मुंबई, 03 नोव्हेंबर: गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचा खटला, कसाबची फाशी कशी दिली गेली. हे सगळे न्यायालयीन खटले आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा येणार आहे.स्वत: उज्ज्वल निकम यांनी या वृत्ताला होकार दर्शवला आहे. "या कथेपासून आजच्या तरुणाईला प्रेरणा मिळावी" अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन उमेश शुक्ला (Umesh Shukla) करणार आहेत. याआधी उमेश शुक्ला यांनी ओह माय गॉड’ आणि ‘102 नॉट आउट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे.
येत्या वर्षात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. "ही फिल्म करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे" अशी प्रतिक्रिया उमेश शुक्ला यांनी दिली आहे. उमेश शुक्ला म्हणाले, “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावरील सिनेमा दिग्दर्शित करणार आहे.” आँख मिचोली या सिनेमाच्या फायनल एडिटिंगचं काम सध्या उमेश शुक्ला करत आहेत. या सिनेमाचं शूटिंग पंजाब आणि स्विझर्लंडमध्ये करण्यात आलं आहे. या सिनेमामध्ये मृणाल ठाकूर, शर्मन जोशी, परेश रावल, दिव्या दत्ता, विजय राज, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमाचं नाव 'निकम' असं असणार आहे. तसंच सिनेमात मुख्य भूमिका कोण करणार याच्यावरही अद्याप शिक्कामोर्तब व्हायचा आहे. बॉम्बे फेबल्स आणि मेरी गो राऊंड यांनी या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भावेश मंडलिया यांनी या चित्रपटाची पटकथा लिहली आहे. पण हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना बरंच काही शिकवणारा असेल हे मात्र नक्की.