फिल्म रिव्ह्यु : 'संघर्ष'

फिल्म रिव्ह्यु : 'संघर्ष'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

मराठी इंडस्ट्रीला चांगले दिवस आलेत असं मानलं जात असलं तरी मराठी प्रेक्षकांना चांगले दिवस कधी येणार हा प्रश्नच आहे. 'संघर्ष'सारखे सिनेमे पाहिले की विचार येतो, प्रेक्षकांसाठी हा सिनेमा पूर्ण बघणं हेच किती संघर्षाचं असेल. 'टाइमपास'सारखा सिनेमा प्रचंड यश मिळवतो, पण त्यानंतर पुढचे काही सिनेमे अक्षरश: कोसळतात हेच गेल्या काही वर्षांपासून मराठीचं चित्र आहे. फेब्रुवारी महिन्यातला पहिला सिनेमा 'संघर्ष'ची हालतसुद्धा बॉक्स ऑफिसवर फार चांगली असेल असं वाटत तरी नाही. कितीही गाजावाजा केला असला, मोठमोठे कलाकार असले तरी 'आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ना...' पण एक मात्र खरं, या सिनेमाचं नाव एकदम समर्पक आहे. कारण लेखकाने कथेशी, कलाकारांनी अभिनयाशी, दिग्दर्शकाने दिग्दर्शनाशी प्रचंड संघर्ष केलाय आणि या संघर्षात त्यांच्या दुदैर्वाने त्यांना अपयशच आलंय. मराठी प्रेक्षकांना आवडेल अशी भव्यदिव्य निर्मिती केल्याच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात डोंगर पोखरुन उंदीर काढायचा असंच संघर्ष बद्दल म्हणता येईल.

काय आहे स्टोरी ?

634 sangharsh45

या संघर्षमध्ये गुणाजी नावाची एक चाळ आहे, त्यात राहणारे तीन जिगरी दोस्त आहेत, मेकअपचे थर लावणारे आणि लाऊड ऍक्टिंग करणारे चाळकरी आहेत, स्थानिक गुंड आणि भ्रष्ट राजकारण्यांची मिलीभगत आहे, पत्रकारितेचा अजब नमुना आहे. आणि हे सगळं एकत्र करुन भरकटलेली एक कथा आहे. भ्रष्ट राजकारणी आणि सामान्य माणूस यांच्यातला लढा तर अगदीच फुसका आहे. बरं, सिनेमा बनवताना त्यात गणेशोत्सवातलं गाणं, डान्स रिऍलिटी शोमधलं 'ट' ला 'ट' जोडून बनवलेलं गाणं, एक आयटम साँग आणि मध्येच पारदर्शक पांढरा शर्ट घातलेला नायक आणि शिफॉनची साडी घातलेली नायिका यांच्यातीलं ढासळलेल्या किल्ल्यातलं उगाच एक लव्हसाँगसुद्धा आहे. एन्काऊंटर आहे, बलात्काराचा प्रयत्न आहे, थर्माकोलच्या भिंती फोडून अवतरणारा आणि सिक्स ऍब वगैरे नसताना उगााचच बेअर बॉडी दाखवणारा हिरो आहे. एवढं सगळं त्यात आहे, फक्त चांगली कथा आणि चांगली मांडणी तेवढी मिसिंग आहे.

संघर्षमधला एक व्हिलन आहे रघुभाई, जो रोल केलाय सुशांत शेलारने..इंटरव्हलआधी या रघुभाईची दहशत आणि क्रूरपणा वगैरे चांगला दाखवलाय. या रघुभाईला महानगरपालिका निवडणुकीचं तिकीटही मिळालंय आणि त्याचा गुणाजी चाळीवर डोळा आहे. म्हणून, त्याच्या दहशतीला उत्तर देण्यासाठी चाळीचा आणि सिनेमाचा हिरो ठरवतो की रघुभाईविरुद्ध चाळीतले गुरवकाका निवडणूक लढवणार. इंटरव्हलनंतर एक चांगली लढत बघायला मिळेल असं वाटत राहतं, पण प्रत्यक्षात कथा भरकटते आणि रघुभाई भेटतो थेट क्लायमॅक्सला. लेखकाने कथा लिहीताना नेमका काय विचार केला ते कळत नाही, पण प्रेक्षकांचा तरी विचार केला नसणार हे अगदी नक्की.. त्यात बाकी डिपार्टमेंटनीसुद्धा अगदीच तकलादू कामगिरी केलीये. फाईट सीन्समध्ये तर थर्माकोलच्या भिंती बघितल्या की, प्रॉडक्शन क्वालिटीचासुद्धा अंदाज येतो. गाण्यांमध्येसुद्धा फारसा दम नाहीये.

परफॉर्मन्स

34 353 sangharsh 346346

अभिनयाबद्दल फारसं काही बोलण्यासारखं नाहीच.. राजेश श्रृंगारपुरेनं एका गाण्यात नाचायचा वगैरे प्रयत्न केलाय, पण बाकी पूर्णवेळ तो एकाच स्टाईलमध्ये वावरत राहतो. इतर कलाकारांमध्ये अरुण नलावडेंचा अपवाद सोडला तर बाकीचे सगळेच एकसारखेच आहेत. सुशांत शेलारने वेगळ्या स्टाईलचा व्हिलन साकारण्याचा प्रयत्न चांगला केलाय, पण त्याचा रोलच गुंडाळण्यात आलाय. प्राजक्ता माळी, संगीता कापुरे, माधवी निमकर या तर थेट टीव्ही मालिकेच्या सेटवरुन फिल्मच्या सेटवर आल्यात असंच त्यांच्या अभिनयाकडे बघून वाटत होतं. आता एवढं सगळं सांगितल्यावर शवेटी एकच सांगेन उगाच हा सिनेमा बघण्यासाठी संघर्ष करायची गरज नाही.

 

रेटिंग - 30

First published: February 7, 2014, 11:06 PM IST

ताज्या बातम्या