मुंबई, 12 ऑगस्ट : नवोदित अभिनेता आशुतोष भाकरे याने 29 जुलै रोजी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या जाण्याने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्याची पत्नी आणि अभिनेत्री मयुरी देशमुख हिने त्याच्या वाढदिवशी शेअर केलेली पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे. 11 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस होता, मयुरीने केकचा फोटो शेअर करत तिच्या 'आशुडा' अर्थात आशुतोष भाकरेबाबत पोस्ट शेअर केली आहे.
मयुरीने तिच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आशुडा, मी या लॉकडाऊनमध्ये 30 विचित्र केक बनवले, जेणेकरून तुझ्या वाढदिवसाला मी उत्तम केक बनवेन. तू त्या 30 केक्सचा पहिला तुकडा खाल्लास पण हा... ही तुझी 30 वाढदिवस आधीच सेलिब्रेट करण्याची पद्धत होती का? तुझ्या प्रियजनांसाठी तू खूप प्रश्न अनुत्तरित ठेवली आहेस. आम्हाला माहितेय तुझे वागणे भ्याड नव्हते, नैराश्याविरोधात सुरू असणाऱ्या तुझ्या दीर्घकालीन लढाईमुळे आलेली असहाय्यता होती. पण माझं गुणी बाळ ते... आपण त्याला हरवण्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, तू खरंच किती चांगलं काम करत होता. अजून थोड्याचीच गरज होती.'
(हे वाचा-युरोपमध्ये ते चित्र पाहून सुशांतची मानसिक स्थिती बिघडू लागली,रियाचा ED समोर दावा)
ती पुढे म्हणाली की, 'रोज, प्रत्येक सेकंदाला आपल्याला जाणवत होते की अजून थोड्या धीराची, धैर्याची गरज आहे आणि त्यानंतर एक निरोगी आयुष्य तुझी वाट पाहत होते. आपली वाट पाहत होते. तू मला असं अर्ध्यात सोडून गेलास यामुळे मी तुझ्यावर रागावू की जितका वेळ सोबत होतास त्याकरता आभार मानू? तुझ्या आत्म्याचा शांततेत प्रवास व्हावा आणि देवदूत तुला मार्गदर्शन करतील अशी आम्ही प्रार्थना करतो. आता नेहमीसारखा हट्टीपणा करू नको, देवदूतांचे ऐक. '
'मी, अभि, मम्मी आणि पप्पा तुझ्यावर अतोनात प्रेम करतो आणि तू इथे असताना आम्ही ते पूर्णपणे व्यक्त केले अशी आशा आहे. तु यातनेमध्ये असताना देखील माझ्यावर खूप प्रेम केलं होत, मी देखील तेच करेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
फक्त तुझीच
#baaykotujhinawasachi'
(हे वाचा-'देव पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेतोय..',संजय दत्तच्या पत्नीची भावुक प्रतिक्रिया)
मयुरीने शेअर केलेली ही पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे. अनेक कलाकारांनी यावर तिला धीर देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. . 2016 मध्ये आशुतोष आणि मयुरी विवाहबंधनात अडकले होते. आशुतोषच्या आत्महत्येवेळी मयुरी मुंबईमध्ये होती, तर तो नांदेड याठिकाणी त्याच्या राहत्या घरी होता. त्याच्या मृत्यूनंतर मयुरीने दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे.