फिल्म रिव्ह्यु : 'मेरी कोम'

फिल्म रिव्ह्यु : 'मेरी कोम'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

भारतीय चित्रपट इतिहासातील 'मेरी कोम' ही अतिशय महत्त्वाची जीवनकहाणी आहे. मेरी कोमचा एक स्त्री म्हणून संघर्ष आणि अनेक अडथळ्यांवर तिने केलेली मात ही सत्यकथा पडद्यावर मांडत असताना ती प्रेरणादायी होणं अतिशय गरजेचं होतं, पण तसं न होता मेरी कोम हा सिनेमा एक एंटरटेनिंग गोष्ट बनून राहिलेला आहे. मेरी कोमचा जीवनसंघर्ष अतिशय फिल्मी पद्धतीने मांडण्यात आलाय आणि हेच या सिनेमाचं आणि मेरी कोमचं सुद्धा दुदैर्वच म्हणावं लागेल.. मेरी कोम बघायला जाताना 'भाग मिल्खा भाग'सारख्या अपेक्षा घेऊन गेलात तर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो. सिनेमाच्या सुरुवातीलाच एक सूचना आहे, हा सिनेमा मेरी कोमच्या जीवनातील काही प्रसंगांवर आधारित आहे, म्हणजे इथेच लक्षात येतं की, हा काही जीवनपट नाही तर दोन तासात जेवढं जमेल तेवढाच पट दाखवण्याचा प्रयत्न असणार आणि तसंच होतं. थोडं वेगळ्या शब्दात सांगायचं तर हॉलिवूडच्या रेजिंग बुल सारख्या सिनेमापेक्षा हा मेरी कोम सिनेमा रॉकीसारख्या सिनेमांशी नातं सांगतो. अर्थात, जरी फिल्मी आणि मेलोड्रॅमॅटिक गोष्टी असल्या तरी प्रियांका चोप्राचा अभिनय हे सगळं विसरायला लावतो. मेरी कोम...पत्नी, आई आणि चॅम्पियन बॉक्सर तीन रुपांमध्ये प्रियांकाने अभिनयाची कमाल केलेली आहे.

काय आहे स्टोरी ?

mary kom newपाच वेळा बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल विजेती मेरी कोम...बॉक्सिंगमध्ये जाण्यासाठी वडिलांचा असलेला विरोध, सूडबुद्धीने काम करणारी स्पोर्टस फेडरेशन आणि प्रसुतीकाळातलं आजारपण अशा अनेक अडचणींवर मेरी कोमने कशी मात केली आणि बॉक्सिंगमध्ये तिने कसं जोरदार कमबॅक केलं याची ही गोष्ट आहे. या तिच्या प्रवासात नवरा ऑनलर कोमची मिळालेली साथ खूप महत्त्वाची आहे. हा सगळा प्रवास दोन तासांच्या सिनेमात एकवटणं तसं कठीण आहे पण तरीही सुयोग्य घटनांची निवड करुन चांगला प्रेरणादायी सिनेमा नक्कीच तयार झाला असता. प्रत्यक्षात, पटकथा लिहीताना सतत एंटरटेनमेंटचाच विचार झाला की काय असा सिनेमा बघून संशय येतो. मेरी कोमला जुळी झाल्यानंतरचा भाग प्रभावी झालाय, पण हे सातत्य संपूर्ण सिनेमात दिसत नाही.

नवीन काय ?

mary kom 3मेरी कॉमसारख्या भारतासाठी एक ऍसेट असलेल्या व्यक्तिमत्वावर कलाकृती तयार होत असताना काही भान बाळगलं जावं अशी अपेक्षा असतेच. फारच थोड्या प्रमाणात ही अपेक्षा पूर्ण झालेली दिसते. मेरी कोम आणि तिचा नवरा यांच्यातील समजुतीच्या नात्याचं महत्त्व सिनेमात मोठं आहे. भारतीय समाजात नवर्‍याने बायकोची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तिला पूर्ण साथ द्यावी हे तसं दुर्मिळ चित्र मेरी कोम सिनेमात आणखी ठसठशीतपणे यायला हवं होतं.

mary-kom3दर्शनकुमार या अभिनेत्याने मेरी कोमच्या नवर्‍याचा रोल खूपच समंजसपणे केलेला आहे, पण घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळण्याचं काम एक पुरुषसुद्धा समर्थपणे करू शकतो हा मेसेज परिणामकारकपणे पोचवणं खूप आवश्यक होतं. त्यात लेखक-दिग्दर्शकाला अपयश आलंय. मेरी कोमच्या कोचच्या भूमिकेत आहेत सुनील थापा..बॉक्सिंग कोचसाठी आवश्यक असलेली शरीरसंपदा त्यांच्याकडे आहे, पण मेरी कोमला बॉक्सिंगचं मर्म समजावून सांगताना गरजेची असलेली अभिनयाची समज थोडी कमी आहे. हॉलीवूड सिनेमांच्या प्रेक्षकांना कदाचित मिलियन डॉलर बेबीमधला हिलरी स्वँकचा कोच क्लिंट इस्टवूड आठवू शकेल, पण तशी तुलना करणं योग्य ठरणार नाही, कारण मेरी कॉम तसाही कमर्शिअल सिनेमांच्या यादीतलाच एक सिनेमा आहे.

परफॉर्मन्स

मेरी कोमचा स्पोर्टस फेडरेशनबरोबर जो संघर्ष दाखवण्यात आलाय तो बर्‍यापैकी वास्तववादी वाटतो. आपल्या देशात क्रिकेट वगळता इतर खेळांना मिळणारी सापत्न वागणूक या सिनेमातही अधोरेखित करण्यात आलेली आहे. स्पोर्टस फेडरेशनमध्ये असलेल्या माणसांची मानसिकता खेळाडूंच्या अडचणीत भरच टाकत असते. याचा सामना मेरी कोम कशी करते हा भाग प्रभावी वाटतो.

Priyanka_mary

मेरी कोमच्या संघर्षमय आयुष्यावर 'भाग मिल्खा भाग' पेक्षाही आणखी दर्जेदार आणि पुढच्या वर्षी ऑस्करला पाठवता येईल अशा तोडीचा सिनेमा नक्कीच बनू शकला असता पण ही संधी ओमंग कुमार या दिग्दर्शकाने अक्षरश: वाया घालवली आहे. तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचं तर बॉक्सिंग रिंगमधील महत्त्वाच्या दृश्यांच्यावेळी कॅमेरा सतत शेक होणं हे खटकत राहतं. एडिटिंग आणि टेकिंगमधल्या खटकणार्‍या अशा अनेक त्रुटी सांगता येतील. पण त्यापेक्षा शेवटी एवढंच सांगतो की केवळ प्रियांका चोप्राच्या अभिनयासाठी एकदा हा सिनेमा पाहू शकतो, मेरी कोमची जीवनकहाणी समजून घ्यायची असेल तर तिची बायोग्राफी वाचता येईल.

रेटिंग 100 पैकी 50

Follow @ibnlokmattv

First published: September 6, 2014, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading