Home /News /entertainment /

विजयबरोबर 'थालापती 65' दिसणार ही अभिनेत्री? हृतिकच्या सिनेमातून केला होता डेब्यू

विजयबरोबर 'थालापती 65' दिसणार ही अभिनेत्री? हृतिकच्या सिनेमातून केला होता डेब्यू

मिस इंडियाची स्पर्धक आणि मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेतील सेकंड रनरअप ठरलेली मॉडेल, अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) आता लवकरच एका तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

    मुंबई, 19 जानेवारी: मिस इंडियाची स्पर्धक आणि मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेतील सेकंड रनरअप ठरलेली मॉडेल, अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) आता लवकरच एका तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनबरोबर 2016 मध्ये मोहेंजोदारो चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पूजा हेगडेनं आपल्या उत्तम कामानं हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता ती दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याच्याबरोबर ‘थालापाती 65’ या रोमँटिक चित्रपटात झळकणा असल्याची माहिती मिळते आहे. विजय याचा ‘मास्टर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विजय यानं त्याचा 65 वा चित्रपट निश्चित केल्याचं जाहीर केलं होतं. त्याचं नाव तात्पुरते ‘थालापाती 65’ असं ठेवण्यात आलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. नेल्सन दिलीपकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, अलीकडेच त्यानं हैद्राबादमध्ये पुजाची भेट घेऊन या चित्रपटासाठी तिला विचारणा केली होती. पूजाने यात काम करण्यास होकार दिल्यानं आता फेब्रुवारी महिन्यापासून ‘थालापाती 65’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नेल्सन दिलीपकुमार सिवा कार्तीकेयनची मुख्य भूमिका असलेल्या डॉक्टर या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. ‘थालापाती 65’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी अरुण विजय याच्याशी चर्चा सुरू आहे. याआधी त्याने येन्नाई अरींधल या चित्रपटात काम केलं होतं. पूजा हेगडे हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अधिक लोकप्रिय असून, हिंदीपेक्षा तिचे तेलगु, तामिळ भाषेतील चित्रपट चांगलेच गाजले आहेत. पुजानं 2012 मध्ये मूगामूडी या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. हिंदीतील तिचा पहिला मोहेंजोदाडो म्हणावा तितका गाजला नाही, पण तिच्या कामाचं कौतुक झालं. त्यानंतर हिंदीतील ‘हाउसफुल 4’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. तिचा अला वैकुंठपुरमलो हा चित्रपटदेखील गाजला. याशिवाय अनेक तमिळ, तेलगु चित्रपटातून तिनं काम केलं असून, तिचा चाहतावर्ग मोठा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासबरोबर ती राधेश्याम या चित्रपटात झळकणार असून, अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट तिच्या हातात आहेत. पुजाच्या या नवीन चित्रपटाची खबर मिळताच सोशल मीडियावर ‘थालापाती 65’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पूजाचे चाहते या बातमीनं खूश झाले असून, तिच्या या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारे आनंद व्यक्त करण्यात येणाऱ्या अनेक पोस्ट करण्यात येत आहेत. पुढील वर्षी दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सन पिक्चर्सची ही निर्मिती असून, एका छोट्या व्हिडीओद्वारे या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या