मुंबई, 07 ऑगस्ट : कोकणासह मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेले 3-4 दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या काळामध्ये मुंबई परिसरातील व्हायरल झालेले व्हिडीओ थक्क करणारे आहेत. दरम्यान 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये गणेशपुरेंचा फोन लंपास करण्यात आला आहे. फेसबुकवरून भारत गणेशपुरे यांनी हा अनुभव शेअर केला आहे. एका टोळक्याने वाहतूक कोंडी दरम्यान त्यांचा फोन पळवल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान त्यांनी त्यांच्या चाहत्यांना अशा प्रसंगांसाठी सावधातना बाळगण्याचे आवाहनही केले आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदीवलीजवळ डोंगराचा भाग कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. याठिकाणी आधी काही गाड्या असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यात धो धो कोसळणारा पाऊस होताच. याचाच फायदा घेत चोरट्यांनी फोन लंपास केला.
(हे वाचा-भल्लालदेव चढणार बोहल्यावर! होणाऱ्या बायकोच्या मेहेंदीचे PHOTO व्हायरल)
हा व्हिडीओ शेअर करत भारत गणेशपुरे म्हणाले आहेत की, 'आज माझा मोबाइल अक्षरक्ष: लुटून नेला. ही घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदवलीजवळ घडली. खूप पाऊस होता. काल दरड कोसळल्यामुळे खूप ट्रॅफिक होते.' ही घटना नेमकी कशी घडली याची सविस्तर माहिती त्यांनी या व्हिडीओतून दिली आहे. दोन माणसांनी वाहतूक कोंडीचा फायदा घेत त्यांना लुटल्याची माहिती गणेशपुरे यांनी दिली आहे.
'सतर्क राहा'
दरम्यान हा व्हिडीओ शेअर करताना भारत गणेशपुरे यांनी त्यांच्या चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, 'कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती तुमच्या गाडीमध्ये सेंटर लॉक असेल तर आधी गाडी लॉक करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटले तरी चालेल. दिवस सध्या वाईट आहेत. याच्यामध्ये बायका, लहान मुले असतात. त्यांच्याकडून-मागची खिडकी उघडी आहे, गाडीच्या समोर स्पार्क होत आहे किंवा मागच्या टायरमध्ये हवा नाही आहे, असे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जाईल. पण गाडीतून तुम्ही उतरू नका. काळजी घ्या. माझा मोबाइल माझ्या मुर्खपणामुळे या टोळीने लुटून नेला आहे.'
दरम्यान भारत गणेशपुरे यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान अशावेळी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain