मुंबई, 02 जानेवारी : ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या घरात साप, सरडे, बेडूक किंवा असे कोणतेही प्राणी आढळले तर फारसं नवल नाही; पण आज एका बेडकाचा फोटो व्हायरल झालाय. तो बेडूक बसलाय चार्जिंग पॉइंटमध्ये. आणि त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने. म्हणूनच त्या फोटोवर सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
'मी माझा फोन चार्ज करण्यासाठी पॉइंट शोधत होतो; पण मी आता दुसरा पॉइंट शोधीन. हा पॉइंट तर ऑक्युपाइड (दुसऱ्या कुणी तरी घेतलेला) आहे,' असं विनोदी कॅप्शन अक्षयकुमारने फोटोसोबत शेअर केलं आहे. चार्जिंगची पिन घालण्याचं सॉकेट फोटोत दिसत असून, त्याच्या बाजूची बटणाची जागा रिकामी आहे. त्यातून आतमध्ये वायरींच्या जंजाळात एक बेडूक शांतपणे बसलेला फोटोत दिसत आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्यांना या चित्राचं फारसं वेगळेपण किंवा कौतुक वाटणार नाही; पण अक्षय कुमारने असा फोटो शेअर केल्याने सगळ्यांचं कुतूहल चाळवलं आहे. हा फोटो त्याच्या घरातला नाही हे नक्की; पण तो कुठे टिपलेला आहे, याबद्दल मात्र त्याने काहीही लिहिलेलं नाही. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत; मात्र एक जानेवारीला अक्षयकुमारने सूर्योदयाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तो एखाद्या डोंगराळ भागातला होता, असं वाटतं आहे. त्यामुळे हा फोटोही त्या भागातलाच असावा, असा अंदाज आहे.
View this post on Instagram
मॉडेल आणि अभिनेता मुझम्मिल इब्राहिमने त्यावर एक विनोदी कमेंट केली आहे. 'आर यू चार्जिंग हिम रेंट?' (तुम्ही त्याला यासाठी 'चार्ज' करताय का? त्याच्याकडून शुल्क आकारताय का?) असा प्रश्न मुझम्मिलने विचारला आहे.
अनेक चाहत्यांनीही या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. पाच तासांत साडेसात लाखांहून अधिक जणांनी हा फोटो लाइक केला आहे. अनेकांनी 'मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात हे 'नॉर्मल' चित्र आहे,' अशी कमेंट एकाने केली आहे. 'बॉलिवूडचा सर्वांत श्रीमंत कलाकार आणि इतका बेकार स्विच बोर्ड?' असा सवाल एका युझरने केला आहे. 'तुम्ही एका फिल्मसाठी 125 कोटी रुपये चार्ज करता आणि मोबाइल इतक्या घाणेरड्या जागी चार्ज करता?,' अशी कमेंटही एकाने केली आहे.
अक्षय कुमारने 'अतरंगी रे' या त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग अलीकडेच संपवलं आहे. हा सिनेमा आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केला आहे. त्या सिनेमात धनुष आणि सारा अली खान यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यासोबतच, बेलबॉटम, बच्चन पांडे, रक्षाबंधन, पृथ्वीराज असे अनेक सिनेमे त्याच्या हातात असून, त्यावर काम सुरू आहे. सूर्यवंशी हा त्याचा सिनेमा या वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood News