मुंबई, 15 डिसेंबर: 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठीच संकाटाचं, निराशेचं ठरलं. आधी कोरोना, लॉकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेली बेरोजगारी यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत गेले आहेत. बॉलिवूडनेही यंदा अनेक धक्के पचवले. 2020 सारखं वर्ष पुन्हा येऊ नये अशी इच्छा सर्वांचीच आहे. अगदी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांनाही तेच वाटतं. त्यामुळे त्यांनी चक्क नव्या वर्षाची दृष्ट काढली आहे.
सध्या 2021 या वर्षाची काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यापैकी एक मीम बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. या मीममध्ये 2021 असं लिहीलेला एक फोटो अमिताभने शेअर केले आहे. त्यात खाली लिंबू आणि मिरची लटकलेली दिसत आहे. अमिताभ यांनी या मीमवर 'कृपा कृपा कृपा' या कॅप्शन लिहिलं आहे.
या वर्षात बिग बी आणि त्यांच्या जवळजवळ सगळ्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर उपचार घेण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिषेक बच्चन आणि छोट्या आराध्यालाही कोरोना झाला होता.
कामाच्या बाबतीत बोलायचं तर, अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीचं शूटिंग करण्यात व्यस्त आहेत. शोच्या शेवटच्या आठवड्याचं शूटिंग सध्या सुरू आहे. अमितजींचे काही चित्रपट पुढील वर्षात रिलीज होणार आहेत. कोरोनामुळे त्यांच्या शूटिंगवरही परिणाम झाला होता.