मुंबई, 19 जानेवारी : चर्चा, वाद-विवाद, मार्केट स्ट्रॅटेजीमुळे बॉलिवूडचे चित्रपट तुफान हिट झाल्याचं आपण ऐकलं, पाहिलं आहे. अशा गोष्टींचा फायदा साहजिकच चित्रपटाशी निगडित व्यक्तींना होताना दिसतो. प्रेक्षकांचं मात्र यातून मनोरंजन होतं. 90च्या दशकात 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामुळे 'बेवफा सनम' हा चित्रपट जोरदार चर्चेत होता. हा चित्रपट प्रेम, धोका आणि हत्येच्या कथेवर आधारित आहे. अविश्वासू प्रेयसीच्या हत्येची ही कथा लोकांना खरी वाटू लागली होती. हा खुनी पाकिस्तानी होता आणि त्याच्याशी भारतीयांच्या संवेदना जोडल्या होत्या. खरं तर हे गाणं ऐकल्यावर तुम्हालाही अताउल्लाह खानची आठवण आली असेल. हे गाणं अताउल्लाह खाननं तुरुंगात लिहिलं होतं असं म्हणतात. या चित्रपटामागची कहाणी थोडी वेगळी आहे. सगळे जण समजतात तशी नक्की नाही. यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊ या.
'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...' या ओळींशी अनेकांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हे गाणं ऐकल्यावर अनेकांना सर्वांत प्रथम आठवतो तो अताउल्लाह खान आणि गोळ्या खाणारी शिल्पा शिरोडकर. टी-सीरिजने हे गाणं पुन्हा रिक्रिएट केल्याने 1995मध्ये रिलीज झालेल्या 'बेवफा सनम' या चित्रपटाशी निगडित आठवणींना उजाळा मिळत आहे. काही जणांना या चित्रपटातली अविश्वासू प्रेमिका आणि तिच्या हत्येची कहाणी खरी वाटली होती. त्यामुळे अताउल्लाह खान हे नाव जोरदार चर्चेत आलं होतं. त्याने हे गाणं तुरुंगात लिहिलं असं बोललं जात होतं.
हेही वाचा - Bharat Vyas : लेकाच्या विरहात लिहिलेलं गीत झालं प्रेमवीरांचं अजरामर गाणं
ही कहाणी काहीशी अशी सांगितली जाते. अताउल्लाह खान पाकिस्तानी गायक आणि शायर आहेत. त्यांच्या प्रेयसीचे त्यांच्या मित्रासोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने धोका दिल्याने संतापलेल्या अताउल्लाह यांनी त्यांच्या प्रेयसीची हत्या केली. या गुन्ह्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा झाली. त्यांनी वेदना आणि विश्वासघाताशी संबंधित गाणं तुरुंगात असताना लिहिलं आणि गायलं. ही कहाणी त्या वेळी बहुतांश जणांना खरी वाटत होती.
चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांनी 1995मध्ये या कहाणीवर आधारित 'बेवफा सनम' नावाचा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटात गुलशन कुमार यांचा भाऊ किशनकुमार प्रमुख भूमिकेत होता, तर शिल्पा शिरोडकरने त्याच्या प्रेयसीची भूमिका निभावली होती. आयएमडीबीवर 'बेवफा सनम'शी निगडित माहिती तपासली तर त्यात हा चित्रपट गायक अताउल्लाह खानच्या कहाणीवर आधारित असल्याचं लिहिलं आहे. हा चित्रपट आणि त्यातल्या गाण्यांशी अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. गुलशन कुमार कॅसेट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नातून अताउल्लाह खानची तुरुंगातून सुटका करणार आहेत, अशाही अफवा काही शहरांमध्ये त्या वेळी पसरल्या होत्या. काही जणांनी अताउल्लाह खानला फाशीपासून वाचवण्यासाठी कॅसेट्स खरेदी केल्या होत्या.
हेही वाचा - आयेशानं सोडली 'रंग माझा वेगळा'?; अभिनेत्री विदिशा म्हसकरची नव्या मालिकेत एंट्री
पुढे काही वर्षांनंतर स्पष्ट झालं, की पाकिस्तानमध्ये ज्या अताउल्लाह खान नावाच्या व्यक्तीने प्रेयसीची हत्या केली होती, तो गायक अताउल्लाह खान नव्हता तर कोणी दुसराच होता. गुलशन कुमार यांनी गाणी आणि चित्रपटाच्या यशासाठी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली होती. याचा त्यांना खूप फायदा झाला. गुलशन कुमार यांच्यासह गायक सोनू निगम रातोरात प्रसिद्धी झोतात आला. या गाण्यामुळे त्याचा आवाज घरोघरी पोहोचला. मजेशीर गोष्ट म्हणजे काही जण सोनू निगमच्या आवाजाला अताउल्लाह खानचा आवाज समजत होते. यावरून ही फसवणूक अताउल्लाह खानची नाही, तर भारतातल्या भोळ्या-भाबड्या जनतेची होती.
बी प्राक या गायकाच्या आवाजात 'अच्छा सिला दिया' हे गाणं पुन्हा रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळे या गाण्याशी निगडित जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या नवीन गाण्यात प्रमुख भूमिकेत नोरा फतेही आणि राजकुमार राव दिसणार आहेत. हे गाणं यू-ट्यूबवर पाहायला मिळत असून त्याची ओरिजिनल गाण्याशी तुलना केली जात आहे. 90च्या दशकात हे गाणं देशभरात खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामुळे पाकिस्तानी गायक अताउल्लाह खानची प्रेमकहाणी चर्चेत होती. त्या वेळी हे गाणं कुल्फीची गाडी, पानाची दुकानं आणि कॅसेट्सच्या दुकानासह विवाहसोहळ्यांमध्येही ऐकायला मिळायचं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News