Home /News /entertainment /

अमिताभ बच्चन यांनीही खाल्ला होता शिक्षकांकडून छडीने मार; ‘KBC’च्या भागात सांगितली आठवण

अमिताभ बच्चन यांनीही खाल्ला होता शिक्षकांकडून छडीने मार; ‘KBC’च्या भागात सांगितली आठवण

नुकत्याच झालेल्या कर्मवीर या विशेष भागात ग्लोबल टीचर अॅवॉर्ड विजेते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक रणजीतसिंह डिसले (Ranjitsinh Disale) आणि अभिनेते बोमन इराणी (Boman Irani) सहभागी झाले होते.

    मुंबई, 21 डिसेंबर : केबीसी अर्थात, कौन बनेगा करोडपतीच्या (KBC) 12 व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत असलेले बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच झालेल्या कर्मवीर (karamveer) या विशेष भागात आपल्या लहानपणींच्या आठवणींना उजाळा दिला. अमिताभ बच्चन यांनी शाळेत असताना प्रिन्सिपलच्या हातून चांगलाच मार खाल्ला असल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. लहानपणी ते चांगलेच खोडकर असल्याची माहिती त्यामुळं प्रेक्षकांना मिळाली. नुकत्याच झालेल्या कर्मवीर या विशेष भागात ग्लोबल टीचर अॅवॉर्ड विजेते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक रणजीतसिंह डिसले (Ranjitsinh Disale) आणि अभिनेते बोमन इराणी (Boman Irani) सहभागी झाले होते. त्यांच्यासह या भागात विशेष पाहुण्या म्हणून भोपाळमधील जहांगीराबाद इथल्या गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापक उषा खरे सहभागी झाल्या होत्या. या शिक्षक पाहुण्यांशी गप्पा मारताना अमिताभ बच्चन यांनाही आपल्या शालेय जीवनाची आठवण झाली आणि त्यांनी एक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन नैनितालमधील  (Nainital) शेरवूड कॉलेजमध्ये (Sherwood College) शिकत होते. एकदा त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी हॉकी स्टिकवर एक मेलेला साप अडकवून शाळाभर फिरवला. आपल्या धाडसाचं कौतुक व्हावं म्हणून त्यांनी तो साप मोठ्या अभिमानानं शाळेत सगळीकडं फिरवला. आपणच तो मारल्याची बतावणी केली. खरं तर बिग बी आणि त्यांचे मित्र खेळत असताना, त्या सापानं त्यांच्यावर हल्ला केला असताना एका शिकाऱ्यानं तो मारला; पण अमिताभ बच्चन आणि त्यांच्या मित्रांनी तो साप हॉकी स्टीकवर उचलून शाळेत आणला आणि सगळीकडं आपल्या पराक्रमाची जाहिरात करत दाखवला. पण एक कडक शिस्तीची ब्रिटिश व्यक्ती त्यांच्या शाळेची प्रिन्सिपल होती. त्यामुळं शाळेतही तसंच कडक शिस्तीचे वातावरण होतं. त्या प्रिन्सिपलना ही गोष्ट समजली. त्यांनी ताबडतोब अमिताभ बच्चन आणि त्यांच्या मित्रांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या चुकीसाठी सहा कटस देणार असं सांगितलं. शाळेच्या गॅरेजमध्ये तेल लावलेल्या वेताच्या छड्या ठेवलेल्या असत, चुका करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या छडीचे फटके खाण्याची शिक्षा मिळत असे. आता अमिताभ बच्चन आणि त्यांच्या मित्रांची फटके खाण्याची वेळ होती. प्रिन्सिपलनी त्यांना ओणवं वाकायला सांगितलं आणि पाठीवर सपासप त्या वेताच्या छडीचे फटके मारले. आजही अमिताभ बच्चन यांना ती शिक्षा आठवते. कहर म्हणजे फटके खाल्ल्यानंतर आपल्याला योग्य शिकवण दिल्याबद्दल मुलांनी प्रिन्सिपलना ‘थँक यू’ म्हणायची इच्छा होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, KBC

    पुढील बातम्या