व्रोक्लॉ, 26 ऑक्टोबर: पोलंडच्या व्रोक्लॉ शहरातील एका चौकाला हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत हरिवंश राय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांचं नाव देण्यात आलं आहे. अशी माहिती अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत दिली. 78 वर्षीय अमिताभ यांनी या ठिकाणाच्या चौकाचा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांचे दिवंगत वडील हरिवंश राय बच्चन यांचे नाव या चौकाला देण्यात आलं आहे. त्या फोटोमध्ये नामफलकावर हरिवंश यांचं नाव लिहिलेलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं आहे, "पोलंडमधील व्रोक्लॉच्या महानगरपालिकेने एका चौकाला हरिवंश राय बच्चन यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. दसऱ्याच्या दिवशी ही बातमी कळणं हा जणू वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे. हा क्षण खूप मोठा आनंदाचा आणि गौरवाचा आहे. ही भारत आणि पोलंडमधील भारतीयांसाठीही अभिमानाचा बाब आहे. जयहिंद"
हरिवंश राय बच्चन हे भारतीय हिंदी साहित्य क्षेत्रातील मोठं नाव. हिंदीतील त्यांच्या साहित्याचा अजूनही देशभरातील साहित्य संमेलनांमध्ये गौरव केला जातो. त्यांच्या कवितांचं वाचन होतं. या वर्षी जुलै महिन्यात व्रोक्लॉ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या कवितेचं वाचनही केलं होतं. पोलंडमधील सर्वांत असणाऱ्या एका चर्चने हरिवंश राय यांचा गौरव केला होता. त्या कार्यक्रमासाठी 2019 मध्ये अमिताभ बच्चन पोलंडला गेले होते. पोलंडने केलेल्या या गौरवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, साहित्यातील भावांनांना कोणतीच बंधनं नसतात. हरिवंशजींच्या कविता अजूनही परदेशी विद्यापीठांत शिकवल्या आणि गौरवल्या जातात.
20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या ‘नई कविता’ साहित्य चळवळीतून पुढे आलेल्या कवींपैकी हरिवंश राय बच्चन होते. त्यांची 'मधुशाला' ही दीर्घ कविता अजूनही अनेकांना तोंडपाठ आहे. अमिताभ बच्चन यांनीही अनेक कार्यक्रमांत ही कविता सादर केली आहे. हिंदी साहित्याच्या सेवेबद्दल हरिवंश राय बच्चन यांना 1976 मध्ये मानाचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होते. साहित्यिक हरिवंश राय बच्चन यांचं 2003 मध्ये निधन झालं.