फिल्म रिव्ह्यु : 'क्वीन' !

फिल्म रिव्ह्यु : 'क्वीन' !

  • Share this:

अमोल परचुरे,समीक्षक

जागतिक महिला दिनानिमित्तानं खर्‍या अर्थाने महिला शक्तीला सलाम करणारा बॉलिवूडचा सिनेमा आहे क्वीन... महिलाप्रधान, नायिकाप्रधान असे असंख्य सिनेमे बॉलिवूडने आतापर्यंत दिले असले तरी त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा, 'इंग्लिश-विंग्लिश'शी नातं सांगणारा हा क्वीन सिनेमा प्रत्येकाने पाहायलाच हवा असा आहे. भारतीय महिलेच्या लोकल आणि ग्लोबल दृष्टीकोनातून साकारलेला हा सिनेमा, ज्यात कॉमेडीसुद्धा आहे, युरोपची थोडी सफर आहे, डोळे ओलावणारे काही क्षण आहेत आणि डोळे उघडावेत असेही काही सीन्स आहेत. युरोपमध्ये सिनेमा घडत असला तरी त्यात युरोपची सफर नाही तर सिनेमाची नायिका क्वीन म्हणजे एका भारतीय महिलेचा प्रवास आहे.

काय आहे स्टोरी ?

kangana

अशी महिला जी दिल्लीतल्या श्रीमंत घरात राहत असली तरी मुलीने नेहमी मर्यादेत राहावं अशा संस्कारात वाढलेली. लग्न दोन दिवसांवर आलेलं असताना तिचा होणारा नवरा लग्नाला नकार देतो. हनीमूनला युरोप फिरायला जायचं अशी स्वप्नं रंगवणारी राणी आधी कोलमडून पडते, युरोपचं बुकिंगही झालेलं असतं. शेवटी ती ठरवते की, लग्न झालं नसलं तरी आपण युरोप फिरायला जायचं. एकटीच युरोपमध्ये आलेल्या रानीला नंतर जे काही अनुभव येतात त्याचा हा क्वीन सिनेमा...भारतात आपल्या वाट्याला जे जिणं येतं त्यापेक्षा बाहेरची दुनिया किती वेगळी आणि समृद्ध आहे हे तिच्या लक्षात येतं. पाश्चिमात्य संस्कृतीत असलेला मोकळेपणा तिला भावतो, पण त्याहीपेक्षा महिलेला मिळणारं विचारांचं स्वातंत्र्य तिला महत्त्वाचं वाटतं. इथे जागोजागी लेखक-दिग्दर्शकानं टिपिकल भारतीय पुरुषी मानसिकतेला बर्‍याच टपल्याही मारल्या आहेत. जो संदेश दोन वर्षांपूर्वी 'इंग्लिश विंग्लिश'ने दिला होता, अगदी तसाच परिणाम क्वीनमधून साधला गेलाय.

परफॉर्मन्स

4queen-mar4

कंगना राणावतला या क्वीन सिेनमाची सम्राज्ञीच म्हणायला लागेल, अगदी स्पष्ट सांगायचं तर ज्यांना कंगना राणावत हिरॉईन म्हणून आवडत नाही त्यांनीसुद्धा आवर्जून हा सिनेमा आणि कंगनाचं काम बघायलाच पाहिजे. लिझा हेडन, राजकुमार राव यांचा अभिनयसुद्धा खूपच नैसर्गिक झालाय. ज्यानं नाकारलं त्याचं नावही विजय आणि परदेशात जिने सावरलं तिचं नाव विजयलक्ष्मी अशा छोट्या छोट्या गोष्टी सिनेमात रानीला चकित करतात आणि प्रेक्षकांनाही आवडून जातात. कथेमध्ये असलेली ही गंमत कॅमेरामन आणि एडिटर यांनी आणखी वाढवली आहे. यात अमित त्रिवेदीच्या संगीताची जादू आहेच...यातली गाणी सिनेमा संपल्यावर लक्षात राहत नसली तरी सिनेमा बघताना खूप मस्त वाटतात अगदी कथेमध्ये विरघळून गेल्यासारखी...चिल्लर पार्टी बनवणार्‍या विकास बहलचा हा दुसरा सिनेमा अशा सगळ्या कारणांमुळे मस्ट वॉच या कॅटेगरीत पोचलेला आहे.

क्वीनला रेटिंग - 75

 

First published: March 7, 2014, 11:01 PM IST

ताज्या बातम्या