ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं निधन

तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५०००हून अधिक प्रयोग झाले

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2017 07:36 PM IST

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं निधन

02 जुलै : ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक, निर्माते, दिग्दर्शक मधुकर तोरमडल यांचं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. मधुकर तोरडमल गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते. आज मुंबईत त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. शुक्रवार रात्रीपासून त्यांची तब्येत आणखी खालावली होती. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना त्रास होत होता. अखेर मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मधुकर तोरडमल यांनी मुंबईत शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुर्ला येथे ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ कंपनीत काही काळ ‘लिपिक’ म्हणून काम केलं. त्यानंतर ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. या काळात ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’ आदी नाटके त्यांनी केली. राज्य नाट्य स्पर्धेतूनही ते सहभागी झाले. स्पर्धेत त्यांनी ‘एक होता म्हातारा’ हे नाटक सादर केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे त्यांना ‘मामा’ ही बिरुदावली मिळाली आणि पुढे सगळेजण त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले आणि अवघ्या मराठी नाट्यसृष्टीचे ‘मामा’ झाले.

प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्यानं नोकरी सांभाळून ते नाटक करत होते. पण जम न बसल्यामुळे ते पुन्हा मुंबई परतले. मुंबईत आले आणि तिथे रंगभूमी क्षेत्रात नावलौकिक मिळवला.

तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५०००हून अधिक प्रयोग झाले आहेत. तसंच त्यांचं 'बॅरिस्टर' हे नाटकंही चांगलं गाजलं.

तोरडमल यांनी ‘नाट्यसंपदा’, ‘नाट्यमंदार’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या आणि प्रामुख्याने ‘चंद्रलेखा’च्या नाटय़संस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, अखेरचा सवाल’, ‘घरात फुलला पारिजात’, ‘चाफा बोलेना’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ आदी अनेक नाटके केली. ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी साकारलेला ‘भीष्म’ही गाजला. याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे.

कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close