फिल्म रिव्ह्यु : 'एंटरटेनमेंट'

फिल्म रिव्ह्यु : 'एंटरटेनमेंट'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

एंटरटेनमेंट... सिनेमावेड्या भारतीय प्रेक्षकांची एंटरटेनमेंट करण्याचा वसा घेतलेल्या बॉलीवूडने सध्या एकापाठोपाठ एक रद्दड विनोदी सिनेमे आणायचा सपाटा लावलेला आहे. विनोदाचा दर्जा कितीही खालावलेला असला तरी हे सिनेमे चालतात, शंभर-दोनशे कोटी रुपये कमावतात आणि मग त्याच प्रकारचे सिनेमे येत राहतात. कितीही सकस आहाराचा आग्रह धरलात तरी जंक फूडच जास्त विकलं जातं त्यातलाच हा प्रकार..एंटरटेनमेंट हा सिनेमा तर साजिद-फरहाद या लेखक जोडीचा आहे. entertenment23या जोडीने 'बोलबच्चन', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'हिम्मतवाला','रेडी', 'गोलमाल 3'..असे दणदणीत हिट असलेले भयंकर विनोदी सिनेमे लिहिलेले आहेत. आता एंटरटेनमेंट पासून त्यांनी दिग्दर्शनातही उडी घेतलीये. इतके दिवस त्यांना काही प्रमाणात दिग्दर्शकाची लुडबूड सहन करावी लागत होती पण आता तर स्वत:च दिग्दर्शक असल्यामुळे मोकळं रानच मिळालंय. खरंतर, चटपटीत पीजे लिहीण्यात साजिद-फरहाद ही जोडी खूप प्रसिद्ध आहे, पण फक्त असे पीजे लिहून चांगला सिनेमा बनतो असं नाही..एंटरटेनमेंटमध्ये हेच झालंय. इंटरव्हलपर्यंत आपण हा सिनेमा सहन करतो, काही ठिकाणी खदाखदा हसतो देखील. पण इंटरव्हलनंतर आपण हसणंच विसरतो.

काय आहे स्टोरी ?

entertenmentजगण्यासाठी वाट्टेल ते काम करणार्‍या अखिल लोखंडेची ही गोष्ट आहे. अचानक या अखिलला समजतं की बँकॉकमध्ये ज्या अब्जोपती पन्नालाल जौहरीचं निधन झालंय तेच त्याचे खरे वडील आहेत. संपत्तीचा एकमेव वारस आपणच या भ्रमात हा अखिल पोचतो बँकॉकला, जिथे गेल्यावर त्याला कळतं की, पन्नालालचा वफादार कुत्रा एंटरटेनमेंट याच्या नावे सगळी संपत्ती करण्यात आलेली आहे. मग पुढे या एंटरटेनमेंटची आणि अखिलची दुष्मनी, मग दोस्ती, मग व्हीलनची एंट्री आणि एंटरटेनमेंटच्या मदतीने व्हिलनशी अखिलचा सामना असा सगळा खेळ आहे. या खेळात पाठलाग, पळापळ, इलेक्ट्रीकचा शॉक लागणं, नावाचे गोंधळ, गैरसमजुतीचा विनोद असे सगळे प्रकार आहेत. अखिलचा मित्र जुगनू हे सिनेमातलं एकमेव जमून आलेलं विनोदी पात्र आहे. ही जुगनूची भूमिका केलीये कृष्णाने.. बोलताना सतत सिनेमाच्या आणि कलाकारांच्या नावांचा वापर करणारा जुगनूचे संवाद मस्त जमलेले आहेत आणि तेवढाच बाकी सिनेमा फसलेला आहे.

परफॉर्मन्स

Its_Entertainment3फुटकळ विनोदांचा भडिमार आणार्‍या एंटरटेनमेंट सारख्या सिनेमांमध्ये हल्ली एक पॅकेज असतं. मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर असे कलाकार या पॅकेजमध्ये तुम्हाला मिळतात. हे दिग्गज कलाकार कामही मनापासून करतात त्यामुळे त्यांचे सीन्स बघताना फार कंटाळा येत नाही, पण या सिनेमात विजयराज आणि सोनू सूद यांना कॉमेडी व्हिलनगिरी करायला लावलीये, जी अजिबात जमलेली नाही. बरं, सिनेमात तमन्ना नावाची हिरॉईनपण आहे. अशा सिनेमात हिरॉईन ही फक्त नावालाच आणि नाचगाण्यांपुरतीच असते, तशीच ती यातही आहे. अक्षयकुमार मात्र अजूनही आपली कॉमेडी एनर्जी टिकवून आहे. हेराफेरीपासून सुरू झालेला कॉमेडी सिलसिला त्याने चांगलाच टिकवून ठेवलाय.

रेटिंग 100 पैकी 50

Follow @ibnlokmattv

First published: August 9, 2014, 5:33 PM IST

ताज्या बातम्या