मुंबई 10 मे: सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मनमोहक हास्य आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर ती गेले एक दशक मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सई ही मुळची सांगलीची आहे. अन् तेथील मंडळी मोठ्या अभिमानानं ती आमच्या शहरातील, तालुक्यातील, किंवा गावातील आहे असं सांगतात. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अमोल उदगीरकर (Amol Udgirkar) यानं सईचा असाच एक भन्नाट किस्सा सांगितला. जेव्हा त्यानं सांगलीतील एका मुलाला तेथील प्रेक्षणीय स्थळ विचारलं. तेव्हा त्यानं चक्क सई ताम्हणकरचं घर दाखवलं. (Sai Tamhankar house)
काही दिवसांपूर्वी अमोलनं हा किस्सा आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला होता. त्याची पोस्ट सईनं इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. “मी सांगलीला शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलसाठी गेलो होतो. तिथं मी एका स्थानिक मुलासोबत फिरत होतो. त्याला मी विचारलं, इथं पाहण्यासारखं काय आहे? तर तो मला एका घरासमोर घेऊन गेला अन् अभिमानाने म्हणाला, सई ताम्हणकरचं घर. मराठी चित्रपटांविषयी काही ऐकलं तर हा मुलगा मला आठवतो.” अशा शब्दात त्यानं हा अनुभव सांगितला. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
मृणाल कुलकर्णींना ‘अशी’ हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी
View this post on Instagram
सईनं 2008 साली ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिचा पहिलाच चित्रपट हा सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तिनं ‘पिकनिक’, ‘गजनी’, ‘लालबाग परळ’, ‘मिशन पॉसिबल’ यांसारख्या अनेक सुपरहिट हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. दरम्यान ‘नो एण्ट्री’ या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिनं परिधान केलेल्या बिकिनीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. अन् आज ती मराठीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.