मुंबई, 29 एप्रिल : बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) एकेकाळी तब्बल 150 किलो वजनाचा होता असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. खाण्यावर (Foodie) प्रचंड प्रेम असणाऱ्या अर्जुन कपूरनं अतिशय निग्रहानं आपलं वजन कमी केलं आणि बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून पदार्पण केलं. त्याचा फॅट टू फिटचा प्रवास त्याने एका कार्यक्रमात सांगितला आहे.
दिग्दर्शक बोनी कपूर यांचा मुलगा असलेल्या अर्जुन कपूरनं नुकतीच डिस्कव्हरी प्लसवरील (Discovery +s) स्टार व्हर्सेस फूड (Star vs Food) या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सेलिब्रिटीज आपल्या प्रिय व्यक्तींना जेवायला बोलावतात आणि त्यांच्यासाठी स्वतः जेवण बनवतात. अलिकडेच करण जोहर, करीना कपूर यांनीही या शोमध्ये उपस्थिती लावली होती.
अर्जुन कपूर यानं आपले काका अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि त्यांची पत्नी महिप कपूर (Mahip Kapoor) यांना भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. अर्जुन कपूर यानं त्यांच्यासाठी Laal Maas) आणि Chapali Kabab बनवले होते. त्याआधी त्यानं शेफ गुलाम गौस दिवानी यांच्याकडून भाज्या कापण्याचं प्रशिक्षणही घेतलं. दिग्दर्शक आर. बाल्की(R. Balki) याच्या ‘की आणि का’ (Kee & Kaa) चित्रपटातील भूमिकेची तयारी करत असतानाअर्जुननं पाककलेतील काही मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या होत्या. मात्र त्यातल्या बऱ्याच आता आठवत नसल्याचं त्यानं यावेळी कबूल केलं. अर्जुनचं पाक कौशल्य बघून संजय आणि महीप कपूर चांगलेच प्रभावित झाले.
हे वाचा - करीना कपूरचा चढला पारा; बेशिस्त नागरिकांना सुनावले खडेबोल
पंजाबी घराण्यात जन्मलेल्या आणि सरदाराचा नातू असलेल्या अर्जुन कपूर यानं आपलं बालपण, किशोरवयीन काळ आणि खाणं तसंच आपलं कुटुंब याबद्दल अनेक आठवणी सांगितल्या. लहानपणापासून खाण्याची अती आवड असल्यानं वयाच्या 16 व्या वर्षी त्याचं वजन तब्बल 150 किलो झालं होतं. तसंच अस्थमाचा विकारही जडला होता. अनेकदा त्याला दुखापतही होत असे, अशी आठवण अर्जुन कपूर यानं सांगितली. खाणं हा त्याचा भावनिक आधारही होता. त्याचे आई-वडील विभक्त झाले तेव्हा त्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्यानं खाण्याचा आधार घेतला.
त्याबाबत बोलताना अर्जुन म्हणाला की, "त्या काळात खाणं हा माझा आधार होता. मी अस्वस्थ झालो की खाण्याकडे ओढला जात असे. खाणं हा माझ्या समस्येवरचा उपाय आहे असं मला वाटत असे. त्याकाळात भारतात नुकतंच फास्ट फूड कल्चर (Fast Food Culture) विकसित होत होतं. त्यामुळं शाळेतून बाहेर पडल्यावर असं फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलं होतं. अशा खाण्याची चटक लागली की एका ठराविक टप्प्यानंतर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. ती तुम्हाला ओरडते. पण त्याचवेळी वय लहान असल्यानं हेच वय आहे खाण्याचं असं म्हणते आणि सोडून देते. त्यावेळी मलाही या सगळ्या परिस्थितीचा फायदा मिळाला आणि मी खात राहिलो. शेवटी परिणाम व्हायचा तो झालाच मी अतिलठ्ठ झालो."
हे वाचा - पाहा नोरा फतेहीचा जबरा फॅन; अभिनेत्रीला खुश करण्यासाठी अंगावर काढला टॅटू
"एकदा एका दिवाळीला मी फक्त बिर्याणी आणि मोठा टबभरून आईस्क्रीम खाल्लं. त्यानंतर मात्र मी ठरवलं, आता बस्स! या आयुष्यात खूप खाल्लं आता पुढच्या आयुष्यात आणखी खाणार नाही आणि तिथूनच माझ्या आयुष्यातील नव्या टप्प्याला सुरुवात झाली", अशी आठवण अर्जुन कपूर यानं सांगितली. एकदा खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र त्यानं अतिशय निग्रहानं आपल्या खाण्यावर ताबा ठेवला. तब्बल दोन वर्षे त्यानं भात आणि मिठाई खाणं पूर्णपणे बंद केलं होतं.
व्यायाम आणि योग्य आहार यावर भर दिल्यानं लवकरच अर्जुन कपूरचं वजन कमी झालं आणि तो एकदम तंदुरुस्त झाला. त्यानंतर हिरो म्हणून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा हा कायापालट त्याच्या मेहनतीचं आणि निग्रहाचं यश आहे. त्याची ही यशस्वी वाटचाल नक्कीच सगळ्यांना प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun kapoor, Bollywood, Bollywood actor, Entertainment, Fitness