News18 Lokmat

फिल्म रिव्ह्यु : 'अनवट'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2014 11:07 PM IST

फिल्म रिव्ह्यु : 'अनवट'

अमोल परचुरे, समीक्षक

अनवट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितले जातात...अनवट म्हणजे खूप वेगळा किंवा अनवट म्हणजे सहजी वापरात नसलेले राग किंवा गाण्याच्या चाली...आता अनवट सिनेमा बनवताना यातलं गजेंद्र अहिरेला काय अपेक्षित होतं ते माहित होतं ते काही सांगता येणार नाही, पण अनवट या शब्दामुळे सिनेमाच्या प्रकृतीबद्दल जो काही अंदाज आपण बांधतो त्यातलं काहीच सिनेमात दिसत नाही, जाणवत नाही आणि भिडतही नाही. 4anvat

मुळातच मराठी सिनेमे थरार आणि रहस्य यात कमी पडतात, हा खेळ सावल्यांचा सारखे काही सन्माननीय अपवाद आहेत, पण एरवी तंत्रज्ञान सुधारल्यानंतरसुद्धा हॉरर सिनेमांची एक ठरलेली मांडणी असते आणि तीच मग सारखी बघावी लागते. अनवटमध्ये ही मांडणी बदलायचा प्रयत्न झालाय हे मान्य करावं लागेल. हॉरर सिनेमांसाठी आवश्यक असलेली वातावरणनिर्मिती सिनेमात दिसते, पण पटकथेमध्ये थरार नसल्यामुळे सगळीच मेहनत फुकट गेल्यासारखी वाटते. पुढे नेमकं काय होणार याची उत्सुकता ताणली जाणं अशा सिनेमांसाठी खूप महत्त्वाचं असतं, नेमकी त्याचीच उणीव अनवटमध्ये जाणवते.

काय आहे स्टोरी ?

साधारण 1975 च्या आसपास एक नवविवाहित दांपत्य कोकणातल्या कुठल्यातरी गावात दाखल होतं. विनय आणि मधुरा... विनय हा डॉक्टर आहे आणि एक वर्ष खेड्यात राहुन रुग्णांची सेवा करण्यासाठी तो इथे आलाय. मधुराला निसर्गाची आणि फोटोग्राफीची खूप आवड आहे. कोकणात आल्यावर ते एका जुन्या वाड्यात येऊन राहायला लागतात. एक बाई या वाड्याची देखभल करतेय. डॉक्टर विनय एका स्थानिक सहाय्यकाच्या मदतीने दवाखान्यात काम सुरू करतो. anvat_33

Loading...

नंतर वाड्यामध्ये मधुराला विचित्र अनुभव यायला लागतात. या भीतीदायक अनुभवांमुळे मधुराला प्रचंड मानसिक त्रास होत असतो. विनय आणि मधुराला जेव्हा यामागची कारणं समजतात तेव्हा विनय त्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करतो, पण यातूनच या जोडप्यापुढे मोठं संकट उभं राहतं आणि मग शेवटी सगळ्याचा उलगडा होतो. अनवटच्या पटकथेमध्ये बर्‍याच त्रुटी आहेत. एका ठराविक शेवटाकडे जाईपर्यंत ज्या ज्या गोष्टी दाखवण्यात येतात, त्या प्रसंगांचं प्रयोजन हे केवळ रहस्य निर्माण करण्यासाठी आहे हे लक्षात येतं. शेवटी जो उलगडा होतो त्याच्याशी या प्रसंगांचा संबंध जोडला तर तिथेसुद्धा प्रेक्षकाची फसगतच होते.

नवीन काय ?

अनवटचं पार्श्वसंगीत हे खूपच भडक झालेलं आहे. ऐंशी टक्के कथित हॉरर सीन्समध्ये हॉरर काहीच नाही, पण पार्श्वसंगीताचा असा मारा

केलाय की, सतत काहीतरी घडेल असं वाटत राहतं, पण फार रोमांचकारी वगैरे असं काही घडत नाही. सिनेमाच्या लोकेशनबद्दल तेच सांगता येईल. गाण्यांबद्दल बोलायचं तर हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेली दोन अजरामर गाणी सिनेमात आहेत. 'तरुण आहे रात्र अजुनी' हे गाणं शंकर महादेवनच्या आवाजता आहे तर 'ये रे घना' हे गाणं विभावरी आपटे यांनी म्हटलंय. ही गाणी अप्रतिमच झालेली आहेत, पण सिनेमाच्या कथेत ती थोडी खटकतात. पण एक मात्र खरं, सिनेमा संपल्यावर शंकरच्या आवाजातलं गाणंच सतत आठवत राहतं.

परफॉर्मन्स

12anvatगजेंद्र अहिरेच्या सिनेमांमध्ये नेहमीच कथाकल्पना खूपच तगडी असते, चमकदार असते. पण त्यावर अख्खा सिनेमा फुलवताना बर्‍याचदा घाई झालेली दिसून येते. अनवटमध्ये कोकण दिसतं, पण कोकणातला माणूस दिसत नाही, विनयच्या दवाखान्यात तो कधीच पेशंट बरोबर दिसत नाही, कोकणातली बोली ऐकू येत नाही. उलट, इंटरव्हलनंतर डॉक्टर विनयला धमक्या देणारा गावकरी हा पश्चिम महाराष्ट्रातला वाटतो. असो, गजेंद्रला नेहमीच चांगल्या कलाकारांची साथ मिळते, अनवटमध्ये आदिनाथ आणि उर्मिलाची जोडी आहे, पण डॉक्टर विनयच्या रोलमध्ये आदिनाथ थोडा लहान वाटतो.

उर्मिलाचा अभिनय खूप चांगला झालाय. मकरंद अनासपुरे या सिनेमात सरप्राईझ पॅकेजसारखा असेल असे दावे केले गेले होते, पण तसं काहीच नाही, मकरंद केवळ विनोदी भूमिकेत नाहीये एवढंच. तसा तर तो सुंबरान सारख्या सिनेमातही गंभीर भूमिकेत होता. किशोर कदमसारख्या अभिनेत्याने हा रोल का स्वीकारला असेल असा प्रश्न पडतो आणि त्याला दिग्दर्शकाने वाया घालवला याचं दु:खही होतं. विभावरी देशपांडेची भूमिका लिहितानासुद्धा त्यात बर्‍याच चुका राहून गेल्यात.

रेटिंग 100 पैकी 40

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 11:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...