संबंध नसलेला फराह खानचा हा एक सिनेमा...सिनेमात शाहरुख खान असला की मग प्रेक्षकांना गृहित धरुन हव्या त्या कथेवर कसाही सिनेमा बनवला तरी तो सुपरहिट होऊ शकतो असा फराह खानला ठाम विश्वास असावा. 'तीस मार खान' नंतर जशी टीका, तशी पुन्हा होऊ नये म्हणून तिने सगळी खबरदारी घेतलेली आहे. शाहरुख असूनही बड्या कलाकारांची फौजही सिनेमात आहे. इंग्लिश सिनेमांमध्ये नेहमी चालणारा हिरेचोरीचा फॉर्म्युला तिने वापरलाय आणि 'ओशन्स इलेव्हन'सारख्या सिनेमांची देसी आवृत्ती तिने सादर केलीये.happy_news_year_32 भव्यता हे एक सिनेमाचं वैशिष्ट्य ठरू शकेल, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दुबईचा सुंदर नजारा पेश करण्यात आलाय. पण जसा भव्यतेचा विचार केलाय तसाच कथेवरही केला असता तर बरं झालं असतं. हिर्‍यांची चोरी करणं, त्याचं प्लॅनिंग, प्रत्यक्ष चोरी हे सगळंच पोरखेळासारखं वाटतं. येणारा प्रेक्षक हा बालबुद्धी असलेला आहे अशाच थाटात सिनेमा बनवण्यात आलाय. अर्थात, कितीही टुकार सिनेमा असला तरी तो 100 किंवा 200 कोटी रुपये आरामात कमावू शकतो हे आपल्याच प्रेक्षकांनी यापूर्वी सिद्ध केलंय त्याचाही हा परिणाम असावा...

काय आहे स्टोरी ?

वडिलांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी चार्ली अर्थात शाहरुख खान हिरे चोरीचा आणि व्हीलनला म्हणजे जॅकी श्रॉफला अद्दल घडवण्याचा एक प्लॅन बनवतो. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी तो आणखी पाचजणांची फौज जमवतो. यात एक हॅकर आहे, तिजोरी फोडणारा एक्स्पर्ट आहे, बॉम्ब बनवणारा एक्स्पर्ट आहे, एक बार डान्सरसुद्धा आहे... बार डान्सर आहे कारण यात वर्ल्ड डान्स कॉम्पिटीशन आहे. म्हणजे या सिनेमात काय काय आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. अत्याधुनिक सुरक्षायंत्रणेला भेदण्यासाठी चार्ली जो प्लॅन आखतो तो अजिबात ब्रिलियंट नाहीये, पण लेखक-दिग्दर्शकाला ते सगळं खूप इंटेलिजंट वाटलं असणार.. बरं, लिखाणात काही हुशारी नाहीच आहे, आणि त्यात इंटरव्हलनंतर सिनेमा खूप बोअर होतो. आता संपवा लवकर अशीच आपली अवस्था होते.

परफॉर्मन्स

happy_new_34सिनेमात शाहरुख आहे आणि सिनेमाचा प्रोड्यूसरही शाहरुखच आहे, त्यामुळे हा 'हॅपी न्यू इयर' फक्त आणि फक्त शाहरुखचाच सिनेमा आहे. शाहरुखच्या खालोखाल धमाल आणते ती दीपिका पदुकोण...सोनू सूद दिलेलं काम इमानदारीने करतो, बोमन इराणीने तर मिळालेला रोल फुल्ल एंजॉय केलाय. बिचारा वाटतो तो अभिषेक बच्चन... डबल रोल असूनसुद्धा त्याला दीपिकापेक्षा कमी स्क्रीन प्रेझेन्स मिळालाय. 'धूम'पेक्षाही वाईट अवस्था त्याची या सिनेमात झालीये. बाकी सिनेमाबद्दल बोलायचं तर कला दिग्दर्शक शशांक तेरे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

hny_154 त्यांच्या टीमने खरंच कमालीचं काम केलेलं आहे. गाण्यांबद्दल बोलायचं तर 'मनवा लागे' हे गाणं अप्रतिम जमून आलंय. या सिनेमाच्या निमित्ताने एक सहज सुचलेली गोष्ट... जॅकी श्रॉफ आणि शाहरुख यांनी आत्तापर्यंत तीन सिनेमात एकत्र काम केलंय, 'किंग अंकल', 'त्रिमूर्ती', 'वन टू का फोर' आणि हे तीनही सिनेमे फ्लॉप होते. 'हॅपी न्यू इयर'सुद्धा त्या काळात आला असता तर नक्की फ्लॉप गेला असता, पण आता बॉलीवूडची गणितं बदलली आहेत.त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमानेसुद्धा करोडो रुपयांची कमाई केली तरी आश्चर्य वाटणार नाही.

रेटिंग 100 पैकी 60

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2014 05:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading