मुंबई, 18 नोव्हेंबर: 'जाने तू या जाने ना'मधील जय आठवतोय? जय आणि आदितीची मैत्री आणि मैत्रीतून निर्माण झालेलं प्रेम. कलाकारांचे उत्तम अभिनय आणि दर्जेदार लेखन यामुळे हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यातल्या जयने म्हणजेच अभिनेता इम्रान खानने (Imran Khan) अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून इम्रान मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्याचा जवळचा मित्र असलेल्या अक्षय ओबेरॉयने (Akshay Oberoi) स्वत: याबाबत खुलासा केला आहे.
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षय ओबेरॉय म्हणाला, ‘इम्रान माझा अतिशय जवळचा मित्र आहे. त्याने अभिनयातील करिअरला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 18 वर्षांपासून आम्ही एकमेंकांचे मित्र आहोत. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. अगदी पहाटे 4 वाजतादेखील आम्ही एकमेंकांच्या मदतीला धावून जाऊ शकतो.’ पुढे अक्षय म्हणाला, ‘इम्रानने अभिनयातून संन्यास घेतला असला तरी तो चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर जाणार नाही. दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये तो लवकरच पदार्पण करेल.’ सिनेमे फ्लॉप होणं हा प्रत्येकाच्या कारकिर्दीचा एक भाग असल्याचंही अक्षयने सांगितलं. इम्रानने बर्याच सिनेमांमध्ये काम केले. त्यातले काही चालले तर काही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरले.
अभिनेता इम्रान खानची सुरूवातीची ओळख आमिर खानचा (Aamir Khan) भाचा अशी होती. त्यानंतर त्याने जाने तू या जाने ना, दिल्ली बेली, आय हेट लव्ह स्टोरी, किडनॅप, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'कयामत सें कयामत तक' या सिनेमामध्ये इम्रानने बालकलाकाराची भूमिका केली होती. कंगना रणौतसोबतच्या कट्टी बट्टी या सिनेमानंतर तो कोणत्याही सिनेमात झळकला नाही.
इम्रान खान अभिनयामध्ये करिअर आजमावल्यानंतर आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत दिसण्याची शक्यता आहे. यात त्याला यश येतं का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.