मुंबई,30 मार्च- 70-80 च्या दशकापासून आजतागायत चर्चेत असलेली बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन होय. या दोघांच्या लग्नाआधी आणि नंतरसुद्धा अनेकवेळा अमिताभ यांचं नाव लोकप्रिय अभिनेत्री रेखांसोबत जोडलं गेलं आणि आजही या गोष्टींचा सर्रास उल्लेख केला जातो. मात्र तरीही या दोघांनी आपल्या लग्नावर याचा काहीही परिणाम होऊ दिला नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्याचं नेहमीच कौतुक केलं जातं. आज आपण त्यांच्या लग्ना संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
लग्नाआधी जया बच्चन आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक हिट सिनेमे देत स्टारडम मिळवलं होतं. त्याकाळात अमिताभ बच्चन आपली ओळख निर्माण करत होते. दरम्यान या दोघांचा 'जंजीर' हा सिनेमा तुफान गाजला. अमिताभ बच्चन यांना या सिनेमातून अफाट लोकप्रियता मिळाली होती. ते एक नवे सुपरस्टार म्हणून समोर आले होते. याच सिनेमानंतर अमिताभ आणि जया यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
(हे वाचा:शर्मिला टागोर यांनी राजेश खन्नांसोबत काम करणंच केलेलं बंद; कारण वाचून बसेल धक्का )
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 1973 मध्ये लग्नगाठ बांधली होती. तेव्हापासून आतापर्यंत या दोघांनी आपलं नातं खूपच प्रेमाने जपलं आहे. जया आणि अमिताभ यांची जोडी इतर जोडप्यांसाठी एक उदाहरण समजली जाते. दोघेही प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, जया यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी बिग बींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. जयांनीं ती अट मान्य केल्यांनतर या दोघांनी लग्न केलं होतं. ती अट काय होती, याचा खुलासा स्वतः जया बच्चन यांनी एका पॉडकास्टदरम्यान केला होता.
त्या पॉडकास्ट शोमध्ये जया बच्चन यांनी सांगितलं होतं कि, 'पहिल्यांदा आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करायचं ठरवलं होतं. कारण तोपर्यंत मी माझ्या कामाच्या सगळ्या कमिटमेंट्स पूर्ण करु शकेन. त्यादरम्यान अमिताभ यांनी अट ठेवत सांगितलं होतं की, त्यांना अशी बायको नको आहे जी 9 ते 5 काम करेल. बिग बींनी जया यांना काम करण्यास सांगितलं होतं पण, रोज नाही. जया बच्चन यांनी चांगले प्रोजेक्ट निवडावेत आणि योग्य लोकांसोबत काम करावं अशी अमिताभ यांची इच्छा होती.असं जया बच्चन यांनी उघड केलं होतं.
जया बच्चन यांनी यापूर्वीही सांगितलं होतं की, ते ऑक्टोबरमध्ये लग्न करणार होते. पण दोघांनीही त्यांच्या 'जंजीर' चित्रपटाच्या यशानंतर एकत्र सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण अमिताभ यांच्या आईवडिलांनी या गोष्टीला नकार दिला. आणि बिग बींच्या पालकांनी सांगितलं की, जर त्यांना एकत्र सुट्टीवर जायचंच असेल तर आधी लग्न करावं लागेल. त्यामुळे त्यांना ऑक्टोबरऐवजी जूनमध्ये लग्न करावं लागलं होतं. हा विवाह जया यांच्या आजोळी पार पडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.