नोकरी गेल्यामुळे सॉफ्टवेअर इंजीनिअरवर भाजी विकण्याची आली वेळ, सोनू सूदने पाठवलं जॉब लेटर

नोकरी गेल्यामुळे सॉफ्टवेअर इंजीनिअरवर भाजी विकण्याची आली वेळ, सोनू सूदने पाठवलं जॉब लेटर

अनेकांच्या मदतीस धावणारा अभिनेता सोनू सूदने आता हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजीनिअरची मदत केली आहे. या मुलीची कोरोनाच्या संकटात नोकरी गेल्यामुळे तिने भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : कोरोनाच्या संकटकाळात प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे मोलाचे कार्य अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) गेल्या काही महिन्यांपासून करत आहे. यानंतर तो अनेकांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे. एवढ्यावरच त्याची मदत थांबली नाही तर त्याने मुंबई पोलिसांना फेस शिल्ड दिले, एका शेतकऱ्याला ट्रॅक्टर दिला, एकाला गाय परत मिळवून दिली, लाठीकाठीचा खेळ करणाऱ्या आजीबाईंना मदत केली. सोनूने केलेल्या मदतीची यादी खूप मोठी आहे. दरम्यान सोनूने आता हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजीनिअरची मदत केली आहे. या मुलीची कोरोनाच्या संकटात नोकरी गेल्यामुळे तिने भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र सोनू सूदच्या मदतीमुळे तिची नवीन नोकरीच्या ठिकाणी मुलाखत झाली आणि तिला ती नोकरी मिळाली देखील.

या तरुणीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता, तिला कोव्हिड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नोकरी गमवावी लागली होती. यामुळे या मुलीने भाजी विकण्याचा पर्याय निवडला होता.

(हे वाचा-'पाकिस्तानी एजंटला लग्नात बोलावले, JNU निषेधाचा कट रचला',कंगनाचा दीपिकावर निशाणा)

एका ट्विटर युजरने सोनू सूदला ट्विटरवर टॅग करत असे लिहिले होते की, 'डिअर सोनू सूद, ही शारदा आहे, तिला कोव्हिडच्या संकटात @VirtusaCorp ने नोकरीवरून काढून टाकले आहे. मात्र हार न पत्करता तिने कुटुंबाच्या मदतीसाठी भाजी विकणे सुरू केले आहे. कृपया तुम्ही तिची मदत करू शकाल तर यामध्ये लक्ष घाला. आशा करतो की तुम्ही रिप्लाय द्याल.'

सोनूने या ट्वीटवर रिप्लाय देताना असे म्हटले आहे की, 'माझे अधिकारी तिला भेटले आहेत. मुलाखत झाली आहे. जॉब लेटर सुद्धा पाठवण्यात आले आहे. जय हिंद.'

दरम्यान प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट हे अ‍ॅप देखील लाँच केले आहे. 'प्रवासी रोजगार' असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे अ‍ॅप प्रवासी कामगारांना नोकरी शोधण्यासाठी सर्व आवश्यक माहिती देईल.

(हे वाचा-सुशांतच्या मृत्यू प्रकरणी गृहमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक)

प्रवासी कामगारांना, मुंबई पोलिसांना मदत केल्यानंतर सोनूने हे अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. मुंबई मिररच्या एका अहवालानुसार, सोनू सूदने अशी माहिती दिली आहे की गेल्या काही महिन्यांपासून हे अ‍ॅप डिझायन करण्याचा विचार केला होता. त्यानंतर योजना आखून तयारी करण्यात आली. यासंदर्भात अव्वल संस्थांशी व्यापक चर्चा झाली आहे. स्वयंसेवी संस्था, परोपकारी संस्था, सरकारी अधिकारी, रणनीती सल्लागार, तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि सर्व प्रवाशांना ज्यांना त्यांच्या घरी पोहोचवले त्या सर्वांशी चर्चा झाली असल्याचं तो म्हणाला. अहवालानुसार, विविध क्षेत्रांतील सुमारे 500 कंपन्या या पोर्टलवर बांधकाम, परिधान, आरोग्य, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, वाहन, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देतील.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 29, 2020, 10:26 PM IST
Tags: Sonu Sood

ताज्या बातम्या