फिल्म रिव्ह्यु : आठवणीत राहणारं 'पोस्टकार्ड'

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2014 11:33 PM IST

फिल्म रिव्ह्यु : आठवणीत राहणारं 'पोस्टकार्ड'

अमोल परचुरे, समीक्षक

गजेंद्र अहिरे हा दिग्दर्शक जवळपास पंधरा वर्षांपासून सिनेमे बनवतोय. रामगोपाल वर्मासारखी त्याची सुद्धा सिनेमांची एक फॅक्टरीच आहे. विक्रमी वेळेत सिनेमे पूर्ण करण्यासाठी तो प्रसिद्ध आहेच, पण त्याच्या या वेगाचा सिनेमाच्या दर्जावर परिणाम होतो हे अनेकदा दिसून आलेलं आहे. विषय चांगला पण तो फुलवताना दिग्दर्शक म्हणून त्याची फसगत होते, पण आता हा सगळा इतिहास झाला असं म्हणायला पाहिजे, कारण हल्लीचे गजेंद्र अहिरेचे सिनेमे एकदम खास असतात, जमून गेलेले असतात. अनुमतीसारखा सिनेमा असेल किंवा आता रिलीज झालेला पोस्टकार्ड..अगदी थोडक्यात सांगायचं तर जीए कुलकणीर्ंच्या कथा आपण मोठ्या पडद्यावर पाहतोय असाच भास पोस्टकार्ड बघताना होतो. साहित्यिक मूल्यंच नाहीत, तर सिनेमॅटिक मूल्यांच्या बाबतीतही या पोस्टकार्डचा आशय खूपच वरचा आहे. पोस्टकार्ड म्हणजे अनामिक, गूढ पण तितक्याच रम्य विश्वातला प्रवास आहे. कधी गूढ व्यक्तिमत्वं, कधी रुपकं, प्रतिकं यांच्या माध्यमातून वास्तवाशी जवळचं नातं सांगणारा आहे. यातला एक संवादच ऐका, शब्द हे गर्भार असतात, न जाणो कधी काय जन्माला घालतील. अशा अप्रतिम लेखनातून आणि कलाकारांच्या सुरेख अभिनयातून सहजपणे तयार झालेले सुंदर मानवी बंध पूर्ण सिनेमाभर अनुभवायला मिळतात आणि मग सिनेमातला काळ वगैरे कोणता आहे असले प्रश्नही पडत नाहीत.

काय आहे स्टोरी ?

c07postcard

पोस्टकार्ड ही गोष्ट आहे एका पोस्टमनने सांगितलेली..त्याच्या नोकरीत त्याला आलेले तीन अनुभव जसेच्या तसे आपल्यापुढे सादर होतात. पोस्टमन म्हणजे खरंतर त्याचं काम आहे पत्रं पोचवणं..आता तीस चाळीस वर्षांपूर्वी पोस्टकार्डचं महत्त्व खूप होतं. व्हॉटसऍपवर थोडावेळ मेसेज आले नाहीत तर आपण बेचैन होतो, तर मग विचार करा महिनाभर पत्राची वाट पाहण्यात माणसं किती बेचैन आणि व्याकुळ होत असतील. याच व्याकुळतेमधून काही कथा जन्माला आल्या, ज्या आपल्याला पोस्टकार्डमध्ये दिसतात. राज्यातल्या तीन वेगवेगळ्या भागातल्या या गोष्टी आहेत. या तीन कथांमध्ये पोस्टमनशिवाय एक गूढ दुवा आहे, जो सिनेमातच बघायला पाहिजे. या तीनही गोष्टींमध्ये कुटुंबापासून किंवा आपल्या प्रिय व्यक्तींपासून लांब रहावं लागत असल्याची विरहवेदनाही आहे, ही वेदना पोस्टमनलाही जाणवतेय पण जेव्हा तो ती वेदना हलकी करायला जातो तेव्हा त्याची फसगत होते, म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला सिनेमा बघून कळेलच. तीन कथांचा संगम पडद्यावर एवढा सुंदर दाखवलाय की तो बघायलाच पाहिजे असा झालेला आहे.

परफॉर्मन्स

566postcard

पोस्टकार्डचं आणखी एक विशेष म्हणजे सगळ्या कलाकारांचा अप्रतिम आणि दर्जेदार अभिनय...गिरीश कुलकर्णीचा सहज आणि नैसर्गिक वावर हे त्याच्या अभिनयाचं वैशिष्टय आहेच, जे इथेही पूर्ण सिनेमाभर दिसतं, फक्त सुरुवातीला आपल्या पत्नीशी बोलताना तो जे साहित्यिक भाषेत बोलतो ते थोडं खटकतं. सई ताम्हणकरने पुन्हा एकदा नॉन-ग्लॅमरस रोलमध्ये चमक दाखवलेली आहे. किशोर कदम, विभावरी देशपांडे, सुहिता थत्ते, राधिका आपटे, वैभव मांगले, प्रवीण तरडे, सुबोध भावे या सगळ्याच कलाकरांनी छोट्या रोलमध्येही अफलातून अदाकारी दाखवलेली आहे. सगळ्यात कमाल केलीये ती दिलीप प्रभावळकर यांनी...

635313351402874162_sai

आधी त्यांनी जेवढ्या भूमिका केल्यात त्या सगळ्या विसरायला लावून त्यांनी प्रेक्षक अवाक होतील असा परफॉर्मन्स दिलेला आहे. आपली माणसं, नातीगोती अशा मोजक्या कलाकृतींमध्ये त्यांनी पूर्णपणे गंभीर भूमिका साकारल्या आहेत, त्याही पुढे जाणारा त्यांचा लूक आणि अभिनय हा सिनेमा संपल्यानंतरही लक्षात राहणारा आहे. हरीहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातली गाणी आणि गंधारचं संगीत हे सिनेमाचं आणखी एक आकर्षण म्हणायला पाहिजे. कॅमेरा, एडिटिंग अशा तांत्रिक बाबतीतही उत्तम काम झालेलं आहे. गजेंद्रने पहिल्यांदाच वेळ घेऊन आणि वेळ देऊन काम केलंय असं सिनेमा बघून वाटतं. यापुढेही अशाच सिनेमांची अपेक्षा गजेंद्रकडून करायला हरकत नाही.

रेटिंग 100 पैकी 75

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2014 11:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close