फिल्म रिव्ह्यु : भातुकली !

फिल्म रिव्ह्यु : भातुकली !

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये 'भेजा फ्राय' या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. 'भेजा फ्राय'चा दिग्दर्शक सागर बल्लारी आता निर्माता बनलाय आणि निर्माता म्हणून त्याचा पहिला सिेनमा आहे भातुकली. भेजा फ्रायपासून त्याच्यासोबत असलेला रोहित जोशी या भातुकलीचा दिग्दर्शक आहे. ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे भातुकली बघताना डोळयात भरतो सिनेमाचा तांत्रिक दर्जा...तांत्रिक बाजूंवर असलेले बॉलिवूडचे संस्कार स्पष्टपणे जाणवतात. सिनेमॅटोग्राफी, साऊंड, एडिटिंग अशा एकूणच तांत्रिक बाबतीत हा सिनेमा एकदम सरस आहे. मराठीच्या दृष्टीने सिनेमा मल्टीस्टारडस्ट सुद्धा आहे.

 

अजिंक्य देव, शिल्पा तुळसकर, सुनील बर्वे, स्मिता तळवलकर, किरण करमरकर, शशांक शेंडे अशी कलाकारांची फौजच यामध्ये आहे आणि आशयाच्या दृष्टीने पाहिलं तर कौटुंबिक गूढनाट्याचा प्रकार यामध्ये बघायला मिळेल. गूढनाट्य असल्यामुळे याबद्दल फार बोलता येणार नाही, पण साधारण फ्रेंच सिनेमांमध्ये दिसणारं सिनेमॅटिक नाट्य मराठीत फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय एवढं सांगता येईल. सिनेमाचे संवादसुद्धा खुपच सुटसुटीत आणि आवश्यक तेवढेच ठेवण्यावर भर देण्यात आलाय. सिेनमात दोनच गाणी आहेत पण सहज लक्षात राहतील अशी आहेत. त्रुटींबद्दल सांगायचं तर हा भातुकलीचा खेळ पंधरा मिनिटं तरी कमी करता आला असता.

काय आहे स्टोरी ?

bhatukaliही गोष्ट आहे श्रीकांत देशमुख आणि त्याच्या कुटुंबाची...कोण कोण आहे या कुटुंबात? श्रीकांत देशमुखची आई आहे, त्याची बायको जानकी आणि तीन मुलं आहेत. शिवाय त्याचा भाऊ रविकांतही सिनेमात आहे. श्रीकांत देशमुखचा पीए रमेशही आहे आणि इंटरव्हलनंतर दाखल होतो श्रीकांत देशमुखचा मित्र शंतनु अत्रे. सिनेमात एवढ्याच व्यक्तिरेखा आहेत आणि कथा आहे एका दिवसाची.. हा दिवस म्हणजे श्रीकांत देशमुखचा वाढदिवस..श्रीकांत देशमुख हा शिपिंग उद्योगात भरपूर नाव आणि पैसा कमावलेला अतिशय यशस्वी बिझनेसमन.

 

तो जेवढा यशस्वी आणि श्रीमंत आहे तेवढाच विक्षिप्त आणि संतापी स्वभावाचा आहे. त्याच्या जमदग्नी अवताराला घरातले सगळेच घाबरुन असतात. कधीही वाढदिवस साजरा न करणारा हा श्रीकांत देशमुख यावर्षी मात्र सर्व कुटुंबाला एका फार्महाऊसवर एकत्र आणतो. पुढे दिवभरात जे काही घडतं ते सिनेमात बघायला मिळेल. कथा सांगण्याचा हा प्रकार मराठीत फारसा दिसलेला नाही. कथेमध्ये वळणं आहेत, काही धक्के आहेत. सगळं काही सुरळीत सुरू असतानाही कुठेतरी काहीतरी गडबड आहे असा भुंगा मनात सतत भुणभुणत राहील याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. काही चाणाक्ष प्रेक्षकांना सिनेमा बघताना शेवटाचा अंदाज येईलही, पण तरीही सिनेमा बघण्याचा हा वेगळा अनुभव घ्यायलाच हवा असा नक्कीच आहे.

परफॉर्मन्स

346bhatukali (2)अभिनयातही सर्वांनी बाजी मारलेली आहे.किरण करमरकरची भूमिका तुलनेने लहान असली तरी त्याच्या येण्यामुळे सिनेमातला आणि प्रेक्षकांच्या मनावरचा ताणही थोडा कमी होतो. खूपच सहज सुंदर असं काम किरणने केलंय. स्मिता तळवलकर यांच्याबद्दलही असंच सांगता येईल. गोड समंजस आधुनिक आज्जीच्या रोलमध्ये त्या एकदम फिट्ट वाटतात. सुनील बर्वेने साकारलेला लहान भावाचा रोलही खास आहे. गेल्यावर्षी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि आता भातुकलीमधून सहजसोपी वाटणारी पण प्रत्यक्षात आव्हानात्मक असणारी अदाकारी त्याने सादर केलीये. शिल्पा तुळसकर तसा मराठी सिनेमात क्वचितच दिसणारा चेहरा, पण हा सिनेमा बघताना जानकीच्या भूमिकेसाठी शिल्पाच योग्य आहे हे अगदी मनापासून पटतं. तिच्या चेहर्‍यात गोडवाही आहे आणि भूमिकेला आवश्यक असलेला प्रगल्भपणाही आहे आणि तिने अभिनयही उत्तमच केलाय.

sagdweag7y6434264bhatukali (3)

शशांक शेंडे हा कलाकार नेहमी दाढी वाढवून अस्ताव्यस्त भूमिकांमध्ये दिसतो तर कधी व्हिलनच्या रोलमध्ये असतो. या सिनेमात त्याने साकारलेला पीए रमेश आत्तापर्यंतच्या भूमिकांच्या एकदम उलट आहे, पण शशांकने हा रोल एंजॉय केलाय असं वाटतं. अभिनयाची मोठी धावसंख्या उभारलीये ती अजिंक्य देवने. सौ.शशी देवधरपासून एक वेगळाच अजिंक्य देव दिसायला लागलाय. करिअरच्या या टप्प्यावर अभिनयात आलेली आणखी परिपक्वता ही त्याला फायदेशीर ठरतेय आणि प्रेक्षकांनाही दमदार अभिनय बघायला मिळतोय. नवोदित शैल शेलार आणि समीर परांजपे यांनीही आपापली कामं एकदम मस्त केलेली आहेत.एकंदरित, सशक्त अभिनय, उत्तम मांडणी, कौटुंबिक नाट्याचा एक वेगळाच प्रकार, श्रीमंत तांत्रिक मूल्यं यांची ही भातुकली बघायलाच हवी अशी आहे हे नक्की.

रेटिंग 100 पैकी 70

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2014 10:23 PM IST

ताज्या बातम्या