मुंबई, 22 मार्च : मुंबईतील सर्वाधिक गजबजलेलं सार्वजनिक वाहतूकीचं ठिकाण म्हणजे दादर रेल्वे स्थानक. मुंबईच्या मध्यावर्ती असलेल्या या दादरमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. दादर रेल्वे स्थानकावरील गर्दी प्रत्येक मुंबईकराच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे. दरम्यान याच गर्दीच अनेक अपघात होतात. चोऱ्या होतात. अनेकांचे फोन चोरले जातात. दादरच्या गर्दीत हरवलेली वस्तू पुन्हा मिळेलच असं नाही. पण बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका खास व्यक्तीचा जवळपास लाखांचा फोन दादर स्थानकावर सापडला.
मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात दशरथ दौंड नावाच्या एका हमालाला 20 मार्च रोजी प्लॅटफॉर्मवर एक महागडा मोबाईल सापडला. 62वर्षांच्या दशरथ दौंड यांनी इमानदारीनं प्लॅटफॉर्मवर सापडलेला फोन रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी तो फोनचा चालू करून फोनच्या मालकाचा शोध घेऊन फोन त्याच्या हाती सोपवला. आपला फोन इमानदारीनं पोलिसांकडे आणून देणाऱ्या हमालाचं मालकानं बक्षीस देत आभार मानले.
हेही वाचा - रजनिकांतच्या मुलीनंतर सोनू निगमच्या घरीही चोरांनी मारला डल्ला; गायकाचे इतके लाख चोरीला
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, हमाल असलेल्या दशरथनं आणून दिलेला फोन हा 1.4 लाखांचा होता. हा फोन बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सर्वात जवळच्या मेकअप आर्टिस्टचा दीपक सावंत यांचा होता. सावंत यांचा फोन मिळाल्यानंतर त्यांना कुली दशरथना 1 हजार रूपयांचं बक्षीस दिलं.
द टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, दशरथ यांना सोमवारी प्रवाशांचं समान ने आण करण्याचं काम करत असताना रात्री जवळपास 11.40 वाजता दादरच्या प्लॅटफॉर्म 4वर एक फोन पडलेला मिळाला. त्या प्लॅटफॉर्मवरून अमृतसरसाठी एक ट्रेन रवाना झाली होती. दशरथनं सांगितलं की, प्लॅटफॉर्मवर मी असाच फिरत होतो. एके ठिकाणी बसलो तेव्हा तिथे एक फोन पडलेला दिसला. मी तो फोन उचलला. आजूबाजूला असलेल्या प्रवाशांना हा त्यांचा फोन आहे का असं विचारलं पण त्यांना नाही असं उत्तर दिलं.
दशरथ यांना फोन कसा वापरतात हे माहिती नाही. त्यामुळे त्यांनी फोन घेऊन दादर रेल्वे पोलिसांना गाठलं. त्यांना फोन दिला आणि ते त्यांचं काम आटोपून झोपण्यासाठी गेले. मोबइलच्या मालकाचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी दशरथ यांना बोलावलं आणि त्यांनी दीपक यांना सगळी घटना सांगितली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News