रमाकांत तिवारी, मुंबई, 27 ऑक्टोबर : अनेक हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीवर मुंबईतील अंधेरी भागात प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालवी मल्होत्रा या अभिनेत्रीवर चाकूहल्ला झाला आहे. मालवी मल्होत्रावर मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर मालवीला याआधी एका निर्माता म्हणून भेटला होता. एकदोन वेळा त्याने तिची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने अभिनेत्रीला लग्नासाठी प्रपोज केले. मात्र अभिनेत्री मालवीने त्याला नकार दिला होता. लग्नासाठी त्याचा दबाव वाढतच होता, मात्र मालवीला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते.
मालवीच्या नकारानंतर या व्यक्तीने तिच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. चाकूने मालवीवर तीन वार करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सध्या अभिनेत्रीची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
(हे वाचा-'ती' ड्रग पार्टी नव्हतीच! करण जोहरच्या पार्टीत आलेल्या कलाकारांना NCBचा दिलासा)
योगेशकुमार महिपाल सिंग या इसमावर या हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांची ओळख फेसबुकवर झाल्याचे अभिनेत्रीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. अभिनेत्रीने दिलेल्या जबाबानुसार त्यांची भेट कॅफे कॉफी डे मध्ये झाली होती. त्यानंतर तो निर्माता असल्याचे तिला समजले. त्यावेळी योगेशकुमारने तिला वारंवार प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून लग्नाची मागणी करत होती. तिने नकार देऊनही वारंवार तिचा पाठलाग केल्याचे मालवीने म्हटले आहे.
View this post on InstagramBlue completes me ....what do you think ...? #goa #malvimalhotra #beyou #🔹🔹
तिने असे म्हटले आहे की, 25 तारखेला ती शूटिंग संपवून दुबईहून परतली तेव्हा देखील तो तिच्या बिल्डिंगखाली होता. त्यामुळे ती घराबाहेर न पडता घरीच थांबली होती. 26 ऑक्टोबरच्या रात्री सातबंगला याठिकाणच्या कॅफे कॉफी डेमधून ती एकटीच पायी चालत घरी परतत होती, त्यावेळी अंधेरी पश्चिममधील वर्सोवा याठिकाणी त्याने तिला गाठले. तिने जबाबात असे म्हटले आहे की, तो ऑडीमधून आला होता. तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्यानंतर त्याने जिन्सच्या खिशातील चाकू काढून अभिनेत्रीवर हल्ला केला. अभिनेत्रीने तक्रारीत असे म्हटले आहे की या इसमाने तिच्या डाव्या हातांच्या बोटावर, उजव्या हाताच्या मनगटावर आणि पाठीत हल्ला केला. तिच्या ओरडण्याने त्याठिकाणचे लोकं सैरावैरा पळत होते, पण तो निघून गेल्यावर काही व्यक्तींनी तिला रिक्षामधून रुग्णालयात भरती केले.
(हे वाचा-भावाच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन)
मालवीने तेलुगू आणि मल्याळम सिनेमात काम केले आहे. हिंदी सिनेमात देखील ती झळकली आहे. कलर्सवरी उडानमध्ये देखील तिने काम केले होते. तिने मुंबईत तिने सहा महिन्यांचा अभिनयाचा कोर्स केला होता.