आवर्जून बघावा असा 'यलो'

आवर्जून बघावा असा 'यलो'

  • Share this:

अमोल परचुरे,समीक्षक

अमुकच सिनेमे चालतात आणि अमुकच गोष्टी लोकांना आवडतात असे ठोकताळे बांधून सिनेमे बनवणार्‍या बहुसंख्य मराठी निर्मात्यांना हा 'यलो' सिनेमा म्हणजे एक सणसणीत चपराकच आहे. फँड्रीसारख्या अविस्मरणीय सिनेमानंतर गेले दोन महिने चांगल्या मराठी सिनेमांचा जो दुष्काळ पसरला होता तो 'यलो'मुळे दूर झालेला आहे. आशय आहेच, मांडणीचा दर्जाही उत्तम आहे पण सगळ्यात महत्त्वाचं सिनेमाचा लूक... तांत्रिकदृष्टया जर बोलायचं झालं तर यलोने मराठी सिनेमाचा पडदाच ताजातवाना करुन टाकलाय. मुळात एखादी नवीन गोष्ट सांगायची तर ती सांगताना समारेच्याचं मन स्वच्छ असणं महत्त्वाचं असतं, इथे दिग्दर्शकानं प्रत्येक फ्रेमच स्वच्छ आणि लख्ख करुन ठेवलीये, त्यामुळे त्याला जो विचार मांडायचाय तो ऐकताना आणि बघताना आपणही ताजेतवाने होत जातो, आणि मग हळूहळू डोळे भरुन येतात, पण मनात प्रचंड आनंद साठून राहिलेला असतो. हा दुर्मिळ योग साधायचा असेल तर यलो बघावाच लागेल. मी तर म्हणेन हा सिनेमा प्रत्येक संवेदनशील माणसाने बघायलाच पाहिजे.

काय आहे स्टोरी ?

_8456yellowmarathimovie

आधी मतिमंद, मग गतिमंद, मेंटली रिटार्डेड, मेंटली चॅलेन्जड, आणि आता स्पेशल चाईल्ड ... नाव काहीही द्या पण त्या मुलांचं विश्व बदलत नाही किंवा त्यांच्या पालकांचं दु:ख हलकं होत नाही. अशा मुलांवर आधारित मराठीत काही सुंदर कलाकृती याआधीही झाल्या होत्या. चौकट राजा हा सिनेमा किंवा नातीगोतीसारखं नाटक...पण त्या कलाकृतींमध्ये शोकांतिका होती, कुठेतरी या मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीपूर्ण होता. 'यलो' यामुळेच पूर्णत: वेगळा आहे. यलोमध्ये अशा गतिमंद मुलांना नाचवून 'तारे जमीं पर' सारखं प्रेक्षकांना रडवण्याचा प्रयत्न नाहीये, उलट या मुलांना समजून घेणं महत्त्वाचं आहे, त्यांना सहानुभूतीची नाही समजुतीची गरज आहे. हेच 'यलो' आपल्याला सांगतो.

द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग लोभ याच्या पलीकडे असलेल्या या मुलांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे हेसुद्धा अगदी सहजपणे यात दिसतं. सिनेमाचं आणखी एक वेगळेपण, या सिनेमात आपल्याला गोष्ट सांगतेय स्वत: गौरी...म्हणजे जे स्पेशल चाईल्ड आहेत त्यांच्या भावविश्वातून, त्यांच्या नजरेतून आपल्याला गोष्ट कळत जाते. गौरीची ही गोष्ट एवढी सुंदर लिहीलेली आणि सादर केलेली आहे की ती आपल्याला बांधून ठेवते, तिच्या सुखदु:खात आपणही सहभागी होतो. कधी खळखळून हसतो, कधी डोळ्यात टचकन पाणी येतं, आणि शेवटी गौरी जिंकते तेव्हा आपणच जिंकल्याचा आनंदही आपल्याला होतो. ही किमया खरंच खूप अवघड आहे आणि त्याबद्दल लेखक गणेश पंडित-अंबर हडप या जोडीचं आणि दिग्दर्शक महेश लिमयेचं खरंच कौतुक आहे.

परफॉर्मन्स

yellow_newसिनेमॅटोग्राफर बनला दिग्दर्शक याची आता सवय झालीये, पण यलो बघून असा प्रश्न पडेल की महेश लिमये आधी कॅमेरामन आहे की आधी दिग्दर्शक आहे. यलोची सिनेमॅटोग्राफी महेशनेच केलेली आहे आणि त्यामुळेच कॅमेराची सुंदर भाषासुध्दा सिनेमात दिसत राहते. मी मुद्ददाम इथे गोष्ट सांगत नाहीये कारण ती कशी उलगडत जाते हे तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच बघायला पाहिजे. सगळ्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय ही सिनेमाचं आणखी एक आकर्षण...मृणाल कुलकर्णी, हृषिकेश जोशी, मनोज जोशी, उपेंद्र लिमये, उषा नाडकर्णी, ऐश्वर्या नारकर सगळ्यांचा अभिनय अतिशय सहज, नैसर्गिक आणि त्यामुळेच एकदम पॉवरफुल झालाय.

नॅशनल-इंटरनॅशनल स्विमर्सना कॉम्पिटेटीव्ह ट्रेनिंग देणा-या कोचची भूमिका उपेंद्रने केलीये, उपेंद्रचा अभिनय एकसुरी आहे अशी टीका त्याच्यावर होत असते पण यलोमध्ये त्याने सगळ्या टीकाकारांची तोंडं बंद करुन टाकलेली आहेत. हृषिकेश जोशीची भूमिका म्हटलं तर हलकी-फुलकी आहे, पण गौरीला वाढवताना तिच्या या मामाचा तिला असलेला लळा खूप महत्त्वाचा आहे, हृषिकेशने कुठेही हा हलका-फुलका रोल कॉमेडी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलीये. कळत नकळत किंवा चौकट राजामध्ये अशोक सराफ यांच्या तोडीचा अभिनय यात हृषिकेशने केलाय.

मनोज जोशी यांची भूमिका तशी छोटी आहे, पण त्यातही त्यांनी कमाल केली आहे. मुख्य भूमिकेत कोणत्याही कलाकारापेक्षा प्रत्यक्षात स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलींना कास्ट करणं हीसुद्धा सिनेमाचा परिणाम वाढवणारी गोष्ट आहे. या मुलींकडून उत्कृष्ट काम करुन घेतलंय, तेवढा पेशन्स यलो टीमने दाखवला आणि त्याचं फळही त्यांना मिळालंय. एकंदरीत, प्रेरणा देणारा, संदेशही देणारा असा अनोखा, अप्रतिम यलो बघायलाच हवा असाच आहे.

रेटिंग 100 पैकी 80

First published: April 5, 2014, 1:01 PM IST

ताज्या बातम्या