अमोल परचुरे, समीक्षक
तनुजा, सुहास जोशी आणि सचिन खेडेकर अशी स्टारकास्ट आणि नितीश भारद्वाज यांचं दिग्दर्शन या दोन गोष्टींमुळे गेले अनेक दिवस चर्चेत असलेला सिनेमा पितृऋण...अभिनेते म्हणून परिचित असलेल्या नितीश भारद्वाज यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा असला तरी आत्तापर्यंतच्या रेडिओ, टीव्ही आणि सिनेमातील सगळा अनुभव पणाला लावून त्यांनी पितृऋण सिनेमा सादर केलेला आहे. पितृऋण म्हणजे एक सुंदर, निकोप आणि दर्जेदार कलाकृती.. तसं म्हटलं तर हा सिनेमा म्हणजे एक रहस्यमय कौटुंबिक नाट्य आहे, पण त्याहीपलीकडे नात्यांमध्ये समज-गैरसमजातून होणारी घुसळण तीसुद्धा ठळकपणे सिनेमात जाणवते. निकोप यासाठी कारण सिनेमात बाकी गोष्टींचा उगाच फाफटपसारा नाही. लेखक-दिग्दर्शकाचा फोकस केवळ गोष्ट पुढे नेण्यावर आहे, त्यामुळे सिनेमा प्रवाही राहतो आणि शेवटपर्यंत आपण गुंतून राहतो. अगदी इंटरव्हलमध्ये जरी तुम्ही सामोसा किंवा पॉपकॉर्न घ्यायला लायनीत उभे असलात तर तिथेसुद्धा तुमच्या डोक्यात कथेचाच विचार असतो. जरी क्लायमॅक्सचा अंदाज आधीच आला असला तरी ते रहस्य कसं उलगडणार याची उत्सुकता राहतेच आणि मला वाटतं यातच सिनेमाचं यश आहे.
काय आहे स्टोरी?
पितृऋण हा सिनेमा आधारित आहे सुधा मूर्ती यांच्या मूळ कथेवर...सुधा मूर्ती यांची ही मूळ कथा कानडी भाषेत होती, जिचं नाव होतं ऋण, मराठीत भाषांतर झाल्यानंतर त्याचं नाव पितृऋण असंच होतं. पण हे भाषांतर कथेच होतं, बाकी वातावरण, संस्कृती ही सगळी कानडीच होती. आता या कथेवरचा मराठी सिनेमा बघताना लेखक-दिग्दर्शकाची मेहनत जाणवते ती एका कारणामुळे. त्यांनी कानडी वातावरणातली कथा पूर्णपणे मराठी ढंगाची करुन टाकली. पुणे, सातारा, कोकण अशी संस्कृती त्यामध्ये आणली. बाकीसुद्धा अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत ज्यामुळे या सिनेमाचं मूळ कानडी आहे असं वाटतच नाही. ही कथा घडते पुण्यात आणि सातार्यात. फ्लॅशबॅकमध्ये कोकण आणि जुन्या पुण्याचा काही भाग आहे. ही सगळी लोकेशन्स आणि कलादिग्दर्शन खूपच अस्सल झालेलं आहे. पुरातत्वतज्ज्ञ असलेल्या व्यंकटेश कुलकर्णीचं पुण्यातलं घर हे शहरी आणि त्याच्या प्रोफेशनशी एकदम सुसंगत आहे. भागीरथी राहत असलेला वाडा किंवा तरुण भागीरथीचं कोकणातलं घर, जुन्या पुण्यातल्या चाळी या सगळ्यावर फार बारकाईने विचार झालाय.
नवीन काय?
रहस्यमय सिनेमा असल्यामुळे ही दोन पिढयांची, दोन काळांची, दोन तत्त्वांची, स्त्रीच्या अस्तित्वाची अशी ही कथा आहे. सुधा मूतीर्ंच्या लिखाणात दिसणार्या उपमा इथं सिनेमातही आहेत. पुरातत्वतज्ज्ञ असलेला नायक भूतकाळातील घटनांचा खोदून खोदून विचार करतोय यात काही वावगं त्यामुळेच वाटत नाही. अर्थात हे सगळं असलं तरी लेखनामध्ये आणि एडिटिंगमध्ये काही ठिकाणी महत्त्वाच्या चुकाही आहेत, पण लेखनातल्या त्रुटी सिनेमा संपल्यानंतर लक्षात येतात हेसुद्धा मान्य करायला हवं. तांत्रिक चुकांकडे आपण दुर्लक्ष करतो कारण सिनेमाचा वेग आणि प्रमुख कलाकारांचा जबरदस्त अभिनय.
परफॉर्मन्स
भागीरथीच्या भूमिकेसाठी तनुजा यांचा विचार करणं इथेच अर्धी बाजी मारल्यासारखी आहे. झाकोळसारख्या सिनेमात तनुजा यांनी गंभीर भूमिका केलेल्या आहेत, पण त्याहीपेक्षा खूप वेगळा, खूप ताकदीचा रोल त्यांना भागीरथीच्या रुपात साकारायला मिळाला आणि त्यांनी तो एवढ्या ताकदीने साकार केलाय की त्यांची बोल्ड आणि ब्युटिफूल ही इमेजच त्यांनी विसरायला लावलीये. सुहास जोशी यांना तुलनेने सीन्स कमी आहेत, पण एका पत्नीची व्यथा आणि घुसमट त्यांनी उत्तरोत्तर वाढवत नेलीये. सचिन खेडेकरने पुन्हा एकदा आव्हानात्मक रोलमध्ये कमाल केलीये. सचिन दुहेरी भूमिकेत आहे आणि दोन्ही भूमिकांमधलं वेगळेपण त्याने सुंदरच दाखवलंय. म्हणजेच अभिनयसुद्धा दर्जेदारच आहे. कौशल इनामदारनेसुद्धा रहस्यमय सिनेमा आहे म्हणून कुठेही भडक पार्श्वसंगीताचा वापर केलेला नाही. सिनेमाच्या प्रकृतीला साजेसं पार्श्वसंगीत सिनेमाचा प्रभाव आणखी वाढवतं. एक खटकणारी गोष्ट म्हणजे गाण्यांचं पिक्चरायझेशन. पडद्यावर गाणी बघताना ती सिनेमाच्या बाजाशी विसंगत वाटतात. अशा काही त्रुटी सिनेमात आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर एक चांगली कलाकृती बघितल्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल.
रेटिंग : पितृऋण -75