फिल्म रिव्ह्यु : आर.राजकुमार

फिल्म रिव्ह्यु : आर.राजकुमार

  • Share this:

अमोल परचुरे,समीक्षक

'दबंग' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच प्रकारच्या सिनेमांची लाईनच लागली. खरंतर ही स्टाईल दक्षिणेतल्या सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये आली. ऍक्शन पण पाहिजे, कॉमेडी पण पाहिजे, हिरॉईनबरोबर लटके-झटके पाहिजेत मग या सगळ्यात कथेकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण सिनेमामध्ये मसाला ठासून भरलेला असलेला पाहिजे. 'दबंग', 'रावडी राठोड', 'बॉस', 'सन ऑफ सरदार' ही अशी सगळी याच प्रकारच्या सिनेमांची उदाहरणं. सिनेमे कसेही असले तरी बॉक्स ऑफिसवर तुफान चालतात हे बघितल्यावर जवळपास सगळ्याच निर्मात्यांचा कल असे सिनेमे बनवण्याकडे आहे.

आता याच यादीतल्या आर राजकुमार बद्दल बोलायचं तर हा सिनेमा सिंघमपेक्षा वाईट पण रावडी राठोडपेक्षा थोडा बरा असा आहे. व्हिलनचे चेहरेही तेच ते..म्हणजे प्रकाशराज, सोनू सूद असे चेहरे आलटून पालटून दिसणार. आर राजकुमारमध्ये सोनू सूद आहे. तर अशा त्याच त्याच गोष्टी राजकुमरमध्ये खूप आहेत, पण या सिनेमाचं वेगळेपण आहे ते प्रभुदेवा टचमध्ये...प्रभुदेवाच्या डान्समधली मस्ती त्याने अनेक ठिकाणी पेरायचा प्रयत्न केलाय, ज्यामुळे इंटरव्हलआधी सिनेमा बघताना चांगलं मनोरंजन होतं पण इंटरव्हलनंतर हळूहळू सिनेमा ढेपाळत जातो.

काय आहे स्टोरी ?

r rajkumar

Loading...

राजकुमार म्हणजे हिरो शाहिद कपूर हा सोनू सूदकडेच काम करत असतो, आणि सोनू सूदला जी मुलगी आवडते ती या राजकुमारची प्रेयसी असते. त्यामुळे अर्थातच प्रेमासाठी दुनियेशी पंगा घेणं वगैरे गोष्टी सिनेमात येतात. शाहिद कपूर आणि सोनाक्षीचं प्रेमप्रकरण रंगत असतानाचा भाग चांगला जमून आलाय. हिरॉईनवर इम्प्रेशन पाडण्यासाठी राजकुमार आगीमध्ये उडी घेतो असे काही प्रसंग असतील ते चांगलेच फनी झालेत, पण असा सिनेमाचा चांगला आणि जमून आलेला भाग खूपच कमी आहे.

सिनेमाची सुरुवात खूपच मस्त होते आणि सिनेमा जसा पुढे सरकतो तसे आपणच सुस्त होऊन जातो. खासकरुन क्लायमॅक्स तर एवढा ताणलाय की कधी एकदा हिरो व्हिलनला मारतोय असं होऊन जातं. प्रभुदेवाचा सिनेमा असल्यामुळे इंटरव्हलपर्यंत असलेली गाणी डान्सिकल आहेत आणि यामध्ये त्याने शाहिदला मस्त नाचवलाय, स्वत: प्रभुदेवाने सुद्धा एका गाण्यात दर्शन दिलंय. सगळीच गाणी अनावश्यक असली तरी त्यातल्या ठेक्यामुळे आणि डान्समुळे ही गाणी बोरिंग वाटत नाहीत. सोनाक्षी आणि शाहिदची जोडीसुद्धा फक्त गाण्यातच नाही तर पूर्ण सिनेमातही चांगली जमून आलेली आहे.

परफॉर्मन्स

r rajkumar 2

अशा सिनेमांमध्ये जशी कलाकारांची फौज असते तशी ती याही सिनेमात आहे. आशिष विद्यार्थी, असरानी, मुकुल देव, भरत दाभोळकर, उषा नाडकर्णी, विजय पाटकर असे बरेच कलाकार यात आहेत. सगळेच अनुभवी असल्यामुळे ते आपलं काम चोख करतात. सोनू सूदने या सिनेमात काही ठिकाणी कॉमेडी करायचाही बर्‍यापैकी प्रयत्न केलाय. सोनाक्षी सिन्हाच्या रोलला 'बुलेट राजा'च्या तुलनेत इथे बराच वाव आहे, त्यामुळे तिला ऍक्टींग दाखवायची संधीही मिळालीये.

r rajkumar new

पण खरी मेहनत केलीये ती शाहिद कपूरने. सिनेमा कसाही असला तरी शाहिदच्या फॅन्सना तरी हा सिनेमा प्रचंड आवडू वगैरे शकतो. डान्स असो, ऍक्शन असो, डायलॉगबाजी असो, शाहिदने सर्वस्व पणाला लावल्यासारखं काम केलंय. आता कथेवर थोडं काम झालं असतं तर शाहिदसारखाच सिनेमाही प्रेक्षकांना आवडला असता. एकंदरित, एक टिपिकल मसाला पॅकेज प्रभुदेवाने तयार केलंय. जे 'दबंग' स्टाईल सिनेमांचे प्रचंड फॅन्स आहेत ते हा सिनेमा एंजॉय करु शकतात.

रेटिंग : आर राजकुमार -60

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2013 10:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...