फिल्म रिव्ह्यु : 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'

फिल्म रिव्ह्यु : 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' म्हणजे आधुनिक काळातला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'... डीडीएलजे जर 2014 मध्ये घडला तर काय होईल, कसं होईल या प्रश्नांची उत्तरं या सिनेमात मिळतील. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' रिलीज होऊन एकोणीस वर्ष झाली, या मधल्या काळात प्रेमकथा बदलल्या, हीरो-हिरोईन, त्यांची स्टाईल सगळंच बदललं आणि आता या नव्या जमान्यात राज-सिमरनच्या जागी आले हम्प्टी शर्मा आणि काव्या प्रताप सिंग...'दिलवाले दुल्हनिया...'मध्ये शाहरुख-काजोल जोडीने प्रेमकथेचा नवा अध्याय लिहीला होता, जो अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे.

098humpty 'दिलवाले दुल्हनिया...'ची जादू विसरणं शक्यच नाही, अशावेळी पुन्हा एक नवा अध्याय लिहून 'दिलवाले दुल्हनिया...' ला ट्रिब्यूट देण्याचा खटाटोप करण जोहर आणि मंडळीेंनी केलेला आहे. 'दिलवाले दुल्हनिया...'ला सलाम करण्यासाठी सिनेमा बनवायचा, त्यात धर्मा प्रॉडक्शन स्टाईलचा सगळा मसाला भरायचा, म्हणजे लग्नातली गोड गोड धामधूम आणि गे जोक्स वगैरे...आणि इंटरेस्टिंग जोडी घेऊन सिनेमा सादर करायचा.

'स्टुडंट ऑफ द इयर'मधले वरुण धवन आणि अलिया भट्ट यांची जोडी आहे. 'दिलवाले दुल्हनिया...' पेक्षा यात वेगळं आणि आधुनिक काय आहे? , 'दिलवाले दुल्हनिया...'मध्ये लग्न होण्यापूर्वी एकदा मैत्रिणींबरोबर धमाल करता यावी यासाठी काजोल युरोप ट्रीपवर जाते आणि इथे लग्नाच्या शॉपिंगसाठी अंबालामधील हिरॉईन दिल्लीला येते कारण तिला महागातला लेहंगा घ्यायचा असतो. आता या एका उदाहरणावरुन सिनेमा 2014 मधला आहे यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण दुदैर्वाने तसंच आहे.

काय आहे स्टोरी ?

humpty_aaliyaहम्प्टी शर्मा जो नायक आहे, तो दिल्लीमध्ये पेपर लीक करुन मुलींना पुरवत असतो आणि त्याबदल्यात किस मिळवत असतो. दिल्लीत शॉपिंगसाठी आलेली काव्या त्याला दिसते आणि तो तिच्या प्रेमात पडतो, आणि मग पुढे 'दिलवाले दुल्हनिया...'सारखंच प्रेमात हे दोघे कसे यशस्वी होतात वगैरे सगळं घडत राहतं. काव्याच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलेलं असतं आणि बहिणीचा प्रेमविवाह यशस्वी झाला नाही, म्हणून काव्यासुद्धा मुलगा न बघताच लग्नाला राजी होते. अशा अनेक विनोदी आणि न पटणार्‍या गोष्टी सिनेमात जागोजागी आहेत.

कथा-पटकथा यांच्यामागे न जाता धर्मा प्रॉडक्शनचे नियम पाळलेले आहेत, हे आणखी एक दुदैर्व...लग्नाचे फेरे घेत असताना फेसबुकवर मेसेज करणं अशा गोष्टी फक्त करण जोहरच्या सिनेमातच दिसतात. खरंतर, याप्रकारच्या अनेक सिनेमे येऊन गेल्यामुळे कथेत काही नावीन्य नाहीच आहे, आणि मग मुद्दाम त्याला 'दिलवाले दुल्हनिया...'ट्रिब्युटचा मुलामा दिलाय की काय असा संशय यायला लागतो. अपेक्षित वळणं घेत सिनेमा क्लायमॅक्सला येतो तेव्हा तर आणखी एक ट्विस्ट आपल्यापुढे वाढलेला असतो, आणि हा ट्विस्ट बघून तर डोक्यालाच हात लावायची वेळ येते.

परफॉर्मन्स

3213humptyवरुण धवन, आलिया भट्ट यांच्याशिवाय सिनेमात आशुतोष राणा आहे, आणि एवढाच काय तो दिलासा आहे. 'दिलवाले दुल्हनिया...'मध्ये असलेलं अमरिश पुरींनी साकारलेलं कॅरेक्टर आशुतोष राणा यांनी साकारलंय. वडिलांची कडक शिस्त वगैरे इथेही आहे, पण वरुण धवनची विकेट घेण्यात मिळणारा आसुरी आनंद आशुतोष राणा यांनी स्वत:च खूप एंजॉय केलाय. आलिया भट्टने आपला बबली अभिनयाची तीव्रता यामध्ये थोडी कमी करायला हवी होती, म्हणजे ती सुसह्य झाली असती. वरुण धवनने गोविंदा इमेज कायम ठेवलेली आहे.

रेटिंग 100 पैकी 50

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2014 10:55 PM IST

ताज्या बातम्या