फिल्म रिव्ह्यु »'हायवे'चा हळुवार प्रवास

फिल्म रिव्ह्यु »'हायवे'चा हळुवार प्रवास

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

हायवे... नावावरुन, प्रोमोवरुन लक्षात येतं की हा एक रोड मूव्ही असणार.. रोड मूव्ही आहेच पण तो इम्तियाझ अलीचा असल्यामुळे त्याचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागेल. 'जब वुई मेट' असेल, 'रॉकस्टार' असेल त्यात सुद्धा प्रवास होता, निसर्ग होता पण त्याचबरोबरीने रिलेशनशिपही महत्त्वाची होती. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर मोठ्या पडद्यावर नात्यांचा प्रवास सादर करणं हा इम्तियाझ अलीचा आवडता विषय, आवडता पिंड असावा.. हायवेमध्ये तर सिनेमाची सुरुवातच पहाडी रस्त्यापासून होते. डोंगरांमधून वाट काढणं, हायवे तयार करणं हे तसं इंजिनिअर्ससाठी अतिशय अवघड आणि जोखमीचं काम, त्याचप्रकारे वेगळ्या वाटेवरचा संवेदनशील सिनेमा बनवणं ही इम्तियाझसाठी जोखीमच असावी. या हायवेवर वेडीवाकडी वळणं नाहीयेत, रस्ता सरळ असला तरी गाडीचा वेग सुसाट नाहीये. वेगवेगळ्या प्रदेशांमधून, गावांमधून, विविधरंगी संस्कृतीचं दर्शन घडवत कथेची गाडी हळूहळू अंतर कापत पुढेपुढे चाललीये. पुढे नेमकं काय घडणार आहे याचा प्रेक्षकांनाही अंदाज बांधता येत नाही आणि त्यातल्या कॅरेक्टर्सनाही त्याची कल्पना नाहीये. पुढे काय वाढून ठेवलंय हे माहीत नसतानाही त्यांचा प्रवास अखंड सुरू आहे आणि त्यातली नजाकत ही आहे की प्रेक्षकांनाही या प्रवासात सामील करुन घेतलंय.

काय आहे स्टोरी ?

highway4

एकमेकांशी विसंगत असलेल्या दोन प्रवृत्ती हायवेमध्ये इम्तियाझ अलीने सादर केल्यात. एक आहे वीरा त्रिपाठी...अतिशय बड्या उद्योजकाची मुलगी, सगळी सुखं तिच्या पायाशी लोळतायत, अतिशय लाडात वाढलेली ऐन विशीतली वीरा.. दुसरा आहे महाबीर भाटी...संतापी आणि उलट्या काळजाचा.. दरोडे घालणारा, अपहरण करणारा, खंडणी वसूल करणारा एक कॉन्ट्रॅक्ट किलर आणि ट्रक ड्रायव्हर. आचार-विचार सगळ्यात बाबतीत दोन टोकं असलेले वीरा आणि महाबीर एकत्र येतात, म्हणजे महाबीर वीराला किडनॅप करतो, आणि नंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी महाबीर आणि त्याचे साथीदार वीरा त्रिपाठीला घेऊन राजस्थान ते काश्मीर असा प्रवास करतात. या प्रवासात नेमकं काय काय घडतं ते या हायवेमध्ये बघायला मिळेल.

नवीन काय?

Highway-Cover-Pic

या प्रवासादरम्यान इम्तियाझ अलीमधला लेखक-दिग्दर्शक पात्रांच्या तोंडून बोलत राहतो. कुठे फिरायला गेलं तरी तिथल्या फाईव्हस्टार हॉटेलमध्येच जास्त वेळ काढणारी वीरा जेव्हा बाहेरची दुनिया बघते तेव्हा भारावून जाते. ट्रकमधून बाहेरचा नजारा दाखवणारा दि ग्रेट अनिल मेहतांचा कॅमेरा म्हणजे वीराचे डोळेच असतात. राजस्थान ते काश्मीर या प्रवासात तिला अनेक अशा गोष्टी भेटतात, दिसतात ज्या तिच्यासाठी पूर्णपणे नवीन असतात.

श्रीमंतीत लोळणार्‍या, बाहेरच्या जगामध्ये अजिबात रस नसलेल्या पिढीवर इम्तियाझची ही खास कमेंटच आहे. घरी गडगंज श्रीमंती असली तरी वीरावर लहान वयात अत्याचारही झालेत आणि तेही घरातल्याच व्यक्तीकडून. तीच वीरा जेव्हा महाबीरसारख्या दरोडेखोरांबरोबर असते तेव्हा तिला सुरक्षित वाटत असतं. सतत फोनवर बोलणारी, मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पांत रमणारी वीरा अपहरण झाल्यावर गप्प गप्प असते आणि तिथेच तिचा स्वत:शी संवाद सुरू होतो. वीराचा हा प्रवास इम्तियाझने सुरेख रेखाटलाय आणि त्याला कॅमेरा आणि एडिटिंगची तितकीच सुंदर साथ मिळालीये.

परफॉर्मन्स

highway12-jan22

हायवे ही एक व्हिज्युअल ट्रीट आहे. आपल्या देशातली विविधरंगी संस्कृती, प्रकाशात न्हाऊन निघालेला निसर्ग हा स्क्रीनवर सुरेख चितारण्यात आलाय. पण या हायवेवर काही खाचखळगेसुध्दा आहेत. विशेषत: इंटरव्हलनंतर कथेचा वेग खूपच संथ झालाय. दोन कॅरेकटर्स एकमेकांना भेटली, एकमेकांना समजून घेतायत यानंतर शेवट होईपर्यंत बराच वेळ खर्च झालाय. अभिनयाबद्दल बोलायचं तर आलिया भट्ट आणि रणदीप हुडा हे कितीही चांगला अभिनय करत असले तरी अशा हायवेवर अभिनयाचं ड्रायव्हिंग करताना नुसतं लायसन्स असून चालत नाही, तर आणखी प्रशिक्षण घेणं आवश्यक होतं.

काही प्रसंगात आलिया भट्ट अप्रतिम अभिनय पेश करते, पण काही महत्त्वाच्या ठिकाणी ती कमी पडलीये. रणदीप हुडाने साकारलेला महाबीर हा थोडा घुमा आहे, स्वत:च्याच विश्‍वात रमलेला आहे, त्याच्या आत सतत एक घुसमट सुरू आहे. ही घुसमट अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात रणदीपही कमी पडलाय. ए.आर.रहमानचं संगीत हे सिनेमाचं खास आकर्षण ठरलं असतं पण हा काही म्युझिकल सिनेमा नसल्यामुळे अगदीच गरज भासेल तिथेच संगीताचा वापर झालाय. त्यातही राजस्थानी लोककलाकारांचं गाणं वेगळं वाटतं, तर एका गाण्यात एक लकेर ऐकताना रॉकस्टारचाही भास होतो. एकंदरीत, इम्तियाझच्या या हायवेवरुन सफर करताना तुमचा प्रवास सुखाचा होईल, पण हाच प्रवास आणखी कमी वेळात पूर्ण झाला असता तर बरं झालं असतं असंही तुम्हाला वाटेल.

रेटिंग - 70

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2014 07:56 PM IST

ताज्या बातम्या