आजोबा -लांबलेला माहितीपट !

आजोबा -लांबलेला माहितीपट !

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

'आजोबा'..या सिनेमाची सगळ्या प्रकारचे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.अगदी अमराठी प्रेक्षकांमध्येसुद्धा आजोबाबद्दल कुतूहल निर्माण झालेलं होतं. फिल्मी खवय्यांना वाटत होतं की, मस्त मेजवानी मिळणार, काहीतरी पौष्टीक, सकस खायला मिळणार...सुजय डहाकेने मेन्यूसुद्धा चांगला सजवला होता. आजपर्यंत मराठीच काय पण भारतीय सिनेमात दिसली नाही अशी आगळीवेगळी थीम घेऊन बुफेखाना सज्ज झाला, पण 'आजोबा'चा आस्वाद घेतल्यावर अर्धपोटीच राहिलो असं वाटून जातं. चांगल्या विषयावरचा अतिशय कमजोर सिनेमा अशी या आजोबाची ट्रॅजेडी झालेली आहे.

ajoba-marathi-movie-story

'शाळा'नंतर एका अवघड विषयावर सिनेमा तयार करण्याचं आव्हान सुजय आणि त्याच्या टीमने उचललं खरं, पण ते काही त्यांना पेललेलं नाहीये. मुळात, वन्यजीव आणि त्यांच्याभोवती फिरणारी कथा ही सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना रुचेल, पचेल, अपील होईल अशी असायला हवी, पण नेमक्या याच बाबतीत आजोबा अपयशी ठरलाय. आपल्याला काय सांगायचंय हे सुजयला माहितीये, पण कसं सांगायचंय त्यामध्येच त्याचा गोंधळ उडालाय आणि मग धड डॉक्युमेंटरी नाही आणि धड सिनेमा नाही अशी आजोबाची गत झालीये. बिबळ्या मानवी वस्तीत घुसला, बिबळ्याने घेतले दोघांचे प्राण वगैरे बातम्या आपण वाचत असतो, बघत असतो, पण अशा बातम्यांची दुसरी बाजू काय हे सांगण्याचा प्रयत्न तर झालाय पण हा प्रयत्न अजिबात यशस्वी झालेला नाहीये हेच दुदैर्व..

काय आहे स्टोरी ?

Urmila-Matondkar-Ajoba-Marathi-Movie-Still-Photos

आजोबा हे एका बिबळ्याचं नाव आहे. जुन्नरमध्ये एका कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबळ्या एका विहिरीत पडतो आणि तीन दिवसांच्या प्रयत्नांनतर वनविभागाचे कर्मचारी त्याला बाहेर काढतात. त्यानंतर त्याच्या शरीरात एक चीप बसवून जंगलात सोडून दिलं जातं आणि जीपीएस (GPS) च्या सहाय्याने त्याच्या पुढच्या प्रवासावर नजर ठेवली जाते. वन्यजीव संशोधक पूर्वा राव या आजोबावर संशोधन करत असते. या संशोधनात तिला काय काय सापडतं याची गोष्ट सिनेमात कळेल. पूर्वा रावची भूमिका केलीये उर्मिला मातोंडकरने, पण ही संशोधक नेमकं कसलं संशोधन करतेय याचाच उलगडा बराच वेळ होत नाही. जर आजोबाला GPS च्या मदतीने ट्रॅक केलं जाऊ शकतं तर ही घरी किंवा ऑफिसमध्ये बसून ट्रॅकिंग का करत नाही? जिथे जिथे आजोबा जातोय तिथे जाऊन तिला कोणती माहिती मिळतेय याचा काहीच बोध होत नाही आणि त्यामुळे आजोबाचा 120 किलोमीटरचा प्रवास दोन तास सहन करावा लागतो. मीडियाची बाजू किंवा यशपाल शर्मा विरुद्ध प्रभा राव यांचा वाद हे सगळंच खूप हास्यास्पद होऊन जातं. दिलीप प्रभावळकर या सिनेमात का आहेत तेच कळत नाही, केवळ दोन सीन्समध्ये ते दिसत असले तरी सतत त्यांच्या खोट्या दाढीकडे लक्ष जात राहतं. अशा चुकांची सुजयकडून तरी अपेक्षा नव्हती म्हणूनच थोडं वाईट वाटतं.

परफॉर्मन्स

7Ajoba

दोन तासांचा सिनेमा असूनही कंटाळवाणा झालेला 'आजोबा' काही प्रमाणात सुसह्य होतो तो उर्मिला मातोंडकर, हृषिकेश जोशी, ओम भूतकर आणि बाकी सर्व कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे..वन्यजीव संशोधकाची जी मानसिकता असते ती उर्मिलाने उत्तमरित्या दाखवलेली आहे, ग्लॅमर तिने बाजूला ठेवलंय आणि अगदी सहज वावरलेली आहे पण सगळ्यात कमाल केलीये ती हृषिकेश जोशीच्या 'ज्ञानोबा'ने.. हृषिकेशने आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून गुणी अभिनेता अशी आपली इमेज तयार केलेली आहे, पण ज्ञानोबा साकारताना त्याने आपल्यातला इरसालपणा पुरेपूर वापरलाय. तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचं तर यातल्या ऍनिमेशनची खूप हवा करण्यात आली होती, प्रत्यक्षात त्यातही फार मजा करता आलेली नाहीये. काही ठिकाणी तर चक्क कार्टून रुपातला बिबळ्या बघायला मिळतो. साउंड डिझाईनसाठी बरीच मेहनत केल्याचं जाणवत राहतं. स्वत: सुजयने एडिटिंगचा मोह टाळायला हवा होता असंही वाटत राहतं. एकंदरित, 'आजोबा' हा सिनेमा म्हणून अपयशी ठरला असला तरी केवळ उर्मिला, हृषिकेशच्या परफॉर्मन्ससाठी एकदा हा आजोबा तुम्ही बघू शकता.

रेटिंग 100 पैंकी 50

First published: May 9, 2014, 11:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading