मुंबई, 7 नोव्हेंबर : 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) हिच्या पतीने काही दिवसांपूर्वी राहत्या घरातच गळफार लावून आत्महत्या केली होती. आशुतोष भाकरेने नैराश्यातून आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती त्यानंतर पुढे आली होती. आशुतोषच्या या पाऊलामुळे त्याच्या घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आता मयुरी हळूहळू यातून सावरत आहे. पतीच्या निधनानंतर तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. हळुहळु मयुरी आपल्या दु:खातून सावरत आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
स्टार प्लसवर मयुरीची इमली (Imlie) नावाची मालिका येऊ घालत आहे. यामध्ये ती मुख्य भूमिकेत असल्याचे दिसते. मयुरी या मालिकेत गश्मीर महाजनीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करताना मयुरीने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. ती या पोस्टमध्ये म्हणते..मी हळूहळू दु:खातून सावरत आहे. तुम्ही माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे आम्हाला बळ मिळालं. तुम्ही दिलेल्या प्रेमातून मला नवं करण्याची ऊर्जा मिळते. पुन्हा एकदा तुमच्या सोबतीची गरज आहे. मी नवीन सुरूवात करीत आहे.
हे ही वाचा-नाना पाटेकर-जेनेलियाचा हा सिनेमा TV वर होणार प्रदर्शित, 10 वर्ष रखडलं प्रदर्शन
मयुरीचा पती आशुतोष भाकरेने 'इचार ठरला पक्का' आणि 'भाकर' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 20 जानेवारी 2016 रोजी आशुतोष आणि मयुरीचं लग्न झालं होतं. लॉकडाऊनमध्ये नांदेडच्या घरी असताना आशुतोषने आत्महत्या केली. अभिनेत्री मयुरी देशमुख हिने अनेक सीरिअल्स, सिनेमा आणि नाटकांमध्ये कामं केली आहेत. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. '31 दिवस' आणि 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या सिनेमांमध्येही मयुरी झळकली होती. 'डिअर आजो', 'तिसरे बादशाह हम' या नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.