मुंबई, 25 एप्रिल: बॉलिवूडचा ‘बादशाह’ अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) बॉलिवूडच्या‘सेल्फ मेड’सुपरस्टार्सपैकी एक आहे. टेलिव्हिजन स्टार ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुपरस्टार हा प्रवास शाहरुखसाठी सोपा नव्हता. 14व्या वर्षीच वडिलांचे छत्र हरवलेल्या शाहरुखला त्याच्या आईनेच पुढे जाण्याची हिंमत दिली. नंतर जेव्हा आईही त्याला सोडून गेली, तेव्हा मात्र तो पूर्णपणे कोसळला होता. याबाबतचाच एक किस्सा शाहरुखने स्वतःच सर्वांना सांगितला होता.
शाहरुखच्या जीवनातील कित्येक किस्से तो विविध मुलाखतींमधून किंवा कार्यक्रमांतून सांगत असतो. त्यामुळे त्याच्या जीवनातील कित्येक प्रेरणादायी गोष्टी त्याच्या फॅन्सना माहिती आहेत. मात्र त्याच्या जीवनातील दुःखद गोष्टी तो क्वचितच सर्वांना सांगतो. 2019 मध्ये डेविड लेटरमॅनच्या प्रसिद्ध टॉक शो ‘माय नेक्स्ट गेस्ट विथ डेविड लेटरमॅन’ यामध्ये शाहरुखने आपल्या लहानपणीचे काही संघर्षमय किस्से शेअर केले होते.
(हे वाचा-गौरी नव्हे तर काजोलला समजत होता शाहरुख खानची पत्नी, वरुण धवनचा भन्नाट किस्सा)
वडिलांच्या निधनानंतर शाहरुखला त्याच्या आईनेच त्याला जगण्याची प्रेरणा दिली होती. शाहरुख सांगतो, की जेव्हा त्याच्या आई फातिमा खान यांना रुग्णालयात दाखल केलं होतं, तेव्हा आईला त्याचा अभिनय पाहता यावा, यासाठी त्याने रुग्णालयात व्हीसीआरची व्यवस्था केली होती. तेव्हा शाहरुख मालिकांमध्ये काम करत होता. शाहरुख त्याच्या आईचा खूप लाडका होता. त्यामुळे आईला नेहमी त्याची चिंता वाटायची.
शाहरुखने अभिनय सुरू केला आणि त्याचं स्वप्न पूर्ण होताना बघून त्याची आई खूश होती. मात्र, तरीही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती.
शाहरुख सांगतो, ‘आई आयसीयूत असताना मी तिला त्रास द्यायचो. म्हणजे तिला काळजी वाटावी आणि माझ्या काळजीपोटी ती बरी व्हावी. असेच एकदा मी तिच्या शेजारी बसलो आणि काहीही बोलायला लागलो. मी तिला म्हटलं की मी स्वार्थी होईन, मोठी बहीण लालारुखचे लग्न लावून देणार नाही, मी काम करणार नाही आणि दारू प्यायला सुरुवात करेन.’ मी तिला सगळं खोटं सांगितलं. मी स्वतःबद्दलच वाईट बोललो जेणेकरून तिला माझी काळजी वाटावी आणि तब्येतीत सुधारणा व्हावी. मात्र,‘अल्लाह मला या मुलाची खरच काळजी वाटते,’ असं म्हणत दुसऱ्या दिवशी सकाळी आईने शाहरुखच्या मिठीत अखेरचा श्वास घेतला. शाहरुखने आई बरी व्हावी, यासाठी खूप प्रयत्न केले.
आई-वडिलांच्या निधनानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबाबत शाहरुखने एकदा हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. आई-वडिलांच्या निधनांचं दुःख मला आयुष्यभर राहील असेही किंग खान त्या मुलाखतीत म्हणाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Shahrukh khan