सैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत! हा आहे आरोप

सैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत! हा आहे आरोप

तांडव (Tandav) ही सीरिज गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. दरम्यान तांडव पाठोपाठ काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर (Mirzapur) या सीरिजविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी: गेल्या काही काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार वेबसीरिज प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. मात्र ज्याप्रमाणे ऑनलाइन कंटेटमध्ये वाढ होत आहे त्याच वेगाने त्याबाबतचे वादही वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) दिग्दर्शित आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर तांडव (Tandav) या सीरिजबाबत वादंग उठला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी या सीरिजमध्ये हिंदू देवी देवतांचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे.  दरम्यान काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर' वर देखील आता एक संकट आलं आहे. या सीरिज विरोधातही एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'मिर्झापूर' (Mirzapur) ही सीरिज बनवणाऱ्या टीमच्या चौकशीकरता मिर्झापूर पोलिसांची एक टीम मुंबईसाठी रवाना झाली आहे. देहात पोलीस ठाण्यातील तीन सदस्यांची टीम मुंबईला रवाना झाली आहे. या सीरिजवर धार्मिक, सामाजिक आणि क्षेत्रीय भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप आहे. शिवाय सामाजिक वैमनस्य पसरवल्याचा आरोपही या सीरिजवर करण्यात आला आहे. याप्रकरणीच या सीरिजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 295-A, 504, 505, 34, 67A अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'मिर्झापूर'चे निर्माते आणि अ‍ॅमेझॉन प्राइमविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हे वाचा-Tandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक? UP पोलीस मुंबईत दाखल)

मिर्झापूर ही सीरिज पहिल्या सीझनपासूनच त्यातील संवादामुळे चर्चेत आहे. दुसरा सीझनही तेवढाच गाजला होता. दरम्यान मिर्झापूरचे चुकीचे वर्णन या सीरिजमध्ये केल्याचा आरोप करत मिर्झापूरच्या खासदार आणि अपना दलच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी आधीच सीरिजविरोधात कारवाईची मागणी केली होती.

तांडवच्या दिग्दर्शकाने मागितली माफी

दिग्दर्शक अली अब्बास जफरने काल एक ट्वीट करून माफी मागितली आहे. त्यावेळी त्यांनी तांडवमधील आक्षेपार्ह सीन बदलणार असल्याचंही म्हटलं होती. तसेच तांडवच्या टीमकडून  कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असंही या पोस्टमध्ये म्हटलं होतं. पण कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो. तसेच आवश्यक ते बदल करण्याचा निर्णयही घेतल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं होतं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 20, 2021, 6:09 PM IST

ताज्या बातम्या